मित्रानो नमस्ते कालच्या लेखात आपण वाचलत की प्रेम म्हणजे काय , ईश्वराचा अंश आणि प्रेम म्हणजे सर्वेश्वराचा सर्वोत्तम उच्च अविष्कार... तसं म्हणायलं गेलं तर प्रेमात काहीजण सर्वस्व गमावतात आणि काहीजण खुप काही कमावतात, हृदयात, मनात नी अंतकरणात अजरामर होतात... आजची कहानी अशीच आहे... खुप काही शिकवून नी देऊन जाणारी...
या कहानीतल्या "ती" च्या बद्दल काय सांगावं ,तीने जे भोगलं ते वाचून, ऐकुन स्त्रीत्व तर थरथरेलच पण पुरुषी मन ही हुंदके दिल्याशिवाय राहणार नाही ,तर ती एका मध्यम वर्गीय परिवारातली लाडकी लेक, वडील कमावते ,आई गृहीणी, इंग्रजी माध्यमात ती लहाणपासुन शिकली,, तीचा शब्द म्हणजे घरच्यांसाठी आज्ञा आणि हुकूमच ,ती जणु राजकुमारीच पण जसं एखाद्या रयत संपन्न राज्याला विरोधी राज्याची नजर लागते, काळाचं विघ्नं लागतं ,तसं या राजकुमारीच्या आयुष्याला एक भयाण नजरच लागली, आणि त्याला कारण झालं तीचं पहिलं प्रेम ,ती तीच्याच महाविद्यालयात शिकणा-या एका मुलाच्या प्रेमात पडली आणि ते हळु हळु सर्वांनाच माहित झालं... तीला तर घरुन भयंकर बंधनं आली..लाडकी असणारी ती आता घृणेचा विषय बनली..ज्याच्या त्याच्या डोळ्यात सलायला लागली...
सर्वांनी तीला समजावलं त्या मुलाचा नाद सोड त्याची कुवत नाही तुझ्यावर प्रेम करण्याची, पण प्रेम शेवटी आंधळं ना, तीने त्याच्या सोबत सैराट करायचा अंतीम निर्णय घेतला आणि त्यात यशस्वी ही ठरली... पण तीच्या घरच्यांनी स्पष्ट सांगितलं सर्वांना, ती आमच्या साठी कायमची मेली आहे, तीचा पाऊल ,आमचं वंश आणि पिढी हयात असे पर्यंत ,या घरात ,या गावात पडणार नाही... तीच्या कानावर हा घरच्यांचा परखड निर्णय आला आणि तीला अगदी सेकंदात सगळं संपल्यासारखं वाटलं.जवळ जवळ संपलच होतं..पण तीच्या नव-याने तीला धीर दिला ,मी आहेना, नको काळजी करु काही दिवसांनी येतील ते भेटायला... पण असं काही झालं नाही... इकडे हिचा संसार सुरू झाला.. ती आता आई ही झाली, तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला... पण तीला एका तिमीरमय सत्याला सामोरं जावं लागलं ते सत्य म्हणजे, ज्याच्यासाठी आपण घरच्यांसोबत वाईट झालो..सर्व काही सोडलं... ज्याच्या मुलाची आई झालो ,तो व्यक्ती बाहेरख्याली आहे?.. त्याचे एका महिलेसोबत संबंध आहेत? व तीला याच्या पासुन दोन मुलं आहेत? त्यांच्यात बरेच वाद झाले सतत खटके उडू लागले... आता तर त्याने तीला मारायला ही सुरुवात केली, अखेर नाईलाजाने त्यांच्यात घटस्फोट झाला... व तीने उर्वरीत आयुष्य संपवायचा निर्णय घेतला... .
अंधारात वाट दिसेल तीकडे ती जात होती, पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी..त्याच गावातली तीची मैत्रीण तीने तीला घरी आणले, धीर दिला व सांगितले, मृत्यू म्हणजे पर्याय नव्हे तू जगायला शिक... ती तीच्या मैत्रीणीकडेच राहु लागली... तीच्या मैत्रीणीला एक अविवाहीत भाऊ होता... मैत्रीणीने तीला सांगितले की तुम्ही दोघे विवाह करा ,किती दिवस तू अशी राहशील समाज तूला जगु देणार नाही व घरचे तुझा स्विकार करणार नाहीत... अखेर धगधगतं सत्य स्विकारुन तीने तीच्या मैत्रीणीच्या भावाशी लग्न केले...
पण तीच्या कुठल्या जन्माचे भोग होते कुणास ठाऊक ते संपणार नव्हते कदाचीत... तीला या नव-यापासुन एक मुलगी झाली... कन्यारत्न जन्मा आले... पण काळाने तीच्या भाळावर सणसणीत अशी एक चपराक मारली... आणि तीच्या दुस-या नव-याला हृदयविकाराचा झटका आला... तो इतका तीव्र होता... की रुग्णालयात पोहोचण्या आधी त्याने या जगाचा निरोप घेतला... नशिबाने आवळलेल्या या फासाला धरुन तीने टाहो फोडला... असमंत शरण यावा इतका अश्रुंचा खच सांडला... आणि आता या दलदलीतच जगायचं हा काळजावर दगड ठेऊन तीने निर्णय घेतला... तो तर सोडून गेला अर्ध्यात... पण हिचा जाच सुटला नाही..पहिल्या मुलाची ताटातूट... दुसरी मुलगी पदरात, तीला पाहीजे तसं बापाचं प्रेम मिळालं नाही... ना आजी आजोबाचं... तीचे सासु सासरे अगदी खलनायकच... वनवास म्हणजे वनवासच.. खाऊ पिऊ घालतोय या उपकाराचे टोमणे सतत तीच्या उराला डंख मारायचे...
