घरपण

स्त्री परमेश्वराची सुंदर कलाकृती. स्त्री केवळ देहाने सुंदर नसून ती प्रेयसी बनते तेव्हा प्रियकराचे भावविश्व बदलून टाकते

घरपण

स्त्री परमेश्वराची सुंदर कलाकृती. स्त्री केवळ देहाने सुंदर नसून ती प्रेयसी बनते तेव्हा प्रियकराचे भावविश्व बदलून टाकते, ती पत्नी होते तेव्हा कर्तव्य श्रद्धा यांनी चार भिंतीत प्राण ओतून घरपण आणते. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो, फुले फुलवीत असतो त्याप्रमाणे स्त्रिया कुटुंबात सतत कष्ट करून आनंद निर्माण करतात. ती घरात असणारी गृहिणी असो किंवा उच्च विभूषित अधिकारी असो ती कष्टाळू मूर्ती असते. 
             
त्यागमूर्ती व प्रेममुर्ती ही भारतीय स्त्रियांची दैवते आहे. स्त्रीचे जीवन म्हणजे पेटलेला अग्निकुंड असतो ती सर्वस्वाने पतीची पूजा करते आणि लग्नानंतर मुलांच्या व पतीच्या इच्छेतच आपली ईच्छा मानते. स्त्री सर्वांची सेवा करते परंतु तिला सुख आनंद मिळावा म्हणून कोणी प्रयत्न करते का? कारण स्त्री हृदय नेहमी मुके असते ती फक्त देण्याची वृत्ती ठेवते. एकदा पतीला माझा म्हटला की त्याची लहर सांभाळणे पतीच्या मुखावरचे हास्य म्हणजे पत्नीचे सुख सर्वस्व पती गोड बोलला तर तिला सारं मिळालं.
               
मुलगा खोडकर व्यसनी असला साऱ्या जगाने मुलाला नावे ठेवली तरीही आई मायेचं पांघरून घालते, मी माझ्या मुलाला प्रेमाचा शब्द दिला नाही तर हे घर तरी कशाला? घर म्हणजे आधार विसावा प्रेम. हे घर पतीसाठी, मुलांसाठी ती प्रेमाने भरून ठेवते. पतीशी स्त्रीचे पटत नाही म्हणून भराभर घटस्पोट घेत राहिलो तर जगात प्रेम त्याग या शब्दांना अर्थ राहणार नाही. संसार म्हणजे तडजोड प्रेमात इतका बळ असते की ते दुर्गुनाला ही सांभाळते. एक दिवस पतीलाही प्रेमाची अनुभूती होईल या आशेवर एकनिष्ठेने ती पतिव्रत सांभाळत असते.
                 
माणूस काम क्रोध विकारांनी भरलेला आहे. हा क्रोध म्हणजे पोटातील विष ती ओतण्याची जागा म्हणजे पत्नी. कोठे तरी आपल्या विकारांना प्रकट होण्यास औसर हवा असतो, म्हणून पत्नी राग रोष सहन करते व पतीला माणूस म्हणून जगात वावरण्याची शक्ती देते, पतीला शांत करते स्थीर करते सय्यम घालते. स्त्रीच्या प्रेमात इतकी शक्ती असते, तेज प्रखरता असते. कर्तव्य करतांना ती अष्टभुजा देवी स्वरुप असते. आजोबा पुस्तकातील ओळी वाचून आपल्या पत्नीच्या आठवणीत गढून गेले. खरोखर जीवनाच्या अखेरपर्यंत साथ दिली. मुलांवर संस्कार केले. मुलांना संस्कार व उच्च विभूषित बनवले. आजोबा मात्र दहा वाजले की सायकलवर टांग मारायचे, "येतो गं कमला" अशी आरोळी देऊन शाळेच्या दिशेने निघायचे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत ते शिपाई होते. पाच वर्षांपूर्वीच रिटायर झाले आणि नातवाला सांभाळणे त्याच्या बाललिला पाहणे यात ते वृद्धत्व विसरले. वर्षभरापूर्वी आजीचं आजारपणात निधन झाले. त्यामुळे आजोबा शरीराने जरी सर्वांबरोबर असले तरी मनाने खूप एकाकी झाले होते.
      
