ह्रदय व प्राण Marathi Article

एकमेकांना काहीही न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणं म्हणजे खरे प्रेम होय.

ह्रदय व प्राण Marathi Article

हृदय हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या हृदयाची स्पंदने चालू आहेत, म्हणूनच आपण जिवंत राहू शकतो. हृदय आणि प्राण हे वेगवेगळे नसून एकच आहेत, असे मला वाटते. थोडक्यात एखाद्या व्यक्तीवर आपले अतिशय जीवापाड प्रेम असले आणि ती व्यक्ती आपल्यापासून कोसोदूर असली तरीदेखील एकमेकांना झालेला त्रास आणि संवेदना एकमेकांना जाणवतात. जेव्हा दोन व्यक्ती विचारांनी एक झालेल्या असतात. तेव्हा त्या दोघांना एकमेकांपासून कोणीच लांब करू शकणार नाही म्हणजे त्यांचे हृदय आणि प्राण एकच झालेला असतो असे म्हणायला हरकत नाही. 

आजकालच्या युगात सर्वांनी प्रेमाचा बाजार मांडला आहे. खरे प्रेम काय? हे कुणाला समजलेले नाही. फक्त एकमेकांना भेटणं, एकमेकांशी बोलणं एकमेकांसाठी सारं काही करणं म्हणजे प्रेम नाही हो! ते म्हणतात ना! न सांगता तुम्हा कळो येते अंतर. या उक्तीप्रमाणे एकमेकांना काहीही न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणं म्हणजे खरे प्रेम होय. जेव्हा आपले एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम होते तेव्हा प्राण कंठाशी आणून आपण त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तळमळत असतो. सतत त्या व्यक्तीने आपल्यासोबत असावे असे वाटते मग ती सोबत अदृश्य असली तरीही चालेल, परंतु त्या व्यक्तीचे सोबत असणे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. अशावेळी आपला अंतरात्मा त्या व्यक्तीसाठी मनापासून झुरत असतो. त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्यावर होत असतो. याचाच अर्थ असा की, आपले हृदय आणि प्राण हा एकरूप झालेला असतो, अशावेळी एकमेकांपासून लांब राहणे एकमेकांशिवाय जगणे अगदी असह्य होऊन जाते.

सौ. प्रिती भालेराव, पुणे