प्रत्येक माणसाच्या अंगी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर व अहंकार हे षडविकार असतात. त्यामधील अहंकार हा एक अतिशय महत्त्वाचा विकार आहे. जीवन जगत असताना आपल्याला अनेक यज्ञामधून जावे लागत असते. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात कठोर प्रसंग येतात तेव्हा आपल्यामधील षडविकार जागृत होतात
अहंकार हा माणसाच्या अंगी असलेला सर्वात वाईट गुण आहे. आजकालच्या जमान्यात माणसाला प्रत्येक गोष्टीचा अहंकार झाल्याचा आपल्याला दिसून येतो त्यामध्ये कुणाला पैशाचा अहंकार असतो, कुणाला सौंदर्याचा अहंकार असतो तर कोणाला मी ज्ञानी आहे याचा अहंकार असतो. फक्त अहंकार आडवा आला म्हणून संपूर्ण आयुष्याचे नुकसान झालेले समाजात अनेक उदाहरण आहेत.
वास्तविक पाहता अहंकार ही माणसाची एक स्वाभाविक कृती आहे. परंतु माणसाने जर ठरवले तर तो सर्व काही करू शकतो, वेळीच आपला अहंकार बाजूला ठेवला तर माणसाची प्रगती होऊ शकते. माणूस हा एक असा प्राणी आहे की त्याने जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट त्याच्यासाठी अशक्य नसते. मला वाटतं जर का आपण अहंकाराला तिलांजली देऊन नम्रता स्वीकारली, तर नक्कीच एक चांगला माणूस म्हणून आपली ख्याती होईल.
अहंकार आणि नम्रता या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत अहंकारामुळे व्यक्तीच्या जीवनाचे अधिकाधिक नुकसान होते तर याउलट अंगी नम्रता असल्यास कोणतेही कार्य अशक्य राहत नाही. अंगी नम्रता असलेल्या व्यक्तींना समाजात खूप मोठे स्थान असते. म्हणूनच मला वाटते अहंकाराला तिलांजली देऊन अंगी नम्रता स्वीकारावी. आणि जग आपलेसे करावे.
सौ. प्रिती भालेराव, पुणे