पाहीले ना त्याने तीला ना तीने त्याला

तर असं म्हणतात की प्रेमात एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटलच पाहीजे, जाणलं पाहीजे, ओळखलं पाहीजे त्याची पारख केली पाहीजे ,म्हणजे ते अजन्म टिकून राहील, परंतू काही प्रेमाची नाती अशी असतात कि अगदी ऐकताच कुणीही अचंबीत व्हावं

पाहीले ना त्याने तीला ना तीने त्याला

मित्रांनो खरं तर प्रेम म्हणजे काय, तर प्रेम म्हणजे, इश्वराचा अंशच नाहीका आणि ते केलं जात नाही तर अपसूक होतं, मन आणि भावना जुळल्या की प्रेमाचा साक्षात्कार ठरलेला... हल्ली लोकांनी प्रेमाचा बाजार जरी मांडला असला, तरी प्रेम ते प्रेमच आहे गड्यांनो त्याला अजूनही कुठला सिकंदर जबरदस्तीने करु शकत नाही आणि कुणी नवकोटनारायण विकत ही घेऊ शकत नाही, सध्या प्रेमाचा सप्ताह सुरु आहे तर म्हटलं एक अस्सल नी निरागस प्रेमाची सत्य कहानी तुमच्या समोर मांडावी....

तर असं म्हणतात की प्रेमात एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटलच पाहीजे, जाणलं पाहीजे, ओळखलं पाहीजे त्याची पारख केली पाहीजे ,म्हणजे ते अजन्म टिकून राहील, परंतू काही प्रेमाची नाती अशी असतात कि अगदी ऐकताच कुणीही अचंबीत व्हावं नी ज्याने प्रेम निर्माण केलं त्या सर्वेश्वरानेही त्यांना नमन करावं...

एक अशीच कहानी जी कुठल्या पुराणातली नव्हे तर आहे आताच्या सद्य काळातली, ऑनलाईन जमान्यातली, त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे तो एक हाडाचा लेखक आणि तीच्या बद्दल सांगायचं झालं तर ती एक गृहीणी, वडीलांनी तीचं लग्नं एका श्रीमंत माणसाबरोबर धुमधडाक्यात लावून दिलं, होणारा नवरा तीच्या रुपावर नी देहावर भाळला नी तीच्या वडीलांकडे तीची मागणी केली आणि झालं लग्न पार पडलं पण दोन देहाचं, दोन मनाचं नाही, सुरुवातीचे नवे दिवस लाजत हसत उत्तम गेले पण हळु हळु तीच्या नव-याला तीचं रुप डोळ्यात सलायला लागलं, तीचं कुणाशी बोलणं हे ही सहन होईना, नित्यच तीला घालुन पाडून बोलणं, सर्वांसमोर अपमान, टोमणे टामणे तर रोज जेवताना ठरलेले... बघता बघता संसारवेलीला फुलं आली पण त्याचा अत्याचार काय थांबेना; ना त्यांच्या संसारात चैतन्य , ना त्यांच्या नात्यात समाधान... घरात सर्व काही, गाडी, बंगला, नोकर सर्व पण मन मात्र लागत नसायचं तीचं... आणि अशातच तीला कुठून एका साहित्य ग्रुपची लिंक भेटली आणि त्यात ती ग्रुपला जॉईन झाली...

आणि हे खरच आहे की साहित्य वाचन केल्याने माणसात परिवर्तन घडतच पण माणुस सकारात्मक ही राहतो... आणि त्यात जर काही विशेष वाचायला भेटत असेल मग तर सांगणेच नको...
त्या ग्रुपवर एका लेखकाचे लेख, काव्य ती नेहमीच वाचायची सतत वाचायची आणि रोज वाट ही पहायची आज काय लिहीतोय याची, एके दिवशी त्याने त्या विषयावर लिहीलं जे वास्तव ती स्वतः भोगत होती व तीला  राहवलं नाही घरी तो नसताना तीने त्याला कॉल केला, लेखणीचं कौतूक तर केलच पण नकळत तीची व्यथा ही त्या लेखकासमोर जणु हक्काने मांडली...

शेवटी साहित्यीक मन हे संवेदनशिल असतं त्याने ही तीला धीर दिला व हक्काने मन मोकळं करत जा असं सांगितलं, मग ते नित्यच बोलत राहीले, कित्येक महिन्यानंतर एके दिवशी त्याच्या ओठातून एक इच्छा जन्मली कि आपण एकदा भेटायचं का? त्यावर ती 'नाही' बोलली कारण 'मला कुठेही स्वतःहुन जायचा अधिकार नाही, मी कुणालाही भेटू शकत नाही, माझं ऐव्हढच नशिब आहे की कॉलवर तुमच्याशी बोलत आहे,  बरेच दिवस त्याचा हट्ट नी तीचा नकार चालत राहीला थोडेफार त्यांच्यात वाद ही झाले.  मग एकांतात त्याने ही विचार केला की जाने दो आणि तो तीला म्हणाला '  'एक बोलू नाहीतरी भेटून आपण कोणता वेगळा दिवा लावणार आहोत', चुंबन, मीठी, जेवन, गप्पा फार फार तर शेवटी "सेक्स", दुसरं काय जे चालु आहे तेच चांगलं आहे, माझ्याशी केवळ बोलुन जर तूला आनंद मीळतोय, तुझं मन हलकं होतंय चलो हेच प्रेम आहे, अजून काय हवय, आणि दोघे ही संसारीक आहोत, योगायोगाने एकमेकात गुंतलो, उगीच भेटून, एकरुप होऊन, तू तुझ्या नव-याची नी माझ्या बायकोचा अपराधी होण्यापेक्षा, कळत न कळत त्यांचा विश्वास तोडण्यापेक्षा, आपण जे चालु आहे रोजचा संवाद तोच कंटीन्यू करुयात, काय म्हणणं आहे तूझं यावर...

तीला तर वाटलं होतं कदाचीत माझ्या वारंवार नकारतेला हा सोडून जाईल मी पुन्हा एकटी पडेल, पण त्याच्या अशा बोलण्याने ती निशब्द झाली, तीला काय बोलावं ते सुचेना, तीचे डोळे डबडबले आणि ती म्हणाली, राजा पुढचा जन्म जर माणसाचा भेटलाच मला तर तुझी इच्छा नक्की पुर्ण करीन, एका जन्माचं राहीलेलं अलींगन देईनच देईन तुला...

मग काय त्यानंतर ते अधुन मधुन वेळ भेटेल तसा कॉलवर बोलतात, हसतात, ना अपेक्षा, ना कसली अट, ना कसलं काय.., हं एक वाक्य मात्र त्यांच्या नात्यातून डिलीटच झालंय ते म्हणजे "आपण कधी भेटायचं". आणि हो ते कधीच एकमेकांना लव्ह यू म्हणाले नाहीत, पण प्रेम कसं व्यक्त करावं हे त्यांच्याकडून शिकावं, आज पाच वर्ष होत आले ते एकमेकांच्या संपर्कात आहेत... शुल्लकशा गोष्टीवरुन ब्रेकअप करणारी हि पिढी, कधीच एकमेकांना स्पर्श न करता, न भेटता, न दिसता, एकमेकांशिवाय त्यांच्या सारखं.. राहु शकेल का? ते रहावं त्या दोघांनीच... मला जर कुणी विचारलं ना की गजानना प्रेम म्हणजे काय तर मी सरळ त्या दोघांना समर्पित केलेला हा लेख त्याच्या ओंजळीत टाकेन..!

gajanan-ufade

गजानन ऊफाडे