आजही छ. शिवाजी महाराज दिसतात; परंतु ते ओळखता आले पाहिजे

आजही एका स्त्रीच्या जीवनात ज्या काही अडचणी दूर करण्यासाठी जे पुरुष पुढे सरसावतात ते शिवरायांपेक्षा कमी नाही

आजही छ. शिवाजी महाराज दिसतात; परंतु ते ओळखता आले पाहिजे

शिवजयंती झाली तेव्हापासून मनात सारखा विचार सुरू होता की दरवर्षी शिवजयंती साजरी होते. पण आपण फक्त शिवाजी महाराजांचे फोटो, पुतळे, आणि त्यांचे चरित्र या सगळ्यांमधून त्यांना ओळखतो, त्यांना प्रत्यक्ष आपण कधी भेटलेलो नाही, पण कधी ते आपल्याला भेटले तर? असा विचार सुरु झाला ते आपल्याला भेटणार नाही. पण त्यांचे गुण, त्यांचे चरित्र नेहमीच भेटत राहतील आणि या सर्व गोष्टींची जाणीव व्हायला सुरुवात झाली. माझ्यासोबत अचानकच एक प्रसंग घडला. एकदा मी प्रवास करत असतांना बसमधून उतरले आणि मला रोड ओलांडायचा होता परंतू रोड इतका वाहत होता की मला तो पार करण्याची संधीच मिळत नव्हती. पाच-सात मिनिटे मी बॅग आणि मुलगा घेऊन सारखी गाड्या थांबण्याची वाट बघत होते. आणि तेवढ्यात एक रिक्षावाला तिथे पोहोचला, मी उभी होते, तिथे माझ्या बाजूने रिक्षा घेऊन त्याने मला खुणावले, माझ्या लक्षात आले की तो काय म्हणतोय, माझ्या रिक्षाच्या बाजूने चला... मी त्याच्या रिक्षासोबत चालत रोड क्रॉस केला. त्या दिवशी शिवजयंती होती. रोड क्रॉस झाल्यानंतर मला वेगळच वाटलं. मला जाणीव झाली की मला भेटलेला हा शिवाजी महाराज तर नसावा ना?

कारण आम्ही कधीही भेटलेलो नव्हतो किंवा ओळख नव्हती. परंतु त्यांने एका स्त्रीला मदत केली, त्या दिवसापासून मला आजपर्यंत भेटलेल्या प्रत्येक मुलांमध्ये, पुरुषांमध्ये शिवाजी दिसू लागला...

ऐकायला खुप सहज आणि छोटी गोष्ट वाटते ही... पण विचार केला तर, या छोट्या गोष्टीमागे दडलेले रहस्य खुप मोठे असते. शिवरायांनी स्त्रीचा सन्मान केला. गरीबांना आधार मिळवून दिला स्वराज्याची स्थापना करून दिली हे सगळं खरे आहे. पण आजही एका स्त्रीच्या जीवनात ज्या काही अडचणी दूर करण्यासाठी जे पुरुष पुढे सरसावतात ते शिवरायांपेक्षा कमी नाही. नोकरी करत असलेल्या ठिकाणी पुरुष वर्गाकडून मिळालेला सन्मान महिलांना मनमोकळं जगण्याचं तसेच आपल्या कलागुणांना सादर करण्याची संधी प्राप्त करून देत असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे जो पुरुष आपल्या पत्नीला स्वतंत्र विचारांनी जगण्याचा अधिकार बहाल करतो तोच सर्वात श्रेष्ठ पुरुष मानावा आणि मला माझ्या पतीच्या स्वरुपात शिवरायांचे दर्शन घडले, त्या दिवसापासून माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक पुरुषात मला शिवराय दिसू लागले, प्रेरणा देणारे, कौतुक करणारे, सतत पाठीशी उभे असलेले, जीवनाविषयी सकारात्मकता जागवणारे, मेहनतीला कौतुकाची थाप देणाऱ्या प्रत्येक पुरुषात शिवरायांची छबी लपलेली असते. असे मला वाटू लागले. हे सत्य आहे कारण एका यशस्वी महिलेमागे सुद्धा शिवरायांसारख्या महान पुरुषांचा हात असतो. मग ते कुणीही असो, वडील, भाऊ, पती, मुलगा, मामा, काका, सखा किंवा समाजातील प्रत्येक पुरुषाला याचे श्रेय जाते. कारण देश हा फक्त स्त्री किंवा पुरुषांनीच नाही फलत-फुलत तर त्यासाठी दोघांचेही सहकार्य समान असावे लागते, असे मला वाटते.

