दृष्टी आणि दृष्टीकोन

नात्यांमध्ये अनेक चढउतार येतात, वेगवेगळ्या परिस्थिती येतात, या सगळ्यांकडे बघण्याचा सगळ्यांचा आपापला अंदाज असतो. आणि हा अंदाज म्हणजेच दृष्टिकोन होय.

दृष्टी आणि दृष्टीकोन

मानवाचे शरीर पंच महाभुतांनी बनलेल आहे. पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नि. या प्रत्येक गोष्टींचे आपले आपले वेगळे महत्व आहे. जसे पृथ्वी वर गुरुत्वाकर्षण असल्याने सर्व गोष्टी स्थिर आहेत, अग्नीत तेज आहे. जे जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे. पाणी जीवाला तारणारे आहे. वायू जगवणारा, आणि आकाश सगळ्यांना सामावून घेणारे छत्र. ह्या गोष्टी दिसायला सगळ्यांना सारख्याच दिसतात पण समजून प्रत्येक जन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतात. हाच दृष्टकोन आहे. समाजात जगत असताना अनेक घटना, गोष्टी, अपघात घडत असतात नात्यांमध्ये अनेक चढउतार येतात, वेगवेगळ्या परिस्थिती येतात, या सगळ्यांकडे बघण्याचा सगळ्यांचा आपापला अंदाज असतो. आणि हा अंदाज म्हणजेच दृष्टिकोन होय. डोळे फक्त एखाद्या वस्तूचे घटनेचे दर्शन आपल्याला घडवते पण त्याचे गांभिर्य आपल्या विचारांवर अवलंबून असते. प्रत्येक परिस्थीवर सगळ्याची वेगळी मते असतात, कारण त्या गोष्टीविषयी कोन कशा पद्धतीने विचार करतो यावर ते अवलंबून असते. यातूनच दृष्टीकोन ही संकल्पना जन्म घेते. एकदा एका चित्रकाराशी भेट झाली आणि चित्र बघत असताना एक लोखंडाच्या पाईपवरती एका डोळ्यांची प्रतिकृतीसारखी भासणारी प्रतिमा दिसली परंतू त्यातून काय सिद्ध होतंय किंवा ते कसले चित्र होते हे मला कळत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले की हे काय आहे. त्यांनी जे मला सांगितले त्यातून मला एका जीवंत कलाकाराचे दर्शन झाले. त्या चित्रातून त्यांनी डोळे (दृष्टी) आणि दृष्टीकोन या दोन्हींचे संबंध दर्शवले होते. त्या डोळ्याच्या आजूबाजूने अंगारे उडण्याचा भास होत होता. म्हणजे या डोळ्यांमध्ये एखाद्या चांगल्या कामाला न्याय देण्याची चिंगारी उडतांना दिसत होती. दुसऱ्या डोळ्यात सूर्याचे तेज दिसत होते. अशा अनेक डोळ्यांच्या आकृत्या आणि त्यातून मानवाचा दृष्टिकोन दर्शवला होता. आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा घटनेविषयी ऐकतो तेव्हा ते फक्त एक चित्र स्वरूपात असते पण त्या व्यक्ती किंवा घटनेच्या तळापर्यंत जाऊन बघणे आणि मग त्या गोष्टीचा विचार करणे म्हणजे दृष्टिकोन.

आज समाजात अनेक गंभीर गोष्टी जन्म घेत आहेत, त्याचा खोलवर विचार करणे काळाची गरज आहे. रोजच जगत असताना सहज आपण कुणालाही नाव ठेवतो, एखाद्या विषयी चुकीचे बोलतो, ठीक आहे एखादी व्यक्ती चुकीचे वर्तन करत असेल पण ते करण्यामागे काय कारण असेल याचा आपण कधी विचारच करत नाही. दुसऱ्यांना नाव ठेवत कुठेतरी स्वतःला वाईट बनवत असतो, स्वतःहाचा दृष्टिकोन खराब करत असतो. दृष्टी आणि दृष्टिकोन ह्या दोन्हीही वेगळ्या संकल्पना आहेत. दिसणे म्हणजे डोळ्यांना रंगांची किंवा त्या वस्तूची, चित्राची, प्रसंगाची माहिती मिळते. पण ज्यावेळेला आपण त्या गोष्टीचा विचार कशाप्रकारे करतो आणि त्याचा अर्थ काय लावतो यावर त्याचा दृष्टिकोन अवलंबून असतो. व्यक्तीचा दृष्टिकोन हा त्याच्या विचारांवर अवलंबून असतो. उदा. एखाद्या हतबल व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. जसे कोणी म्हणेल की त्याची काम करण्याची मानसिकता नाही. कोणी म्हणेल तो परिस्थीतीने थकलाय, एखादा त्याला त्याच्या अस्वस्थतेचे कारण विचारेल, किंवा एखादा त्याला मदत ही करेल. अशा प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतील. जग सुंदर आहे आणि ते बघण्यासाठी आपल्याकडे सुंदर दृष्टिकोन हवा. दृष्टिकोन बदलला म्हणजे अपोआप जग बदलेल आणि आपणही.

Manisha Maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
मु.पो. परसोडा, ता. वैजापूर