तेवढ्यात आतून सुनबाईचा आवाज ऐकू आला. "मी मोलकरीण नाही दिवसभर राबायला, तो म्हातारा दिवसभर घरात बसून असतो. काही प्रायव्हसी नाही, तू मात्र घरातून बाहेर पडला की मोकळा असतो. मी पण नोकरी करणार आहे. तसा राकेशला गले लठ्ठ पगार, मोठा फ्लॅट, घर कामासाठी मोलकरीण होती. सुनबाईला फक्त "स्वयंपाक" बनवून प्रेमाने खाऊ घालण्याची व गोड बोलण्याची माफक अपेक्षा बाप लेकांची होती. परंतु सीमा आधुनिक नारीच्या ग्रुपमध्ये होती. त्यात श्रीमंतीचा बडेजाव दाखवण्याची जणू स्पर्धाच लागलेली होती. त्यामध्ये फक्त स्वार्थ शरीराची चोचले आणि विलासी जीवन, पार्टी भीशी, पिक्चर, ब्युटीपार्लर, त्यामुळे एक प्रतिष्ठित उच्चवर्णीय सोसायटी असते. अशी तिची धारणा होती. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आणि ब्रँडेड वस्तू घेण्याच्या नादात एवढा मोठा पगार ही त्यांना कमी पडू लागला. रागाने राकेश घराबाहेर पडला. आजोबांच्या हृदयाला तीव्र दुःख झाले, केवळ आपल्यामुळे त्यांच्यात भांडण नको. आजोबांनी वाचत असलेले "भारतीय संस्कृती" पुस्तक ठेवून दिले. व नातवाच्या स्कूलबसची येण्याची वेळ झाली म्हणून बाबा रस्त्यावर उभे राहिले. तेवढ्यात बस येऊन उभी राहिली मुन्नाला बाहेर उभे दिसलेले आजोबा बघून त्याच्या चेहऱ्यावर आनंद झाला व बसमधून उडी मारून आजोबांच्या गळ्याला त्यांनी मिठी मारली. बस्स...! एवढ्या स्वर्ग सुखासाठी आजोबा कसले दुःख सहन करायला तयार होते.
     
संध्याकाळी राकेश ड्रिंक करूनच घरी आला. घरात तणावाचं वातावरण होतं. सुनबाईने डायनिंग टेबलवर जेवण आणून आदळलं. पण बाबांना वाईट वाटायला नको म्हणून राकेशने दोघांसाठी ताटं वाढली. सीमा मात्र जळफळाट करत किचनमध्ये जेवली. रात्री आजोबांना पुन्हा भांडणाचा आवाज आला. सीमा रागात बोलत होती, "मी शेवटचं निक्षूण सांगते, "उद्या एक तर मी घरात राहील नाहीतर तुमचे वडील." वडिलांना संपूर्ण दुनियेत 'एकटा' असल्याची जाणीव झाली. मुलाच्या संसारात आपले लुडबुड नको म्हणून आपला मार्ग शोधला पाहिजे या विचारातच आजोबांना झोप लागली. पहाटे लवकर जाग आली. त्यांनी आपली बॅग भरली व पहाटेच्या गाडीने ते गावी निघून गेले.
  
आजोबांनी मुलांसाठी चिठ्ठी लिहून ठेवली. मी गावी जात आहे थोड्याच दिवसात परत येईन. राकेश काय समजायचं ते समजला. सीमा घरात कोणी नसल्यामुळे किटी पार्टी, मैत्रिणींचा दंगा यात ती 'घर' म्हणजे काय हेच विसरली. तिला एका कंपनीत जॉब लागला. बाळाला सांभाळण्यासाठी बाई ठेवली. परंतु त्या बाईला आराम करण्यासाठी आणि टीव्ही बघण्यासाठी आयतच मोठे घर मिळाले. एक दिवस ती टीव्ही बघण्यात इतकी गुंग झाली की मुन्ना बॉल खेळत खेळत गॅलरीच्या दिशेने गेला व बॉल खाली पडला हे बघण्यासाठी तो वरतून डोकावला तसा त्याचा तोल गेला परंतु लोखंडी गजाला घट्ट पकडल्यामुळे तो लोंबकळत राहिला. मुन्ना जोरजोराने रडू लागला. खाली गर्दी जमली. तेवढ्यात सीमा ऑफिसवरून आली तिने खालूनच गॅलरीत मुन्ना बघितला. तशी ती ओरडू लागली पळतच लिफ्टमधून येऊन जोर जोरात दरवाजा वाजू लागली. तोपर्यंत मोलकर्णीने मुन्नाला खाली वाकून त्याचे दोन्ही हात पकडून त्याला वरती ओढून घेतले. मुन्ना जोर जोरात रडत होता. दरवाजा उघडल्यावर बाई पळून गेली.
    
सीमाला आता सासू-सासर्‍यांची किंमत कळाली. आज पैसा हव्यासासाठी काय अघटित घडणार याची कल्पनाच न केलेली बरी. घरात फक्त उंची फर्निचर, पडदे, महागड्या वस्तूंनी घर बनत नसते. तर घरात प्रेमाची जीवाला जीव देणाऱ्या माणसांपासून घर बनते. तिला आपली चूक कळून आली. तीने गावाकडे सासऱ्यांना फोन लावला, "बाबा मी चुकले तुम्ही उद्याच तुमच्या घरी परत या! हे ऐकून आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.

Manisha Kandalkar

सौ. मनीषा शंतनु कांदळकर,
येवला, जि. नाशिक