मी हजारो विद्यार्थ्यांचा गुरूजी असलो तरी तू हजारो विद्यार्थ्यामध्ये एकमेव लेखक आहेस

वाघ गुरूजींच्या आयुष्याचा ९५ टक्के सेवाकाळ हा जवळपास धोंदलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व्यतीत झाला. गावातील गुरूजी असल्यामुळे गावकरी त्यांना (आण्णा मास्तर) म्हणूनच ओळखत.

मी हजारो विद्यार्थ्यांचा गुरूजी असलो तरी तू हजारो विद्यार्थ्यामध्ये एकमेव लेखक आहेस

मी धोंदलगावच्या जि.प. शाळेच्या सहावीच्या वर्गात होतो. सहावीच्या वर्गात आण्णासाहेब वाघ गुरूजींचा मराठीचा तास सुरू होता. कवयित्री इंदिरा संत यांची पुढील 'पाणी पाणीʼ ही कविता वाघ गुरूजी वर्गात शिकवित होते.

वर कोर्‍या आभाळाची 
भट्टी तापली तापली 
खाली लेकरांची माय 
वारा पदराने घाली 

वार्‍या खाली कसेबसे 
उभे रोप जवारीचे,
एक मलूल पोपटी 
दोन सुकल्या पात्यांचे. 

उभी कोणाच्या दारात 
रांग भुकेल्या बाळांची, 
थाळा वाडगा घेवून
अशी तिष्ठत केव्हाची.

पोरक्या या अर्भकांना 
एक पाणी का मिळेना, 
उभा डोळ्यांमध्ये थेंब
तो का सुकून जाईना.

कविता शिकवत असतांना गुरूजींचा  पहाडी आवाज शाळेपासून कितीतरी लांबवर जायचा, शाळेत शिकवितांना वाघ गुरूजी खुप मन लावून शिकवायचे एकदा वाघ सर कविता किंवा धडा शिकवायला लागले की, विद्यार्थ्याच्या तो तोंडपाठच व्हायचा. दोन दशकाआधी वाघ गुरूजींची ऐकलेल्या कविता आजही माझ्या तोंडपाठ आहे. हेच वाघ गुरूजींच्या आध्यापणाचे वैशिष्ट्ये होते. त्यांनी माझ्यासारखे हजारो विद्यार्थी घडविले.

वाघ गुरूजींच्या आयुष्याचा ९५ टक्के सेवाकाळ हा जवळपास धोंदलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व्यतीत झाला. गावातील गुरूजी असल्यामुळे गावकरी त्यांना (आण्णा मास्तर) म्हणूनच ओळखत. वाघ गुरूजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावलेलं एक करारी व्यक्तीमत्वच म्हणावे लागेल. त्यांच्या घराचे नावच 'शिवनेरी'. वाघ गुरूजींचे राहणीमान अगदी साधेच पांढरा गुरू शर्ट, पांढरी ट्राऊझर आणि डोक्यावर कडक पांढरी गांधी टोपी. राहणीमान साधे असले तरी माणूस फार करारी आणि शिस्तप्रिय. वाघ गुरूजींचे नुसते नाव ऐकले तरी विद्यार्थी थरर... कापायचे, त्यामुळे गुरूजींच्या मराठी विषयाचा अभ्यास सर्वात आधी, अन् इतर विषयाचा अभ्यास नंतर अशीच परिस्थिती होती. गुरूजींची वैजापूर येथील कन्या सौ. उर्मिला संभाजी सांळुके यांच्याशी गुरूजींविषयी माझे बोलणे झाले तेव्हा ताई सुरूवातीला भावनिक झाल्या. व त्या म्हणाल्या गुरूजी वडीलकीच्या नात्याने खुप प्रेमळ होते. परंतु शाळेत गेल्यानंतर शिक्षकाच्या नात्याने खुपच करारी आणि शिस्तप्रिय. शाळेत असतांना माझा काही अभ्यास चुकला तर ते माझ्यावर  अजिबात दया, माया करत नसत. त्यांच्याकडे कधीच भेदभाव नव्हता. माझं चुकलं तर सर्वात जोरात छडी ते मला मारत असे. शाळेत असतांना शिक्षकाची आणि घरी आले की वडिलकीची भुमिका ते चोख बजावित होते.

वाघ गुरूजींना सांस्कृतिक कार्यात देखील खुप आवड होती. ते गावातील रेणुकामाता यात्रा उत्सवाच्या निमित्ताने नाटक व गणपतीच्या उत्सव निमीत्ताने लहान मुलांचे मेळे बसवत, तसेच ते शाळेतसुध्दा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे. आणि विद्यार्थी मोठ्या आवडीने त्यात भाग घ्यायचे. वाघ गुरूजी भाषणाला उभे राहिले तर त्यांना कधी माईकची गरज पडेचच असे नव्हते. कारण त्यांचा आवाजच पहाडी असून श्रोत्यांना भाराहून टाकायचा. सामाजिक कामात देखील वाघ गुरूजींचा नेहमीच पुढाकार असायचा. 

