आणि मज विठोबा भेटला......

असे म्हणत स्वतःशीच अंतर्धान पावले,या पांडुरंग भेटीच्या सुखाचे वर्णन शब्दांत करणे कठीण. भाग्यवान शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने आज मज कळला होता, क्षणभर समाधिस्त झाले , आणि मज विठोबा भेटला.

आणि मज विठोबा भेटला......

 ७ डिसेंबर, विनायक चतुर्थी, अंगारक योग असा शुभदिन उगवला अन् एक गोड बातमी कानावर येऊन थबकली. साहित्य क्षेत्रात दिला जाणारा मानाचा "हिरकणी पुरस्कार" मला जाहीर झाला होता. हा माझा पहिला वहिला पुरस्कार आणि तोही मला पंढरपूरला मिळणार होता. केवढे भाग्य !  पुरस्कारापेक्षा साक्षात पंढरीच्या श्रीहरीचे दर्शन होणार तेही तब्बल १५ वर्षांनी, या विचाराने आनंद गगनात मावेनासा झाला. पंढरीला जाण्याची तयारी सुरू झाली, बॅग भरली. मनात भक्तीचे उमाळे सुरू झाले आणि दोन दिवसात पुन्हा जाऊबाई सीरियस झाल्याची बातमी येऊन थडकली. मन चिंताग्रस्त झाले, जाऊबाईना भेटण्यासाठी दवाखाण्यात गेले., डॉक्टरांनी ४८ तासांची मुदत दिली होती. त्या मनाने खूप स्ट्राँग होत्या. आमच्या दोघींच्या भेटीच्या संवादात त्या म्हणाल्या, तुला पुरस्कार जाहीर झालाय असे  कळाले, खूप छान लिहायला लागलीस आणि लिहीत रहा म्हणत  तू पंढरपूरला जा आणि त्या पांडुरंगाला माझाही दंडवत सांग आणि त्याचा प्रसाद माझ्यासाठी घेऊन ये असे सांगितले, मी म्हणाले मी तुम्हाला सोडून नाही जाणार तेव्हा म्हणाल्या अग जा तू मला काही होणार नाही. त्यांचा आशीर्वाद मिळाला, मी मनोमन सुखावले पण जाणे अशक्य होते. गीता जयंती, मोक्षदा एकादशी या पवित्र पावन दिनी  मंगळवारी तो मला मिळणार होता . २ ,३दिवसांनी त्यांना  पुन्हा दवाखान्यात भेटण्यासाठी गेलो तर त्यांना घरी सोडले होते. खिन्न मनाने जड पावलांनी त्यांच्या घरी पायऱ्या चढत असताना माझी पावले  आपसूक देवघराकडे वळली आणि मला पांडुरंगाचे दर्शन झाले. बाकीचे देव पाण्यात ..... पांडुरंगाची तेजोमय  मूर्ती पाहून अंगावर क्षणभर शहारे आले  तत्क्षणीच जाऊबाईंच्या खोलीत गेले, पाहते तर काय ! त्या चक्क उठून बसलेल्या होत्या . अत्यंत प्रसन्न, प्रफुल्लित, आनंदी मनाने आमच्याशी गप्पा मारू लागल्या. प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत आल्या होत्या . अद्भुत चमत्कारच होता तो  !आम्ही घरातील सर्वजण फक्त आणि फक्त आनंदाश्रू ढाळत होतो . मला तर डोळ्यांसमोर तो माझा सखा पांडुरंगच दिसत होता. किती लीला अगाध !"" ईश्वराची...
   

आनंदाने घरी आलो, पुन्हा तयारी केली आणि पंढरपूरकडे प्रस्थान केले. त्या दिवशी मोक्षदा एकादशी होती . बरोबर संध्याकाळी ७ वाजता पांडुरंगाचे दर्शन झाले.. आजूबाजूला मला कोणीच दिसत नव्हते. मुखदर्शन झाले..मूर्तीकडे पाहून ढसाढसा रडले, आईची आठवण आली. आईची पण  विठोबा ावर अपार भक्ती होती . ती आता या जगात नाही.... पण  विठू माऊलीच्या रुपात ती मला भेटली, पांडुरंगाशी एकरूप झाले, गरुड खांबाला मिठी मारली,  अंतर्मनाने पांडुरंगाशी संवाद साधला आणि "तुझ्या भेटीची मनी होती आस, नको मज आता तुजवीण आणिक  काही"... असे म्हणत स्वतःशीच अंतर्धान पावले,या पांडुरंग भेटीच्या सुखाचे वर्णन शब्दांत करणे कठीण. भाग्यवान शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने आज मज कळला होता, क्षणभर समाधिस्त झाले , आणि मज विठोबा भेटला.  .....
     

पांडुरंगाच्या दर्शनाने सुखावले होते, भांबावले होते, खरंच मैलोनमोल ऊन, वारा पाऊस दगड धोंड्याच्या वाटा तुडवत,संसाराचा मोह पाश तोडून, जीवाची पर्वा न करता विठोबा विठोबा ,रामकृष्ण हरी जय मंत्र जपत पांडुरंगाचा भोळा वारकरी ,पंढरीला का येतो याची जाणीव झाली होती. नामा,तुका, चोखा, कान्होपात्रा त्याच्या पायरिशी का विसावले असतील याची साक्षात अनुभूती मी आज घेतली होती,मंदिराच्या प्रवेश द्वारापाशी असणारे कान्होपात्रा चे झाड तिची पांडुरंगा प्रति असणारी परमभक्ती सांगून गेले. पंढरीच्या या सावळ्या श्रीरंगाचे रूप मनात साठवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो...
 माझा हा पुरस्कार माझी प्रिय आई
 आणि जाऊबाई दोघींनाही समर्पित

(ज्यांच्यामुळे पांडुरंग भेटीचा योग आला त्या साहित्य क्षेत्रातल्या माझ्या गुरू आदरणीय वनमाला पाटील ताईंचे चरणी दंडवत.)

सौ. नीता यशवंत भामरे, नासिक