पूर्ण पोट भरेल इतके तर कोणीही कधीही जेवू नये. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे जेवढे जेवण पूर्ण पोट भरण्यास पुरते त्याच्या एक तृतीयांश भाग द्रव अन्नाने म्हणजे पातळ पदार्थांनी भरावे. उदा. सूप, जलजिन्यासारखे पाचक द्रव्य, आमटी, ताक इ. एक तृतीयांश भाग घन अन्नाने भरावा. उदा. पोळी, भाजी, भात, इ.
व एक तृतीयांश भाग रिकामा सोडावा, यात वायूचे चलन म्हणजे हालचाल होणे अपेक्षित आहे. वायूला इतका वाव न दिल्यास पोट दुखण्याची शक्यता नाकारता येत नाही...
जेवण प्रमाणात घ्यावे आपण घेतलेले जेवण हे नक्की योग्य प्रमाणात आहे अथवा कसे, हे समजण्यासाठी आयुर्वेदाने काही लक्षणे दिली आहेत. व ही लक्षणे वैशिष्टयाने प्रमाणाबाहेर जेवण झाल्यावरच सुरू होतात ती अशी -
● पोटात अथवा ओटीपोटात वा अन्य कोठेही तडस लागणे वा दुखणे
● छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे
● जेवणानंतर पाठ दुखायला सुरुवात होणे
● पोट जड होणे
● इंद्रिये अप्रसन्न राहणे
● तहान भूक इ. चे शमन वा समाधान न होणे
● बसणे, उठणे, चालणे, श्वास घेणे इ. सर्व क्रिया सुखाने, सहजतेने व सुलभतेने करता न येणे
● सकाळ-संध्याकाळी होणारे मलमूत्राचे होणारे स्वाभाविक विसर्जन हे कोणत्याही कष्टाविना व प्रयत्नाविना न होणे
अन्न पदार्थांचे घटक, ते जेवणात वापरण्याची पध्दती, स्वयंपाकात कोणत्या पदार्थांचे एकत्र वापरणे आरोग्यास हानीकारक या माहितीबरोबरच कोणता पदार्थ किती प्रमाणात वापरावा, तयार पदार्थातील एकाद्या पदार्थाचे मोजमाप किती असावे हेही महत्वाचे. उदा. एक पेला लिंबू सरबतास चिमटीभर मीठ पुरेसे असते. चमचाभर मीठ जास्तच होते.
हे झाले स्वयंपाकातील एका पदार्थातील अनेक बाबींपैकी एका बाबीचे प्रमाण. परंतु तयार पदार्थही बिन मोजमापाचा खाणे योग्य नव्हे. उदा. समजा जेवणासाठी भात भाजी पोळी आमटी असा स्वयंपाक तयार आहे.
यात एक घासभर भात व दोन वाटया आमटी अथवा चतकोर पोळी व वाटीभर भाजी असे खाणे फारसे हितकारक नव्हे. आपल्या पध्दतीच्या जेवणात कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा हेही आपल्या वाढण्याच्या पध्दतीत अंतर्भूत असते.
चटणी एक चमचा वाढली जाते तर आमटी वाटीभर वाढली जाते. भाताची मूद वाढली जाते तर पोळी एक वा अगदी लहान असल्यास दोन वाढल्या जातात.
मग भुकेप्रमाणे कमी अधिक भात वा पोळी खाल्ली जाते. त्यामानाने आमटी वा भाजी यांचे प्रमाण कमी व पोटभरीचे नसते. यावरून कोणता पदार्थ किती खावा याचा अंदाज घेतला जातो. कोणताही एकच पदार्थ संकेतापेक्षा अधिक प्रमाणात खाल्ला गेला तर त्याचा काही प्रमाणात त्रास होणे तर स्वाभाविकच आहे.
मी काय खाऊ ?
डॉ नंदिनी धारगळकर