सगळेच त्याच्या मुळावर उठलेय, दुष्काळ, महापूर अन् सरकारही

एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या देशात आता शेतकऱ्यांच्या सरणाचा धुर निघतोय, कुठं नेऊन ठेवलाय भारत माझा! शेतकऱ्याला कर्जमाफी नकोय हो, कर्जमुक्ती हवीय जी माझ्या राज्यांच्या काळात होती

सगळेच त्याच्या मुळावर उठलेय, दुष्काळ, महापूर अन् सरकारही

एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या देशात आता शेतकऱ्यांच्या सरणाचा धुर निघतोय, कुठं नेऊन ठेवलाय भारत माझा! शेतकऱ्याला कर्जमाफी नकोय हो, कर्जमुक्ती हवीय जी माझ्या राज्यांच्या काळात होती,  शेतकऱ्याच्या मालाला हात लावणाऱ्यांचे हात कलम केले जातील असे आदेश होते. माझ्या राजाच्या काळात मग, कुठं नेऊन ठेवलंय माझ्या शिवाजी राजांचे स्वराज्य? कुठंय? तो सुजलाम सुफलाम महाराष्ट्र? महाराजांनी एवढे किल्ले बांधलेय एकावरही आपलं नाव लिहलं नाही. अन् दुसरीकडे आजचे नेते शौचालयावर पण आपलं नाव लिहतात, लाज वाटते अन् हसू देखील येतं, आवडायला अन् निवडायला कोणी राहीलच नाही. जो तो स्वतःची पोळी भाजण्यात दंग आहे. आपल्याच पोळीवर प्रत्येक लबाड राजकारणी तूप लावायचा प्रयत्न करतोय, मला हेच कळत नाही जर इथल्या शेतकऱ्याला कर्जबाजारीपणाला कंटाळून जर  आत्महत्या करावी लागत असेल, तर आम्ही कुठल्या जोरावर झेंडा मिरवतोय की माझा देश कृषीप्रधान आहे.  देशाचा आधारस्तंभ असलेला शेतकरी कुठं आहे. त्याच अस्तित्व कुठं आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली तर इथल्या व्यवस्थेतील लोकं म्हणायला लागतात, शेतकरी त्यांच्या प्रेमप्रकरणामुळं आत्महत्या करतात. मला ही तेच म्हणायचं आहे की शेतकरी प्रेमापोटीच आत्महत्या करतो, पण ते प्रेम जरा वेगळं आहे हो, त्याचं प्रेम काळ्या मातीवर आहे. अन् ती काळी आई जरी साथ देत असली तर इथली व्यवस्था पिकाला भाव देतच नाही. जास्त नाही हो पण किमान त्याच्या कष्टाचा मोबदला मिळेल एवढा तरी भाव द्या! तुम्ही दुधाचे पदार्थ करून विकता त्याचे भाव कुठं अन् शेतकऱ्याकडून घेतलेल्या दुधाचा भाव कुठं! एवढंच काय बटाटा कुठल्या दरात घेतला जातो अन् चिप्सचे भाव काय आहे. जरा विचार करा सरकार, भटाला दिली ओसरी अन् तो हात पाय पसरी, 
या म्हणीप्रमाणे इथे राज्यकारभार  चालू आहे.

बिस्लेरी २० रुपयाला घेता आणि त्यात ९५० मिली पाणी असतं. गॅस सिलेंडर ९६० रुपयालाच मिळतं,
रिचार्ज ३९९ लाच करता एक रुपया कमी करा अस कुणी म्हणत नाही. मग शेतकऱ्याच्या मालाचा का भाव ठरवता? मेथीची भाजी १० ची का ५ मध्ये मागता, टमाट्याचा रस्त्यावर लाल चिखल होत आहे. शेतकऱ्याचे दुध सरकार २० रूपये लिटरने विकत घेते. पाण्याचा आणि दुधाचा भाव सारखाच. मानसिकता बदलायला कोणीच तयार नाहीये, सरकार शेतकऱ्याचा माल अत्यंत तुटपुंज्या किमतीत विकत घेते, आणि त्यामुळे शेतकऱ्याचा विकास होणे कधीच शक्य नाही.  

