माणसाने कसं वागावं

आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासात एकमेकांची साथ मिळाली की अशक्य गोष्टी देखील सहज शक्य होतात. परंतु त्यासाठी परमेश्वराच्या नामचिंतनाची नितांत गरज आहे.

माणसाने कसं वागावं

आजकाल कलियुगात आपण पाहत आहोत माणसाला माणसाची अजिबात किंमत राहिलेले नाही प्रत्येकजण आपल्याला हवं तसं वागताना आपलेला दिसत आहे. चौर्‍यांशी लक्ष योनी फिरून आपल्याला शेवटी मानव जन्म मिळाला, परंतु तो सर्वांनाच कळाला असे नाही. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. जेव्हा आपलेला नेमकं कसं वागावं? हे समजत नाही. 

मला वाटतं अशावेळी आपण आपले मन स्थिर करून परमेश्वराचे नामचिंतन केले तर आपल्याला योग्य मार्ग सापडू शकतो. पण त्यासाठी देवाशी एकनिष्ठ राहून त्याचे नामस्मरण करायला हवे. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक चुका करत असतो. म्हणतात ना! चुका करतो तोच "माणूस" असतो. अनेक वेळा आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात. आपण चांगलं वागून सुद्धा आपल्या वाट्याला वाईटच का आलं असाव. प्रत्येक गोष्ट घडण्याच्यामागे परमेश्वराची काही ना काहीतरी रचना असते. जर आपल्याकडून काही चूक झाली तर आपण ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आयुष्यात आपल्याला अशा अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना खंबीरपणे तोंड द्यावे लागते त्यासाठी आपण परिपूर्ण असले पाहिजे जर एखादा माणूस खूप चांगला वागत असेल आयुष्यभर कुणाचंच मन न दुखवता सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल आणि तरीही त्याच्या वाट्याला दुःखच आलेलं असेल तर कधीकधी तो विचारांनी भरकटलेला आपल्याला दिसून येतो. अशावेळेस संयम राखून आलेल्या परिस्थितीला आपण तोंड द्यायला हवं.

कोणी आपल्याशी कसेही वागले तरी आपण सगळ्यांशी अगदी नम्रपणे वागले पाहिजे. कुणाचाही राग, द्वेष न करता आणि कधीच कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण आपले कर्म केले पाहिजे. इतके चांगले वागूनही जर आपल्या पदरात दुःखच पडत असेल तर त्या  भगवंताला शरण जाऊन त्याची आपण अखंड सेवा करायला हवी. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात 'तुझे पायी सुख सर्व आहे.' आपण सर्वांनी त्या परमेश्वराच्या पवित्र नामामध्ये तल्लीन झाले पाहिजे. सद्विचार आणि सदाचाराने सगळ्यांशी वागले पाहीजे. प्रत्येकवेळी समोरचा माणूस आपल्याला समजून घेईलच असं नसतं. कधी कधी आपल्यालाच ते नातं टिकवण्यासाठी कमीपणा घ्यावा लागतो. मनात नसलेल्या गोष्टी देखील समोरच्या व्यक्तीसाठी कराव्या लागतात. म्हणजे कोणी आग झाले तर कोणी पाणी व्हावं लागतं. तरच ते नातं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं. तुकोबाराय आपल्या अभंगात पण याचे उदाहरण देतात. महाराज लिहितात,  


क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं।
दुष्ट तयाप्रति काय करी॥१॥
तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि।
जाय तो विझोनि आपसया॥२॥
तुका म्हणे क्षमा सर्वांचें स्वहित।
धरा अखंडित सुखरूप॥३॥

महाराज म्हणतात, ज्याच्याकडे क्षमा नावाचे शस्त्र आहे. त्याचे दृष्ट माणूस काहीच करू शकत नाही. महाराज फार सुंदर उदारण देतात. अग्नीचा गोळा जर जमीनीवर पडला, आणि जमीनीवर वाळलेले गवत नसेल तर तो अग्नी आपोआपच विजून जातो. म्हणजे कितीही नालायक माणूस आपल्या मागे लागला आणि आपण जर शांत असलो, तर तोही आपोआपच शांत होतो. म्हणून आपल्या अंगी जर क्षमा असेल तर आपले हित नक्कीच होते. यात काहीच शंका नाही.

आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासात एकमेकांची साथ मिळाली की अशक्य गोष्टी देखील सहज शक्य होतात. परंतु त्यासाठी परमेश्वराच्या नामचिंतनाची नितांत गरज आहे. म्हणजे काय तर आपण समोरच्या व्यक्तीचे मन ओळखून घेतले पाहिजे, त्या व्यक्तीला जेव्हा जेव्हा आपली गरज असेल तेव्हा आपण धावत गेले पाहिजे. मग अशावेळी तो माझ्याशी कसा वागला किंवा तिने असं का केलं हे महत्त्वाचं नसतं. फक्त ती व्यक्ती महत्त्वाची असते. प्रत्येक माणूस हा आपापल्या परीने बरोबरच असतो. परंतु आपण त्याला किती समजून घेतो, याला जास्त महत्त्व आहे. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू अटळ आहे. आपल्याला मिळालेल्या या दुर्लभ नरदेहाची ज्या दिवशी आपल्याला किंमत कळेल त्या दिवशी संपूर्ण आयुष्याच सार आपल्या लक्षात येईल. आपण कोणाशी आणि कसे वागावे हे ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने ठरवावं.

प्रिती भालेराव, पुणे