भयाण रात, मिस्ड कॉल्स सात - संदीप कुलकर्णी

प्रशांत अचानक घाबरत घाबरत जागा झाला आणि डोक्याला हात लावून पुन्हा विचार करू लागला.

भयाण रात, मिस्ड कॉल्स सात - संदीप कुलकर्णी

मी काही केलं नाही... माझा काहीच संबंध नाही.... मला सोडा... मला सोडा... पहाटे तीन साडेतीनची वेळ.... प्रशांत अचानक घाबरत घाबरत जागा झाला आणि डोक्याला हात लावून पुन्हा विचार करू लागला. पोलीस ठाण्यातून दोन वेळा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तेव्हापासून तो पुरता घाबरून गेला होता...!
 
 तो दिवस त्याला चांगला आठवत होता. 18 तारीख. मित्राच्या हॅप्पी बर्थडे पार्टीमधून घरी यायला अकरा साडेअकरा वाजले होते. घरात आई दादांशी न बोलता तो तसाच झोपी गेला.   सकाळी उठल्यावर फोन हाती घेताच त्याला सात मिस्ड कॉल्स दिसले. कॉल बॅक केला तर काहीच रिप्लाय नव्हता. समोरचा फोन स्विचड ऑफ येत होता. इथूनच खरी सुरुवात झाली होती टेन्शनला.

क्या जाधव... कुछ पता लगा क्या उस लडकी के बारेमे...? आज वो हॉस्पिटलवालो से मिलके आओ...! सकाळीच ठाण्यात हजेरी घ्यायला आलेले एसीपी त्यागी घाईत होते.  काहीच दिवसापूर्वी घडलेली ही केस एसीपी त्यागी हॅण्डल करीत होते. ठाण्यात आल्या आल्या त्यांनी हवालदार जाधवला चौकशी केली. साहेब, मोबाईल कॉल डिटेल्स आले आहेत. तेच स्टडी करतोय. तो पोरगा आताच देऊन गेला. पाहतो काय ते... सांगतो लगेच....! हवालदार जाधव. ओके ओके... फौरन रिपोर्ट करो...! त्यागी लगेच निघाले. 
 
स्वप्नरजा महातो, वय 26, हल्ली मुक्काम फ्लॅट नं. 157, पर्ल हाईट्स, चंदन नगर, शिक्षण एमबीए, मूळ राहणार दरभंगा, बिहार. एका मोठ्या फायनान्स कंपनीत मॅनेजर. वीकेंडला आऊट ऑफ स्टेशन गेलेली ही तरुणी शहरात आली आणि 18 तारखेच्या रात्री आपल्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली.  सस्पेक्टेड कंडीशन... डाऊटफुल वातावरण... पंचनामा होऊन सात आठ दिवस झाले होते. फ्लॅट नं. 157 सील केला होता. सीसीटीव्ही फुटेज आले होते.  दोन दिवसांच्या सुटीमुळे मोबाईल कॉल डिटेल्स येणे बाकी होते. आता तेही आले होते. हवालदार जाधव त्याच असाईनमेंटवर होते. एसीपी त्यागी एक एक धागा जोडून पाहत होते. 
 
हवालदार जाधव कॉल डिटेल्स घेऊन ठाण्यात आले. साहेबांना फोनवर सांगून त्यांनी तपासाला हात घातला. 18 तारखेला स्वप्नरजाने अनेकांना कॉल केले होते. तिच्या इनकमिंग कॉल्सची यादीही मोठी होती. पण रात्री साडेअकराच्या सुमारास टोटल सात मिस्ड कॉल्स एकाच नंबरवर केले होते... ज्याचे शेवटचे पाच आकडे होते... 67799...!  या नंबरवर लाल सर्कल करून त्यांनी त्यागी साहेबांना  त्याचा फोटो पाठवला. हा नंबर होता प्रशांतचा. कॉल डिटेल्सच्या रिपोर्टवरून त्याचेही नाव या केसशी जोडले गेले होते. तपासाचा भाग म्हणून त्याला चौकशीसाठी ठाण्यात दोन तीनवेळा बोलावले होते. 
 
स्वप्नरजाच्या घरझडतीत मिळालेल्या एका एका वस्तूचा धागा जोडून गुन्हेगारापर्यंत पोहचण्याचा एसीपी त्यागी प्रयत्न करीत होते. जाधव यांनी पाठवलेल्या कॉल डिटेल्सचा अभ्यास त्यांनी केला होता. इकडे प्रशांत मात्र पुरता घाबरून गेला असल्याने त्याच्या घरची परिस्थिती एकदमच बदलून गेली होती. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार स्वप्नरजाला हार्ट अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाला होता. केस सरळ असली तरी तशी दिसत नव्हती. संशयाची सुई अडकली होती फोन नंबरवर.... 67799. 
 
एसीपी त्यागी यांनी पुन्हा एकदा प्रशांतला ठाण्यात बोलावले होते. तो घाबरला होता. मी त्या तरुणीला ओळखत नाही... माझा या केसशी काहीही संबंध नाही... असे तो वारंवार सांगत होता...! एसीपी त्यागी यांना आता त्याच्या मनातली भीती काढायची होती. 
 
प्रशांत ठाण्यात पोहचला. बैठो प्रशांत... डरो नहीं... सब  कुछ सच सच बताओ...  त्यागी बोलले. सर, मी सगळं काही आधीच सांगितलंय... खरंच मला काहीच माहीत नाही हो... माझा काहीच संबंध नाही या प्रकरणाशी...! 
प्रशांत म्हणाला. ऐसा है, तो फिर डरते क्यो हो...? देखो अब मैं तुम्हे एक चीज बताने जा रहा हुं. जिससे तुम्हारी हालत ठीक हो जायेगी...! असं बोलून एक कार्ड त्यांनी प्रशांतच्या हाती दिलं. ते कार्ड होतं डॉ. श्रीनिवास देवधर, कार्डिओलॉजिस्ट यांचं. नावाच्या खाली फोन नंबरही होता.... XXXXX 66799.
 
कार्ड पाहिल्यानंतरही प्रशांत गोंधळलेल्या अवस्थेतच होता. एसीपी त्यागी यांनी पुन्हा त्याला दिलासा दिला. आणि स्वप्नरजा डेथ केसचं स्पष्टीकरण केलं... देखो प्रशांत, उस लडकी की डेथ हार्ट अटॅक से हुई है. उसके पर्स से ये कार्ड हमे मिला. 18 तारीख की रातमें दरअसल वो लडकी डॉ. देवधर को फोन लगा रही थी. ऐसा समझ में आता है. उस फोन  नंबर को ध्यान से देखोगे, तो सिर्फ एक आंकडा गलत है... जिसकी वजह से तुम शक के दायरे मे आ गये...! यह केस तो जल्द ही सुलझ जायेगा. तुम डरो नहीं. जाओ खुशीसे अपनी रोजीरोटी संभालो...! एक मिस्ड कॉल कैसी परेशानी खडी कर सकता है... देखा तुमने...! जाओ... अब डरो नहीं...! 

संदीप प्रभाकर कुलकर्णी,
औरंगाबाद.