सरकारमधील पुढारी भाषणे ठोकतात. शेतकऱ्याने जोडधंदा करावा. त्याने गाई पाळाव्या, शेळ्या पाळाव्या, कोंबड्या पाळाव्या. डुक्कर पाळावे, आणि नोकरदारांना पाचवा वेतन आयोग, सहावा वेतन आयोग, सातवा वेतन आयोग, आठवा वेतन आयोग, लाख-लाख रूपये महिन्याला पगार, आणि काम काहीच नाही. रविवार सुट्टी, शनिवार सुट्टी, हाप-डे, सणाची सुट्टी, जयंतीची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी,  काम सावलीत आणि सुट्टी उन्हाळ्याची काय गंमत आहे. तरीही लाख रूपये पगार. वा! रे वा! सरकार. शेतकरी रात्रदिवस कष्ट करून देखील त्याच्या पुर्ण आयुष्यात लाख रूपये पाहायला देखील भेटत नाही. जो तो शेतकऱ्यांच्याच मुळावरच उठलाय कोण आहे शेतकऱ्याचा वाली? तर उत्तर येतं कोणीच नाही.

दुसऱ्या बाजूला नैसर्गिक संकटे शेतकऱ्याला सोडत नाही. "देवा" मला तुला विचारायचय आता, का? रं  देवा तू सगळी संकट शेतकऱ्याच्याच वाट्यालाच का आणतो, म्हणतात ना! चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मग मला कळतच नाही. शेतकरी वाईट कर्म करतोच केव्हा, मग सगळी संकट त्यांनीच का भोगायची, पोटाला एकवेळेला पीळ देऊन, सकाळची भाजी संध्याकाळी खाऊन, टमाटे, सोयबीन, बटाटे, पालेभाज्या सगळं क्षुल्लक दरात घेतलं जातं, तरी तो हारायला तयार नाहीये, सगळं नव्याने उभा करायचा विचार करतोय, लॉकडाऊनच्या काळात त्याच्या भाजीपाल्याला, कुठल्याच मालाला भाव मिळाला नाही. तरीही त्यानी  माघार घेतली नाही. सावकाराकडून कर्ज काढून, त्याच्या बायकोच मंगळसूत्र गहाण ठेवून काळ्या आईत बियाणं टाकलंच होतं. मध्यंतरी पावसानं तडी दिली, तरी त्यांनी हाय सोडली नाही. पण निसर्ग इतकं होत्याच नव्हतं करेल वाटलं नव्हतं. माझ्या शेतकरी बापाला, त्याच्या कष्टाचा ही मोबदला मिळत नाही. तोंडात घास आला की त्याचा घास हिरावून घेतला जातो, प्रत्येकवर्षी निसर्ग साथ देईलच असं नाही. कधी दुष्काळी परिस्थितीला तोंड घ्यायचं तर कधी अवकाळी पाऊस. 

सध्या तर पावसाने थैमानच घातलंय, शेतकरी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतात कष्ट करतो, काळ्या आईसोबत त्याचं जन्मोजन्मीच नातं आहे. त्याची जणूकाही नाळच मातीशी जोडलेली आहे. तो कसातरी जगत आलाय आतापर्यंत. त्याचे गुरं, वासरं, गाय, हिरवं रान हे सगळं काही जणू त्याच सर्वस्वच आहे. येवडच आहे हो त्याच्या जिंदगाणीत, त्याचा जीव नुसता टांगणीला लावलाय, निसर्गानं साथ सोडली फक्त जीव काढून घ्यायचा ठेवलाय आता, सगळं कसं त्याच्या डोळ्यासमोर ढगफुटीन वाहून नेलं, पोटाच्या लेकराप्रमाने तो गुरांना जीव लावत असतो, त्याच्या बैलांनी नुसता हंबरडा फोडला ना त्याला कळतं की त्याला तहान लागली की भूक मग तेच बैल पुराने वाहून नेले काय म्हणला असेल त्याचा जीव,   हिरवंरान पाहून तो आनंदी झाला होता. नवीन स्वप्न, उमेद घेऊन तयारी करत होता सकाळ संध्याकाळ पिकाला बघत होता. पिकाने साथ दिली तर सावकाराचं कर्ज फेडून, दिवाळीला माझ्या मुलांना कपडे घेईल तो स्वतःच्याच मनाला सांगत होता, सोयबीन, कापूस, मकाला भाव मिळेल ही अपेक्षा ठेवून माझ्या  लाडक्या चिऊचं दणक्यात लग्न करील असे स्वप्न पहात होता. त्याच्या  पिकांबरोबर त्याचे स्वप्नंही वाहून नेलेत पुराने मग कुठून आणेल तो  पुन्हा नव्याने उभा करायचं सामर्थ्य !  कोण आहे त्याचा वाली? सगळेच त्याच्या मुळावर उठलेय; दुष्काळ, महापूर अन् सरकारही. दुष्काळ ही त्याचे नुकसानच करतोय, महापूरही नुकसान करतोय अन् सरकारकडेही त्याच्या विकासाचे कुठलेच व्हीजन नाही.

स्नेहल लक्ष्मण जगताप,
सिरसगाव, ता. वैजापूर