सुंदर चेहऱ्यापेक्षा, सुंदर मनावर विश्वास ठेवा, जगणं सुंदर होईल

ज्या नात्याची सुरूवात मनापासून झालेली असते, त्या नात्यात दुरावा, विश्वासघात कधीच निर्माण होत नाही.

सुंदर चेहऱ्यापेक्षा, सुंदर मनावर विश्वास ठेवा, जगणं सुंदर होईल

प्रत्येक नात्यामध्ये विश्वास खुप महत्वाचा असतो. त्यामुळे अशा व्यक्तीवर विश्वास ठेवावा की, आपल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही,  आणि आपल्याकडून ही त्याचा विश्वासघात होणार नाही. नात्यात या गोष्टी जर समजल्या आणि निभावल्या तर ते नातं अधिकच सुंदर होतं जातं.

प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे कोणाचे सौंदर्य, राहणीमान व गोड बोलणं बघून कधीच कोणावर विश्वास ठेऊ नये. विश्वास ठेवताना समोरच्याचे मन किती सुंदर आहे, ते बघावं. बाह्यसौंदर्यापेक्षा अंर्तमनाचे सौंदर्य महत्वाचे असते. हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. हे जर आपल्या लक्षात आले तर कधीच कुठल्या नात्यात धोका निर्माण होणार नाही. 

ज्या नात्याची सुरूवात मनापासून झालेली असते, त्या नात्यात दुरावा, विश्वासघात कधीच निर्माण होत नाही.  एखादी व्यक्ती सुंदर दिसते, छान राहते, गोड बोलते अशा व्यक्तीवर पहिल्या नजरेत प्रेम होणे, हे प्रेम नसून ते फक्त काही काळासाठी वाटणारं शारीरिक आकर्षण असतं. शारीरिक आकर्षण असल्यामुळे त्या नात्यात वासना निर्माण होते. वासना म्हटलं की दुःख आलेच म्हणून समजा, वासनेविषयी संत चांगदेव महाराज लिहितात,

वासनेच्या संगे नको जाऊ मना
पहा त्या रावणा काय झाले
इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा
नारद चुकला चाळा भजनाचा
चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो 
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा

महाराज म्हणतात, वासनेमुळे रावणासारख्या एवढ्या बलाढ्य माणसाचे काय झाले. ज्याची नगरी सोन्याची होती ती नष्ट झाली. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. देवाचा राजा इंद्र याचे पण वासनेमुळे काय झाले, हे आपणा सर्वांना माहितच आहे. तसेच वासनेमुळेच सुंदर असणारा चंद्र देखील काळा झाला. तसेच वासनेमुळेच रोज भजन करणारा नारद सुध्दा भजनापासून दूर गेला होता. एवढ्या मोठ्या लोकांची जर ही अवस्था झाली असेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची वासनेमुळे काय परिस्थिती होईल हे सांगणे कठीणच. कारण आकर्षणातूनच वासनेचा जन्म होतो. आणि वासनेमुळे फक्त दुःखच मिळू शकते, सुख कधीच मिळू शकत नाही.

एखाद्या व्यक्तीबद्दल वारंवार मनात विचार येणे, त्याला भेटणे, एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करणे, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना अडचणीच्या काळात मदत करणं, यालाच प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे एका नजरेत, एका क्षणात होणारी भावना नाहीच. प्रेम म्हणजे स्फुलिंगासारखी हळुवार फुलत जाणारी भावना आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. 

राधा कृष्णाचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. शंभर वर्षे वेगळं राहुनदेखील त्यांचे प्रेम कमी झाले नाही. उलट वाढतच गेले. त्यांची अंतरिक ओढ, पवित्रता, जिव्हाळा, आत्मियता यामुळे त्यांचे प्रेम अमर झाले. त्यांच्या नात्यातील प्रामाणिकपणामुळे आज पूर्ण विश्वात पती पत्नीऐवजी प्रियकर प्रियसी हे नातं श्रेष्ठ माणलं जातं. आजही तुम्ही वृंदावनात गेले तर प्रत्येकाच्या मुखातून राधे कृष्ण असेच शब्द बाहेर पडतांना दिसतात. वास्तविक पाहता राधा खुप सुंदर होती. आणि कृष्ण सावळा होता. परंतु त्या दोघांचे प्रेम शरिरावर नसून मनावर होते. त्यामुळे आजही हजारो वर्षानंतर प्रेमाचे प्रतिक म्हणून राधा कृष्णाचे नाव घेतले जाते.

आज विज्ञानाने खुप प्रगती केली, मानव प्रगत झाला. खुप मोठमोठे शोध लागले. तरिही आज नात्यातील ओढ, ओलावा, आपलेपणा, विश्वास लोप पावत चालला आहे. हल्ली फक्त पैसा, प्रतिष्ठा व सुंदरता हे नात्याचे पाया झाले आहेत. म्हणूनच नात्यात धोका, विश्वासघात, राजकारण अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. 

संत मीराबाई या राजपूत क्षत्रीय घराण्यातील होत्या. त्यांना लहानपणापासूनच कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. त्यांची कृष्णभक्ती ही खुप पवित्र होती. संत मीराबाईंनी लहानपणापासून कृष्णाला वर माणलं, आणि ज्यावेळी त्यांचा विवाह चित्तोडचे महाराणा भोजराजा यांच्याशी झाला. त्यावेळी संत मीराबाईंनी राजाला सर्व खरं खरं सांगून टाकलं. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर महाराणा भोजराजा यांनी चित्तोडमध्ये संत मीराबाईला कृष्णभक्ती करण्यासाठी भव्य मंदिर बांधून दिले. आणि संत मीराबाई आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कृष्ण भक्तीत, कृष्णाच्या प्रेमात रमल्या. म्हणूनच कदाचित म्हणत असतील, खरं प्रेम हे ईश्वर भक्तीप्रमाणे असते.

म्हणून आजही त्या लोकांची पूजा केली जाते. लाखो लोक त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. नात्याप्रती प्रेम, जिव्हाळा, ममता, आपुलकी, आपलेपणा, विश्वास हा जगण्याचा पाया आहे. ज्यावेळी अशाप्रकारे नाते निभावल्या जातील, माणसात माणूसकी, आपलेपणाचा जन्म होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने जगणं सुंदर होईल. 

Sanjivani Ingale

संजिवनी इंगळे, औरंगाबाद