स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगा बोलतोय..!

१५ ऑगस्ट तर पहाटेच्या अंधारात मेरे देश की धरती..., सारे जहाँ से अच्छा..., ये मेरे वतन के लोगो... गाणे वाजले कि, कोण शक्ती आणि आनंद संचारलेली मुले शाळेकडे अंधारातच धावत सुटायची, जणू फक्त दिवस उजाडण्याची वाट बघत होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगा बोलतोय..!

नमस्कार बालमित्रांनो, दोन दिवसांवर आपला १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला आहे. सध्या उद्भवलेल्या कोरोनारुपी संकटामुळे तुम्ही सर्व जण घरीच आहात म्हणजे झेंड्याच्या तयारीचा प्रश्नच येत नाही.

तुमची तर मज्जा आहे बुवा सकाळी उशिरापर्यंत अंथरुणातच लोळत पडायचं, दिवसभर खेळायचं, गप्पा मारायच्या, आराम करायचं,परंतु तुम्हाला कधी शाळेची आठवण येते का नाही?

माझी तर अवस्था फारच दयनीय झाली आहे. मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, एक नाही, दोन नाही तर तब्बल तिसऱ्या वर्षीही १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन असा मला तुमच्याशिवाय साजरा करावा लागेल. दोन वर्षांपूर्वी कोरोना आपल्या देशात आला आणि त्याने होत्याचे नव्हते करून टाकले. कधी काळी आपण एक दोन दिवसाच्या सुट्टीसाठी तळमळणारी गेली दोन वर्ष सुट्टीच उपभोगत आहोत.

आता ही आठवते मला भर पावसाळ्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाची चाहूल महिनाभर अगोदरच लागायची. तयारी सुरू व्हायची. कपाटात व्यवस्थित घडी ठेवलेल्या तिरंगा पंधरा दिवस अगोदरच बाहेर यायचा.  त्याची स्वच्छता काय, इस्त्री काय, दोरी पासून ते झेंड्याच्या लोखंडी खांबापर्यंत तयारी असायची. खांबाची रंगरंगोटी एवढेच नाही, तर झेंड्याचा ओटा दुरुस्ती त्याला रंगरंगोटी दुरुस्ती, जमीन पाणी मारून मउ केली जायची. स्वातंत्र्य दिन रांगोळी टाकण्यासाठी आदल्या दिवशी चक्क शेणाने सारवली जायची चिमुकल्या चिमुकल्या हातांनी.

जिकडे पाहावे तिकडे स्वच्छता, साफ-सफाई शाळेचा दसरा काढला जायचा. माझ्यामुळे ऑगस्टमध्येच स्वच्छता व्हायची. व्हाराड्यातील फळे आठ दिवस अगोदरच पुसून स्वच्छ, काळे कुळकुळीत केले जायचे. काहींना तर रंग दिला जायचा कारण ते स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यास सज्ज व्हायचे म्हणून. अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांची कटिंग केली जायची. लगबग असायची नवीन ड्रेस वाटप, लेझीमची तयारी, डंबेल्स, घुंगरूकाठी, देशभक्तीपर गीतांवर नृत्य बसवायची, देशभक्तीपर गीत गायन तर कुठे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणत म्हणत मैदानावर फिरणारी मुलेही मला आनंदून टाकायचे. त्यातच एका कोपऱ्यातल्या वर्गातून फक्त सकाळी परिपाठात सावधान म्हणून म्हटल्या जाणाऱ्या राष्ट्रगीत गायनाचा सराव सुरु असायचा. सर्व चिमुकले जीव दिवाळीला करीत नसतील एवढ्या उत्सव माझ्या ध्वजारोहणासाठी करताना दिसायचे. आणि आपला थाट पाहून माझं मन कसं आनंदानं भरून यायचं.

मैदानावर खडानखडा बारीक कचरा, गवतही अगदी काटेकोरपणे वेचले जायचे. शाळा दिवाळीच्या सणा प्रमाणे सजवली जायची. दोन दिवस आधी रंग-बिरंगी पताके आणि फुले यांनी शाळा सजायची. १४ ऑगस्टला खरं तर दुपारी सुट्टी असते. स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी परंतु त्या दिवशी मात्र रात्री अंधार पडला तरी शाळेचे मायबाप शिक्षक राबताना, तयारी करताना दिसायची, अंधार झाल्यावर लाईट लावून मैदानावर रेषा आखताना दिसायचे. शाळा रात्रीही किलबिल करायची. सुंदर रांगोळी रात्रीच रेखाटली जायची.

१५ ऑगस्ट तर पहाटेच्या अंधारात मेरे देश की धरती..., सारे जहाँ से अच्छा..., ये मेरे वतन के लोगो... गाणे वाजले कि, कोण शक्ती आणि आनंद संचारलेली मुले शाळेकडे अंधारातच धावत सुटायची, जणू फक्त दिवस उजाडण्याची वाट बघत होते. शिक्षकांची आणि मुलांची तयारी माझ्या मनात सुखद आनंद द्यायची. कारण ती तयारी फक्त माझ्यासाठीच होती, त्या सर्वांमध्ये उंच खांबावर दिमाखात प्रमुख व्यक्तीच्या हाताने मीच फडकत असायचो, आणि उंचावरुन माझ्यासाठीच सगळा थाट डोळे भरून पाहायचो. मनोमन खूप खुश व्हायचो, अभिमानाने दिवसभर फड़कायचो. मुलांचा कार्यक्रम बघायचो, भाषण करताना एखादा भीतीने रडणारा तर एखादा स्वतःचे मत मांडताना थांबायचा नाही त्यामुळे मज्जा वाटायची. काही तर लवकर उठल्याने अगदी दमून जायची, दिवसभर शाळा देशभक्तीपर गीतांनी खणाणुन जायची. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांच्या नसानसात देशभक्ति वाहत असायची आणि माझे डोळे दिपून जायचे.

