शेतकऱ्याची बायको मराठी लेख - Marathi Article

शेतकरी आला म्हणल्यावर कष्ट आलेच अन् प्रत्येक मुलीची तयारी नसते कष्ट करायची, कारण सोप्प नसतं ना शेतकऱ्याची बायको होणं, तिला एका रात्रीचा ही आराम नसतो.

शेतकऱ्याची बायको मराठी लेख - Marathi Article

मी आज जरा घरातलं काम पटपट आवरून शेतात गेले होते. आईची नेहमी धावपळ असते कामाबद्दल, शेतातली कामे बंद होतात तरी कधी गं आई! मी सहज विचारलं तिला ती म्हणाली कधीच नाही. नेहमी कामं चालूच असतात. मी पुन्हा विचारलं प्रत्येक स्त्रीला येवढे काम असतं का? ती म्हणाली नाही गं फक्त शेतकऱ्याच्या बायकोला! आणि मग मी लगेच म्हणाले किती काम करते ना आई सोपं नसतं, हं शेतकऱ्याची बायको होणं. हल्ली चित्र फार बदलेले दिसतंय मुलीला नवरा बघतांनाच लोकं म्हणता शेतकरी नको, नोकरीवालाच हवायं मुलगी घरात बसून खाईल. काही काही मुलींच्या आई वडिलांच म्हणणं असतं शेती पाहिजे, पण शेतकरी मुलगा नको त्यांची मुलगी शेतात नाही गेली पाहिजे पण तरीही कोरोनाने लोकांची जरा मानसिकता बदलली असं म्हणता येईल, पण फार मोठ्या प्रमाणात नाही बरं! 

 शेतकरी आला म्हणल्यावर कष्ट आलेच अन् प्रत्येक मुलीची तयारी नसते कष्ट करायची, कारण सोप्प नसतं ना शेतकऱ्याची बायको होणं, तिला एका रात्रीचा ही आराम नसतो. माहेरी ही फार कमी काळ असते ती. एक दिवसच आणि तिथेही तिच्या कामाचे प्रश्न तिला पडत असतात. माझ्या गाईला चारा असेल का? राणातलं तण एका दिवसात खूप मोठं तर नसेल झालं ना? तिचं थोडक्यात कामं सकाळी ५ वाजता उठून चुलीला पोचारा देणं, गाईचं शेण काढणं, गोठा झाडणं, स्वयंपाक, घरातील इतर कामे पटपट आवरून शेतात कामाला जाणं, तिच्या बाळाला ही द्यायला तिच्याकडे फारसा वेळ नसतो. मुलांनाही रानात घेऊन जाणं हे तीचं नेहमीच ठरलेलं असतं. बाळ झोपलेलं असतं तोपर्यंत ती काम पटपट करत असते. बाळ उठल्यानंतरही ती दूध पाजून पुन्हा झोळीत टाकते अन् काम चालूच असतं. आज मी माझ्या बाळाला घेऊन बसले तर उद्या तण मोठं होईल म्हणून ती बाळाकडे जरा दुर्लक्षच करते असं नाही, कारण तिची ममता, प्रेम ते कधीच होऊ देत नसते. आजचं काम म्हणजे उद्याच्या दृष्टीने  कामाचा भार जरा हलका होईल असं ती  तिच्या मनाला वर्षाचे ३६५ दिवस सांगत असते.

पिके आली तर योग्य भाव मिळत नाही. आणि भाव मिळाला तर पिके चांगली येत नाहीत. त्यात निसर्गही साथ देत नाही. कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी अवकाळी पण ती न डगमगता खंबीर असते. एखादं झाडं जसं ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करत असते तसेच तिचं काही! परिस्थिती कशीही असली तरी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तत्पर उभी असते ती. ती एक सामर्थ्यवाण स्त्री असते, प्रत्येक सणाला साडी घेणं, फिरायला जाणे, दागदागिने असावे अशा तिच्या फार अपेक्षा कधीच नसतात. फक्त कष्टातून आणलेल्या पिकाला जास्त नाही पण योग्य भाव मिळावा जेणेकरून माझा संसार सुखात चालेल माझे मुलं शिक्षण घेतील  सुखानं सगळं व्हावं इतकच. ती फार मोठ्या मनाची असते कुणालाही भरभरून मदतीचा हात नेहमी तिचा पुढेच असतो. दारात आलेल्या माणसाला धान्याचं माप भरून वरती ती धान्य देत असते. तिच्या घरात मापाला कधीच महत्व नसतं. भरभरून ती दान धर्म करत असते. पेरणीप्रसंगी स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून आयुष्यभरासाठी मातीत रोज कष्ट करणारं जबरदस्त व्यक्तिमहत्व म्हणजे शेतकऱ्याची बायको.

स्नेहल लक्ष्मण जगताप, 
मु. पो. सिरसगाव, ता वैजापूर, 
जि औरंगाबाद