वाघ गुरूजी २००२ ला सेवानिवृत्त झाले. पण नेहमी विद्यार्थ्यांत रमणारा माणूस घरी कसा रमेल, हा मोठा प्रश्न होता. अनेकदा गुरूजी मला शाळेच्या आवारात दिसायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते आनंदी असायचे. तसेच गावात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, न्यू हायस्कूल आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या पुण्यतिथीला वाघ गुरूजी नेहमीच हजर असायचे. आणि विनायकराव पाटलांवर असणारी गुरूजींची श्रध्दा त्यांच्या भाषणातून दिसून यायची अवघं ४१ वर्षाचे आयुष्य मिळालेले विनायकराव पाटील १९६७ ला आमदार होवून मंत्री झाले, व डिंसेबर १९६८ त्यांचे दुःखद निधन झाले. अवघ्या एका वर्षांच्या कालखंडात त्यांच्याइतके काम करणारे व्यक्तीमत्व भारतात कधीच होणार नाही. हे मी गुरूजींच्या भाषणातून ऐकत गेलो. आणि विनायकराव पाटलांविषयी मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला. मी २०१२ ला हिंदुस्थानचे वीरपूत्र महाराणा प्रतापसिंह यांचे चरित्र लिहिले, व २०१४ ला 'शिक्षणमहर्षी विनायकराव पाटील' हे पुस्तक लिहिले आणि हे दोन पुस्तके देण्यासाठी मी गुरूजींचा घरी गेलो.

आणि... म्हटलो गुरूजी मी दोन पुस्तके लिहिले, हे घ्या. पुस्तके बघितल्यावर गुरूजींच्या चेहऱ्यावरील आनंद अगणित होता. त्यांनी विनायकराव पाटलांचे चरित्र हातात घेतले व त्यांचे डोळे भरून आले, आणि म्हणाले अरे... बाबासाहेब तू खुप मोठे काम केले आहेस. ज्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात जवळपास २० हजाराच्या वर प्राध्यापक असतील आणि दहा ते बारा चांगले नामांकित लेखक देखील असतील तरी कोणालाच हा विषय सुचला नाही. आणि तू मंडळाचा कर्मचारी नाही. तरी तुला हा विषय कसा सुचला. तू त्यांच्या मृत्यूनंतर ४६ वर्षाने हा विषय पुनरोर्जिवीत केला. मी म्हटलो गुरूजी विनायकराव पाटलांनी धोंदलगावात जर शाळा सुरू केली नसती तर कदाचित माझे शिक्षण सातवीपर्यंतच झाले असते, आणि पुढे बंद पडले असते. कारण बाहेरगावी जाऊन शिकण्याची त्यावेळी माझी परिस्थितीदेखील नव्हती. आणि तुमच्या भाषणातून मी विनायकराव पाटलांविषयी खुप काही ऐकलेले होते. म्हणून मनात पक्का विचार केला की, आपण विनायकराव पाटलांसाठी काही तरी करायचे. आणि या विचारातूनच हे पुस्तक उदयास आले. हे माझे बोल ऐकून वाघ गुरूजी खुप आनंदी झाले. ते म्हटले एखाद्या संस्थाचालकाच्या जिवंतपणी पुढे पुढे करणारे मी हजारो लोकं बघितले. परंतु एखाद्या चांगल्या, निष्कलंक संस्थाचालकाच्या मृत्यूनंतर ४६ वर्षांनी पुस्तक रूपात त्यांचा इतिहास पुढे आणणारा "माणूस" मी आज पहिल्यांदाच पाहतोय. आणि... माझं भाग्य समजतो, मी तुझा गुरूजी आहे. 

हे बघ बाबासाहेब एक दिवस महाराष्ट्रातील संपुर्ण साहित्य क्षेत्र तुला नावानिशी ओळखेल. असं मला मनापासून वाटतं, कारण तुझ्यासारख्या सत्यता जोपासणाऱ्या लेखकाची खरच महाराष्ट्राला गरज आहे. मी जरी हजारो विद्यार्थ्यांचा गुरूजी असलो तरी हजारोमध्ये लेखक असणारा तू माझा एकमेव विद्यार्थी आहेस. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत असेल. त्यानंतर मी अनेकदा गुरूजींना भेटत राहिलो. आणि... ९ जुलै २०१७ रोजी गुरूजींची प्राणज्योत मालवली. अन् माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना पोरकं करून गुरूजी अंनताच्या प्रवासाला निघून गेले. गुरूजी नेहमीच माझे मार्गदर्शक म्हणून माझ्यासोबत आहे. असे मला नेहमीच वाटते. आजच्या शिक्षणदिनाच्या दिवशी गुरूजींना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. 

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर
९६६५६३६३०३