ज्याप्रमाणे गाडीला दोन्ही चाकं असल्याशिवाय ती मार्गरत होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे महिला व पुरुष एकमेकांच्या सहकार्याशिवाय कल्याणकारी युग घडवू शकत नाही.
धाग्या धाग्यांनी जुळला तर होतो नात्यांचा गुंफा. सहकार्य आणि आपुलकीचे रंग त्यात भरल्यानंतरच दोघांचीही प्रगती शक्य होते. असे मला वाटते.

प्रत्येक वळणावर स्त्रीयांच्या पाठीमागे कुणीतरी पुरुष उभा असतो. तोच शिवराय व परमेश्वराचे रूप असतो. धावपळीच्या जीवनात हा विचार करायला कुणालाच वेळ नाही. पण काही गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात. आपण सर्वाच्या सहकार्याने जगू लागलो तर स्त्री आणि पुरुष हा भेदच निर्माण होणार नाही.

कितीतरी वेळेस रिक्षावाला मुलींना किंवा स्त्रीयांना अंधार होत असेल तर सुरक्षित ठिकाणी सोडतो. बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये स्त्रीयांना जागा नसेल तर पुरूष ऊभे राहतात. आणि स्त्रीयांना जागा देतात. अनोळखी माणसांमध्ये कुणीतरी ताई म्हणून संबोधतो, घाबरू नको ताई मी तुझ्यासोबत आहे. असे बोल ऐकले की सुरक्षित वाटू लागते. अनेक नोकरीच्या ठिकाणी स्त्रीयांचा मान-सन्मान करणारे पुरुष हे शिवरायांपेक्षा कमी असूच शकत नाही.

शेवटी स्त्रीया ह्यासुध्दा इतक्या बलाढ्य नाही की त्या पुरुषांच्या सहकार्याशिवाय पुढे जाऊ शकतील. ऊडण्यासाठी पंखामध्ये प्रेरणांचे बळ देणारे पुरुषच असतात. महाराणी जयवंतादेवी, सावित्रीबाई फुले, माॅसाहेब जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सिंधूताई सपकाळ यांना सुद्धा पुरुषांचे सहकार्य होते. म्हणूनच त्यांनी समाजातील रूढी परंपरा जुगारून लावण्याचे वीरपन दाखवले. सकारात्मक दृष्टीकोन ठेवला की सगळे जग सुंदर दिसायला लागते.  कुणाला तरी मानाचे चार दोन शब्द समर्पित केले तर त्याचे कर्तृत्व उठून दिसायला लागते. पुरुष हा वाईटच असतो किंवा असेलही असे नाही. प्रत्येक कुटुंबातील स्त्रीया आधी कुटुंब, गाव, शहर, आणि मग देश याप्रमाणे सुखी, आनंदी आणि सुरक्षित असतात. म्हणून अभिमान वाटतो मला माझ्या, भारत देशाचा. या देशात अनेक जाती धर्माचे पुरुष असुनही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया झेप घेत आहेत. हे केवळ स्वतः आत्मविश्वासानेच शक्य होत नाही, तर सहकार्य, सद्भावना, प्रेरणा, सुरक्षितता या सगळ्या गोष्टींमुळे हे शक्य होत आहे.

अपवाद हा प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. काही पुरूष या गोष्टींना अपवाद असू शकतो. नाहीतर बलात्कार लैंगिक शोषण यांसारख्या गोष्टी घडल्याच नसत्या. परंतू काही वाईट व्यक्तींमुळे संपूर्ण पुरुषजाती कठोर आणि सहानुभूतीहीन किंवा आदरहीन आहे. असे समजणे चुकीचे आहे.

ज्याप्रमाणे स्त्रियांचे कौतुक प्रत्येक क्षेत्रात होत असते. ते सर्व पुरुषच करत असतात, कारण कौतुक आणि प्रेरणेमुळेच दुःखाचे डोंगर चढण्यासाठी ऊर्जा मिळत असते. म्हणून सर्व पुरुष जातीला आमच्या महिलांचा सलाम आमची शान तुमच्यामूळेच आहे. असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. तसेच वर्दीतल्या प्रत्येक पुरुषाला बघून मनात गर्व आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशा वीर जवान आणि पोलिसांना सुद्धा प्रणाम.

manisha-maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
परसोडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद