वाट्टेल तेव्हा जेवता तेव्हा..

सूर्य उगवताच कमलदल फुलतं, रात्र झाली की रातराणी बहरते, वसंत येताच कोकीळ गातो . निसर्ग त्याचं घड्याळ चुकवत नाही, मग आपण का चुकवतो?

वाट्टेल तेव्हा जेवता तेव्हा..

आ पण काय खावं याचा आपण खूपच विचार करतो आणि आवड निवड यानुसार तशी त्याची सोय करण्यातही आपला बराचसा वेळ आणि श्रम खर्ची पडतात. पण काय खावं यासोबतच कधी खावं याचा विचारही तितकाच महत्वाचा आहे. आणि नेमका याचाच विचार करण्यात आपण कमी पडतो. आपण आपल्या खाण्याची वेळ कशी ठरवतो? आपली जेवणाची वेळ कशी ठरवावी? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध आपण कधी घेतला आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधली तर आपलं आरोग्याचं घड्याळ व्यवस्थित आहे की बिघडलेलं याचंही उत्तर आपोआप मिळेल.

वेळेवर म्हणजे कधी जेवावं?

वेळेवर खाणं आवश्यक असलं तरी जेवणाची वेळ घड्याळावरून ठरवू नये, तर शरीराच्या जैविक घड्याळानुसार ठरवावी आणि जैविक घड्याळ मात्र भिंतीवरील घड्याळाप्रमाणे नियमित चालेल याची सवय लावावी. पहिलं अन्न पूर्ण पचलं आहे, त्याची पावती म्हणून शुद्ध ढेकर आला आहे,
भुकेची संवेदना झाली आहे, शरीराला 1 हलकेपणा आहे अशावेळीच पुढचा आहार घ्यावा. पहिले सेवन केलेलं अन्न पचलं नसताना, जेवणाची इच्छा नसताना, शरीर जड असताना किंवा जेवल्यानंतर पुन्हा सतत काहीतरी तोंडात टाकत राहणं या सवयींमुळे रोगांना आमंत्रण मिळतं. पचनशक्तीवर अतिरिक्त ताण येतो.

निसर्गाला जमतं मग आपल्याला का नाही?

सकाळी ९ वाजले की न्याहारी घ्यावी. घड्याळात १२ वाजले की जेवायला बसावं असं न करता भुकेची संवेदना झाल्यावर खावं हेच योग्य आपल्या आजूबाजूला, निसर्गात जरी आपण डोळे उघडून पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की, निसर्गाचं चक्र अगदी घड्याळाबर हुकूम चालू आहे.
सकाळी सूर्योदयाला उमलणारं कमलदल, सायंकाळी सूर्यास्त होताच मिटणाऱ्या त्याच्या पाकळ्या, पहाटे पडणारा प्राजक्ताचा सडा, रात्र झाली की फुलणारी रातराणी, वर्षभर मूक असणाऱ्या कोकिळेचं वसंतऋतू येताच सुरू होणारं गुंजन असं चक्र अविरत चालू आहे.

आपल्या शरीरातील जैविक घड्याळही खरं तर आपलं कार्य बिनचूक करीत असतं. सकाळ झाली की येणारी जाग, सूर्य डोक्यावर गेल्यावर लागणारी क्षुधा व रात्र झाली की मिटायला लागणारे डोळे याचंच प्रतीक आहे. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो व वेळा चुकवत राहतो. फलस्वरूप अनेक आजारांचं ओझं आयुष्यभर खांद्यावर वाहत राहतो.

वेळ पाळण्याचे फायदे

आहाराची वेळ नियमित असेल तर नेमक्या त्याच वेळी पाचकस्त्रावही स्त्रावतात. अन्नाचे पचन होतं. खाल्लेलं अन्न अंगी लागतं. योग्य वेळ नसताना जेवल्यास पूर्ण पाचकस्त्राव येत नाहीत. याउलट जेवणाची वेळ निघून गेल्यास स्त्राव ठरलेल्या वेळी स्त्रवतात पण तेव्हा पोटात अत्र नसत. परिणामी ते स्त्राव स्त्रवून गेल्यावर, जेवणाची वेळ उलटून गेल्यावर घेतलेल्या अन्नाचंही पूर्णत: पचन होत नाही. म्हणूनच जेवणाच्या वेळा जरी आपल्या सोयीनुरूप किंवा व्यवसायानुरूप ठरवल्या तरी जे ठरवलं आहे ते नियमित ठेवून त्यांचं पालन करावे