आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्व गोष्टींचा त्याग करा

आध्यामिक प्रगती ही तुम्ही काय शिकलात किंवा तुम्ही काय नवं शोधून काढलं, यावर अवलंबून नसते

आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्व गोष्टींचा त्याग करा

सुमेध नावाचा एक अतिशय अभ्यासू शिष्य होता, जो आध्यात्मिकता, धार्मिकता म्हणजे काय हे जाणण्याचा खूप प्रयत्न करीत होता. तो अनेक ग्रंथ वाचायचा, दूर दूरपर्यंत प्रवास करायचा, अनेक ध्यानाच्या वर्गामध्ये स्वतःचं नांव नोंदवायचा, पण त्याच्या परिश्रमाला काहीही फळ मिळत नव्हतं. सरतेशेवटी, तो एका मठाच्या धर्मगुरूंसोबत साधना करू लागला आणि सुमेध प्रत्येक महिन्याला आपल्या प्रगतीचा अहवाल त्यांना पाठवायचा.

पहिल्या महिन्यांत त्याने लिहिले, "माझ्या चेतनेचा विस्तार होतोय आणि या विश्वाशी मी तादात्म्य पावतोय, असा मला अनुभव येतोय." गुरुंनी तो कागद फेकून दिला. दुसऱ्या महिन्यात त्याने लिहिलं, "मी सरतेशेवटी हे शोधून काढलंच की शिष्यत्व प्रत्येक गोष्टीमध्ये असते." गुरू खूपच नाराज झाले. तिसऱ्या महिन्यात त्याने लिहिले, “एकत्व आणि अनेकत्व याचं रहस्य माझ्या एकाग्रतेसमोर प्रकट झालंय." गुरुंनी कंटाळून जांभया दिल्या. पुढच्या महिन्याच्या प्रगतीमध्ये त्याने लिहिलं, “कुणीही जन्मत नसते, कोणीही जगत नसते आणि कुणीही मरत नसते.'' गुरुंनी हताश होऊन हात उडवले.

त्यानंतर जवळपास वर्षभर गुरुंना त्याच्याकडून काहीही कळले नाही आणि सरतेशेवटी, गुरुंनीच त्याला प्रगती कळवण्याबद्दल पत्र लिहिलं. यावेळी त्याने जे कळवलं, ते वाचून गुरू आनंदाने नाचू लागले.

त्याने लिहिले, “त्याचा कोण विचार करतंय ? "

आध्यामिक प्रगती ही तुम्ही काय शिकलात किंवा तुम्ही काय नवं शोधून काढलं, यावर अवलंबून नसते, तर तुम्ही कसे स्वतःला सगळ्या गोष्टींपासून दूर सारू शकता आणि भौतिक जगातील आनंद आणि खोटी आशा यांचा त्याग करून कसे राहू शकता, यावर ते अवलंबून आहे.