पांढरा शर्ट आणि धोतर , कमी दिसत असल्यामुळे नर्स चा आधार घेत आत ओटी मधे शिरणारे , ते ऐंशी - पणच्यांणशी वर्षांचे आजोबा , माहीत नाही पण मला भावले..
थोड्या दिवसांपूर्वी त्यांना हेर्पिज झोस्टर(नागीण) झाल्या मुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाला होता आणि त्या मुळे त्यांचा एका डोळ्याची पापणी ,शल्यक्रिया करून डोळ्या ला विश्रांती मिळावी म्हणून बंद करण्यात आली होती…
डोळ्यातल्या जखमा आता भरल्या होत्या आणि म्हणून, परत शल्य क्रिया करून डोळा पूर्ववत करायची ही शस्त्रक्रिया म्हणजे टारसोराफी हे release operation आजोबां वर करायचं होतं.
नेहमी प्रमाणे मी पेशंटशी बोलती झाली - नमस्कार आजोबा ! मी सुंगणी ची डॉक्टर. तुमचं नाव काय ?
"आगोदर तुझं नाव सांग पोरी", ते एकदम बोलून गेले आणि मग ओशाळून म्हणाले... "माफ करा डॉक्टर,मी काही ही बोललो..मास्तर असल्या मुळे ही सवय.. अं! माझं नाव दिनकर गुप्ते.वय वर्ष ८७.. अहो! माफी कसली मागता आजोबा, मी तुम्हाला आजोबा म्हणल्यावर तुम्हाला पोरी म्हणायचा हक्क आलाच की ". मी हसून म्हणाले.
ते गोड हसले आणि दोन्ही हातानी आशीर्वाद द्यायची मुद्रा केली. ऑपरेशन झाल्या नंतर, ओटी मधून त्यांना बाहेर काढतांना मी गंमतीने त्यांना विचारले,,"आजोबा डोळे उघडले ना आता तुमचे?"
आजोबा खुदकन हसले,फार क्वचित असं होतं की शल्यक्रिया झाल्या झाल्या पेशंट असा गोड हसतो!!
"काय झालं आजोबा? का हसला?" मी विचारलं… बेटा! आज खूप वर्षांनी हे वाक्य ऐकलं.. का बरं ?हे असं कोण म्हणायचं तुम्हाला? कोणाची आठवण आली तुम्हाला?"मी उत्साहाने विचारलं. कुणी मला नाही म्हणायच गं,मीच म्हणायचो माझ्या विद्यार्थ्यांना... अच्छा! मास्तर होतो मी..18 वर्षांचा होतो तेंव्हा पासून शिक्षक म्हणून खेड्याच्या शाळेत लागलो. मग स्वतः ही शिकायचं आणि शाळेत ही शिकवायचं, असा शिक्षणाचा कठीण प्रवास केला.1951 पासून ते 1986 पर्यंत... मी हाडाचा मास्तर...येत नाही,समजत नाही, जमत नाही हे शब्द ऐकून घ्यायला तयारच नसायचो.. खूप मेहनत करून घ्यायचो विज्ञार्थ्यां कडून आणि स्वतः पण खूब राबायचो त्यांच्या सोबतीला.बरेचदा यश मिळाले आणि बरेचदा नाही पण! खूप दा माझा तळतळाट देखील व्हायचा, मी विद्यार्थ्यांसाठी इतकी मेहनत घेतो मग हे स्वतः साठी का परिश्रम घेत नाहीत? काही विद्यार्थी काही करा कसे तरी आणि जेमतेमच पास व्हायचे.. !! पण हार मानायची नाही म्हणून मी जुंपलेलो असायचो..
माझ्या पद्धतीने! कधी लाडी-गोडी ने, कधी छडी ने!मी तर फक्त त्यांच्या भल्या साठी झटायचो,त्यापली कडे काहीच हेतू नसायचा. या विद्यार्थ्यांना अजून वेगळी हाताळणी लागू शकते ह्याची कल्पनाच नव्हती हो मला. हं!! तेव्हा कुठे डिसलेक्सिया (dyslexia) ह्या प्रकाराची माहिती होती... काही वर्षांनी जेव्हा हे प्रकरण कळलं, अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे आपसूक डोळ्या समोर येवून उभे राहिले... मला जाणीव झाली की खूप खूप वाईट वागलो मी त्यांच्याशी! हा प्रकार कळला ,त्या बद्दल चे संशोधनं समोर येवू लागले,त्या मुलांना कशी वेगळी हाताळणी लागते हे समजायला लागले तेव्हा असं वाटलं ते माझे सगळे विद्यार्थी माझ्या समोर एकत्र उभे राहून मलाच विचारतायत , काय मास्तरजी, डोळे उघडले ना तुमचे ?
आपल्या अज्ञानाची जाण होणं आणि ते मान्य करणं फार गरजेचं असतं.
मला माहीत नाही माझ्या मुळे किती मुलं - मुली दुखावल्या गेली असतील,किती मुलांवर मानसिक आघात झाला असेल ,किती मुलं कायमचे न्यूनगंडाने ग्रस्त झाले असतील, आणि ते फक्त यामुळे की माझे च डोळे बंद होते!! सामान्य मुलांना जी अक्षरं, अक्षरं दिसतात ती त्यांना तशी दिसायची नाही आणि मी आपला त्यांना उडाणटप्पू किंवा आळशी समजून त्यांच्यावर चुकीचा पध्दतीने मेहनत घेत बसायचो , निराश-हताश व्हायचो...त्यांना वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग लागतं या बाबतीत माझे डोळे पूर्ण पणे बंद होते हो...""
आजोबांना काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….
डॉक्टर आरती केळकर.
नागपूर.