सकाळचं वातावरण जरा उदास होतं आभाळ भरून आले होते राधा टिपं गाळत खिडकीतून बाहेर बघत होती, आज तीचा मुलगा आरव सहा वर्षाचा झाला पण ती अविनाशच्या आठवणीत गढून गेली, ती स्वतःला एकच प्रश्न विचारत होती अविनाश असं का केलं मला सोडून का गेलात? आपल्या बाळाच्या ओढीने ही पावले वळाली नाहीत तुमची, पश्चातापाच्या आगीत नुसती होरपळत होती.
आजही तिला आरशाप्रमाणे सगळे स्वच्छ आठवत होतं अविनाशच्या घरात आई वडील व लहान भाऊ होते, आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मुलांची शिक्षणं केली. स्वतः कष्ट करून मुलांना काहीही कमी पडू दिले नाही मिरची भाकर खाऊन दिवस काढले पण मुलांना बाहेर चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले. अविनाश दोन वर्षांपूर्वीच आयटी इंजिनियर झाला व कॅम्पसतर्फे त्याला चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्याला चांगल्या मुलींची स्थळे सांगून आली त्यात राधाला पाहिल्याबरोबर तो राधाच्या प्रेमात पडला आणि लाडावलेल्या सुस्थितीतील घरातील राधाशी त्याचे थाटामाटात लग्न पार पडले. लग्नानंतर अविनाश आई-वडिलांना घेऊन आला व आता तुम्ही कष्ट करायचे नाही गावाकडे राहायचे नाही असे सांगून ते त्याच्याबरोबरच राहू लागले, परंतु राजा राणीचे स्वप्न बघणाऱ्या राधाला हे खटकू लागले ती अविनाशशी भांडू लागली, त्यांना गावाकडे ठेवू हवे तर पैसे पाठवू परंतु अविनाश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आई-वडिलांनी हाडाच काडं करून त्याला मोठं केलं ते सुख वैभव त्याला त्यांच्या चरणी अर्पण करायचे, अशा संस्कारात विचारात वाढलेल्या अविनाशचा कोंडमारा होऊ लागला तो राधाला समजवायचा आई-बाबा असले तरी त्यांची आपल्यावर मायाच राहील, माझ्या सुखासाठी ते दोघेही आपल्या आयुष्यातून जातील पण मला हे करायचं नाही. आजपर्यंत कष्ट करणारा बाप अंगात धड चांगले कपडे घातलेला मी बघितला नाही आणि कष्ट करणारी माऊली याच आशेवर होती माझी मुलं मोठे होतील मग सुखाचे दिवस येतील. पण ती त्याचे काहीही ऐकत नव्हती.
राधाला दिवस गेले ती आई होणार होती अविनाश व त्याची आई बाबा खूप आनंदात होते अविनाशची आई तर सुनेला काहीच करू देत नव्हती अविनाशला प्रेमाने जेवू घालने, त्याचं सगळं करण्यात तिला आनंद वाटे पण राधाला आपल्या नवऱ्यावर असलेला आईचं वर्चस्व पाहवत नव्हते. राधा घालून पाडून बोलणे, अविनाशशी अबोला धरणे, सारखं खोलीत पडून राहणे त्यामुळे अविनाश दुखी होता. त्याने राधाला तिच्या माहेरी बाळंतपणासाठी पाठवले, थोड्याच दिवसात राधाने सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. ही बातमी ऐकून अविनाश व त्याच्या आई-बाबांना खूप आनंद झाला, अविनाश दुसऱ्याच दिवशी राधाला पेढे घेऊन भेटण्यासाठी गेला परंतु राधाने त्याच्याकडे बघितले नाही, बोलली नाही. मुलाला बघून तो निघण्यासाठी वळाला तेवढ्यात राधा म्हणाली "मला घरी घेऊन जाण्यासाठी येशील तेव्हा माझ्या घरी मला तुझ्या आई बाबा नकोय, तरच बाळाला व मला घेण्यासाठी ये..." हे ऐकून अविनाशच्या पायाखालची जमीन सरकली तो सैरभैर अवस्थेत घरी आला, रात्रभर त्याला झोप लागली नाही. सकाळी त्याचा उदास चेहरा बघून आई म्हणाली तुला बरं नाही का? पण तो कसं तरीच हसला आणि म्हणाला "आई इकडे ये, मला तुझ्या मांडीवर झोपू दे." आई खाली बसली अविनाश आईच्या मांडीवर झोपला, आई हळुवार त्याच्या केसातून हात फिरवत म्हणे बाळाला लवकर घरी घेऊन ये... तुझ्या बालपणात मला कामामुळे तुझ्यावर प्रेम लाड करता आले नाही. आता माझ्या नातवाला फुलासारखं ठेवेन. हे ऐकुन त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले, आईच्या हाताला ओले लागले. म्हणून आई म्हणाली अविनाश का रडतो बाळा मी आजपर्यंत माझ्या लेकराच्या डोळ्यात एक थेंबही येऊ दिला नाही मला तुझं दुःख सांग, राजा...! तुझ्या चेहऱ्यावरील हसूसाठी मी काहीही करेन अविनाश हसला व म्हणाला" आई माझं आयुष्य हसरं व सुंदर ठेवण्यासाठी तू फार केलंस आता माझी पाळी आहे." तशी आई म्हणाली "नाही बाळा आई लेकरात माझं तुझं नसतं." आई फार काळजी करेन म्हणून अविनाश म्हणाला "काही नाही तू माझ्यासाठी छान जेवन बनव." तशी आई किचनमध्ये गेली.
अविनाशने राधासाठी खूप मोठं पत्र लिहिलं बाळासाठी तिच्यासाठी सर्व पैसे पॉलिसी आयुष्यभर त्या सर्व कल्पना दिली व शेवटी लिहिले "तुला फक्त तुझ्या तालावर नाचणारा नवरा पाहीजे पती नाही. तू माझ्या बाळाला आईकडे सोडून तसला नवरा करू शकते, मला प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून ज्या माय बापाने सगळं सुख दिलं ते माझ्या बाळाला अनुकूल परिस्थितीत नक्कीच चांगला आदर्श मुलगा घडवतील यात शंका नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो म्हणून माझं प्रेम स्वार्थी नाही.तू नसली तर मी जगणार नाही. म्हणून मीच घरातून निघून जात आहे." ती चिट्टी आज पुन्हा वाचत राधा पश्र्चातापाच्या आगीत जळत होती आणि अविनाशची वाट बघत होती.
सौ. मनीषा शंतनु कांदळकर,
येवला, जि. नाशिक