हळु हळु तीला या दुःखाची सवय होऊच लागली.. यातच तीच्या कानावर एक काळीज चिरणारी बातमी धडकते... की जन्मदात्री आई कोरोनामुळे हे जग सोडून गेली... तीने नंबर शोधुन कॉल ही केले... पण तीला बाप नी भावाने स्पष्ट सांगितले... तू जर आलीस तर तूला हिच्या चितेवर जाळु... कलंकीत अवदसे तूझं तोंड नको दाखवू...
अखेर तीला तीची माय कधी दिसलीच नाही... . एकतर आयुष्यात कुणाचा आधार नाही... कुणी जीव लावणारं नाही... मुलीला आणि तीला कपडे खाणं पिणं मनासारखं देणारं कुनी नाही... सासु सास-यांना काही मागितलं तर भिका-या सारखं अंगावर फेकून मिळायचं... ती या सर्व गोष्टीला कंटाळली होती... तीला यातुन सुटका हवी होती... केवळ मुलीमुळे जगायचं म्हणुन तीने जगणं सुरु ठेवलं होतं... इंग्रजी अगदीच पक्की असल्यामुळे तीने गल्लीतल्या शालेय मुला मुलींचे क्लास घ्यायला सुरुवात केली... त्यातून तीला चार पैसे मिळु लागले... व थोडे फार का होईना आनंदाचे क्षण आले...
पण सासु सास-याचे टोमणे काय कमी होत नव्हते..तीचं रडणं थांबत नव्हतं मी काय पाप केलं... ईश्वरा... तू हि इतका कटू आहेस..निर्दयी आहेस..तूला ही हेच हवय का...
द्रौपदीची त्या दुर्योधनाच्या मयसभेतली प्राणांतीक किंकाळी ऐकुन जसा कृष्ण धावला होता.. तसाच एक कृष्ण जणु तीचा आक्रोश ऐकुन तीच्या आयुष्यात आला... तो या मिडीयावरच्या जगात.. बोलण्यातून मैत्री नी मैत्रीतून त्यांच्यात प्रेम. झालं... तीला त्याच्या बोलण्यात आपुलकी जाणवु लागली.. त्याने तीच्यासोबत तर जिव्हाळ्याचे संबंध जोडलेच ... पण त्याच्या परिवारासोबतही तीची ओळख करुन दिली... वेळोवेळी तीच्या मनाचं परिवर्तन केलं.. तो पारिवारीक होता तीच्याशी लग्नं तर करु शकत नव्हता... पण केवळ तीची हि या जाचातून सुटका व्हावी तीला मुक्त जगता यावं म्हणुन त्याने तीच्या साठी त्याच्या नात्यातल्या एका मुलाचं स्थळ आणलं... तीच्या सासु सास-यांना तीचं भविष्य पटवून दिलं... त्या खडूस लोकांनी अट घातली आम्ही काही करणार नाहीत व देणार ही नाहीत... त्याने मान्य केलं... सर्व खर्च स्विकारला... धुमधडाक्यात लग्नं लाऊन दिलं... तीच्या पाठीशी उभा राहीला... कन्या दान केलं... तीची विदाई करताना तीला इतकं भरुन आलं की त्याच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडली ती... आणि तो तीला म्हणाला खुप रडलीस आजवर तू... आता फक्त हसायचं... आज रडून घे... रित्या कर अश्रुंच्या घागरी... पण या नंतर तुझ्या डोळ्यात मला एकही थेंब नकोय... ..
तीच्या जिंदगीचा निसटता पदर हाती धरुन तीच्या अडखळणा-या पावलांसोबत सात फेेरे घेऊन तीच्या आयुष्यात आलेल्या नव-याच्या हाती तीचा हात देताना तो त्याला ऐव्हढच म्हणाला अगणित काट्याकुट्यांच्या झुडूपांनी रक्तरंजीत होऊन तडपून रडून थकुन घायाळ झालेली पक्षिणी मी तुझ्या हवाली करत आहे... तीच्या मनस्थितीच्या घरट्याला एक जरी छेद पडला तर तूझी या कृष्णाशी गाठ आहे ऐव्हढं मात्र विसरु नको हं... त्याच्या अटींना मान्य करत तीची गाडी धुरळा उडवत दुर दुर निघून गेली... काही क्षणांनी त्याला जाणवलं... धुरळा मिटला... आता दिसतय ते केवळ मोकळं आकाश आहे... अगदी पाखरांनी गजबजलेलं. स्वतंत्र आणि मुक्त..ही... .!!!
लेखन-गजानन ऊफाडे...