पण काय सांगू आज झेंडा दोन दिवसावर आला आहे. मी पण कपाटातून टेबलावर आलो पण कुठे किलबिलाट नाही, का कुठे गोंधळ नाही, ही शांतता मला खूप खुप छळते आहे. वाटलं होतं कोरोना पासून सर्वजण सुरक्षित राहावे म्हणून नाही झाला वाजत-गाजत कार्यक्रम एखाद्या वर्षी तर काय झालं. मुलांशिवाय मी स्वतःला समजावले. पण आता तिसऱ्या वर्षीचा झेंडा एकटेपणात होणार हे समजल्यापासून माझ्या डोळ्याचे पाणी थांबायलाच तयार नाही. भिजून भिजून चिंब झालो आहे मी माझ्या अश्रूमध्ये. नको वाटतंय आता हा एकटेपणा, शांतता. माझी मैदानावर नाचणारी मुलं किती मोठी झालीत हे पहायला माझे डोळे आसुसलेले आहेत रे बाळानो. असं वाटतं सगळे धावत यावेत माझ्याकडं आणि कडकडून भेटावेत मला. त्यांचा आवाज, गोंधळ, भांडण, धिंगाणा तयारी त्यांचा आवाज सगळं सगळं मिस करतोय मी. म्हणूनच कोरोनाला परत जाण्याची मनोमन प्रार्थना देखील करतोय मी.

ज्या ठिकाणी शाळेत कधी गवत उगवले नाही या चिमुकल्याच्या पायांनी, आता पाय ठेवायला जागा नाही तिथे. सर्व झाडे हात पाय पसरून वाढले आहेत. एक वर्षात नाचून नाचून डेक्स तोडणारी पाय, माझ्या आवडत्या रंगाचा डेक्स पाहिजे म्हणून सतत भांडून आवाज करणारी मुलं, गेल्या दोन वर्षात शाळेकडे फिरकलीच नाहीत. म्हणून डेक्सनही स्वतःला धुळीने झाकून घेतले वर्गामध्ये बंद करून घेतले. वर्ग तर स्वतःचे अस्तित्वच हरवून बसले आहेत. दोन वर्षात एकदाही वर्गाचा उम्बरठा न ओलांडता पुढील दोन वर्ग पुढे गेली पण शाळेकडे एकदाही फिरकली नाहीत.

कुठे तयारीची लगबग नाही. गोंधळ नाही की, नको असलेली भांडणं नाही. माझं दुःख मी सांगू तरी कोणाला? बाळांनो तुमचा कधीकधी राग यायचा, गोंधळाचा, भांडणाचा, तुमच तोंड दुखत नसेल का? असं वाटायचं चिडचिड करायचं, कानावर हात ठेवायचं, पण आता नाही असं करणार. अजिबात रागवणार नाही कधी मनात सुद्धा तुमचा राग राग करणार नाही. यारे तुम्ही  स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी व्हायला. मी तुमची डोळ्यात प्राण आणून वाट पाहतोय.

आता स्वातंत्र्य दिनाला मी फडकलो तरी दूर दूरवर मला कुठे माझी माझी लेकरं दिसत नाहीत. म्हणूनच आता मात्र माझी सहनशीलता संपली आहे. या वर्षी पण एकटाच फडकणार म्हटल्यावर माझं मन भरून आलंय. कधी माझा अश्रूंचा बांध फुटेल माहित नाही म्हणुन बाळांनो इथेच थांबतो.

जय हिंद जय भारत।।

 ।।तुमचा तिरंगा।।

हरवले ते दिवस
हरवली पाखरे सारी,
चिवचीवाट कानी पडेना
कशी झाली किमया न्यारी।।

आसुसली ही शाळा
वर्ग ही बघतोय वाट,
चिमुकल्या पावलांचा
पाहण्या पुन्हा थाट।।

स्पर्श तुमचा भिंतीना
अन मैदानावर नाचणारे पाय,
सर्व पुन्हा हवय मला
आणखी हव काय ?

बागड़णारे स्वच्छंद फुलपाखरे
बागेत या ना तुम्ही पुन्हा,
कोणी रागवत नाही आता
तुमच्या विना हा बाग सुना।।

 नजर माझी शोधते तुम्हा
नयनी अश्रुच्या धारा,
स्वातंत्र्यदिनी फडकण्यासाठी
वाट पाहतोय तुमचा तिरंगा
अन परिसर सारा।।

श्रीमती जयश्री उत्तरेश्वर औताडे,
जि. प. केंद्र कन्या प्रा. शाळा, 
गंगाखेड, जि परभणी.