प्रत्येक तरूण शिवबा बनला तर कलियुगाचे स्वर्गात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही

प्रत्येक तरूण शिवबा बनला तर हे कलियुग नव्हे तर स्वर्ग बनण्यात वेळ लागणार नाही, आणि कित्येक शत्रू निर्माण झाले तरी स्वराज्याला स्पर्श करण्याची ताकद कुणी करणार नाही. 

प्रत्येक तरूण शिवबा बनला तर कलियुगाचे स्वर्गात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही

रात्रीच्या अंधाराला नष्ट करण्यासाठी जसा सूर्याचा उदय होतो. त्याचप्रमाणे समाजातील रूढी, परपंरा, अत्याचार, गुलामी, अंधश्रध्दा या सगळ्यांचा अंधकार नष्ट करण्यासाठी एका महान पराक्रमी पुरुषाचा जन्म महाप्रतापी शहाजीराजे भोसले व जिजाऊ मातेच्या पोटी दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.

शिवनेरी किल्ल्यावर 

जन्माला शिवाजीराजा 

सूर्याचे तेज पसरले

दीन दलितांच्या हृदयात 

असेच दृश्य जणू त्या क्षणाला शिवनेरी किल्ल्यावर दिसत असेल, समाजातील सर्वसामान्य लोक अत्याचारामुळे हळहळलेली होती. जणू त्यांना सुखाची चाहूल त्यादिवशी झाली असावी. शिवरायांचे बालपण अगदी लाडात व शिस्तप्रिय व वळणदार आणि आदर्श नेतृत्वाच्या छत्रछायेखाली गेले. जिजाऊंनी फक्त लाड आणि हट्ट पुरवले नाही. तर शिवरायांच्या खांद्यावरती समाजातील लोकांची असलेली जबाबदारी खुल्या डोळ्यांनी दाखवून दिलेली होती. आजूबाजूच्या लोकांचे जीवन समाजात असलेल्या परंपरा, न्यायव्यवस्था, स्त्रियांवरील अत्याचार या सगळ्यांचे चित्र त्यांच्या हृदयात कोरले गेले होते. म्हणूनच या सगळ्या अत्याचारांची कोंडी फोडण्यासाठी शिवबाचा जन्म झाला असावा. म्हणूनच आज कितीतरी शतके ओलांडल्यानंतरही ज्यांची जयंती मोठ्या थाटा-माटाने साजरी केली जाते. अख्या भारतभर जल्लोषात शिवजयंती साजरी केली जाते.

पण प्रश्न हा आहे की, आपण शिवरायांची जयंती योग्य पद्धतीने साजरी करतो की नाही? आजच्या तरुणपिढीत देखील शिवरायांची जयंती साजरी करण्याचा मोठा उत्साह दिसायला मिळतो. डीजेच्या तालावर, गुलाल उधळत मध्यरात्रीपर्यंत नाचणे, भगवे झेंडे शिवरायांचे चित्र असलले मोठ-मोठे बॅनर, मोटरसायकलीच्या वरपर्यंत बहरणारा झेंडा, आणि सोबतच शिवरायांसारखे दिसण्याचा हट्ट, मोठी दाढी, शिवरायांसारखा गंध या सगळ्या गोष्टी तरुण अगदी थाटामाटात करतात. कारण ते शिवरायांचे भक्त आहेत, निस्सीम भक्त असे त्यांना दाखवायचे असते किंवा त्यांना स्वत:ला देखील वाटत असेल किंवा खरच ते शिवरायांचा मनातून आदर करत असतील. पण फक्त हे सगळं केल्यामुळेच शिवभक्त आहोत हे सिद्ध होते का? फक्त बाह्य अनुकरणाने तुम्ही शिवाजी महाराज दिसू शकता, बनू शकता पण मनातून शिवाजी महाराज बनणे किती महत्वाचे आहे. व ती आजच्या काळाची गरज आहे.

शिवाजी महाराज व त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मित्र मावळे नेहमी संत तुकाराम महाराजांचे किर्तन ऐकत असत. त्यातून त्यांना समाजाविषयीची तळमळ जागृत होण्यास प्रेरणा मिळाली. तुकाराम महाराजांच्या शब्दातील मर्म शिवरायांच्या हृदयापर्यंत पोहचलं आणि स्वराज्याची स्थापना झाली म्हणूनच म्हटले जाते.

संतांच्या संगती तरुणोपाय ! 

तरूण वयात शिवरायांच्या मनात संतांची वाणी पडल्यामुळे तरुण सार्थक झाले. तुका म्हणतात - 

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

या विचारांनी प्रेरीत झालेले शिवाजी महाराज व त्यांच्यासोबतीच्या मावळ्यांनी हजारो वृक्षांची लागवड केली. व निसर्गाला सजीव बनवले. पाऊस चांगला पडू लागला व सगळीकडे फळे-फुले बहरू लागली. मावळ्यांना योग्य मार्ग दाखवून, स्वत: त्यादिशेने वाटचाल केली म्हणूनच स्वराज्याची स्थापना झाली. 

भेदाभेद भ्रम अमंगळ!

तुकाराम महाराजांच्या वरील पंक्तीप्रमाणे ते सर्व अनुकरण करायचे. समाजातील स्पृश्य- अस्पृश्य लोकांना सन्मानाने वागवण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. दलित लोकांना त्यांचा अधिकार शिवरायांनी मिळवून दिला स्त्रियांना समाजात आदराचे स्थान प्राप्त करून दिले. आजचा शिवभक्त काय करतोय, याचा जरा पडताळा होणे आवश्यक आहे. मी पूर्णपणे तरुणांचा तिरस्कार करत नाही. किंवा शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात काही बोलत पण नाही. पण खरच आपण एकदा खरा शिवभक्त आहोत का? हे आपणच निरखून बघितले पाहिजे.

शिवाजी महाराज सैनिकांची निवड करताना देखील तो निर्व्यसनी असावा. याची पूर्णपणे शहानीशा करायचे, मग आपली तरूण पीढी व शिवभक्त जर व्यसनाधीन असेल तर हे शिवरायांना आवडेल का? तर नक्कीच नाही. त्यांनी एका सक्षम स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि ते पूर्ण देखील केले मग त्या स्वराज्याची ही दशा पाहून त्यांना आनंद वाटेल का? आपण तर नशेत बेधुंद होऊन शिवजयंती साजरी करतो. हे बघून त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल. आणि माझ्या स्वराज्याची अवस्था बधून कदाचित त्यांचे हदय चिन्न-भिन्न होत असेल.

माझ्या स्वराज्यातील तरुण सिंहासारखा असला पाहिजे. जो स्वराज्याचा राजा होऊन स्वराज्यातील मागासलेपण दूर करेल, स्त्रीयांचा आदर करेल, जात, पंथ, धर्म, भाषा या गोष्टींचा तो कधीच विचार करणार नाही. आणि एका सुदृढ, प्रगत विकसित आणि बलाढ्य युगाचा स्थापक बनेल, असे स्वप्न बघणाऱ्या शिवरायांचे भक्त जर व्यसनी किंवा कर्तव्यरहीत वागणुकीचे असतील, तर कसे बलाढ्य साम्राज्य निर्माण होईल?

शिवबाचे भक्त बनायचे असेल, त्यांचा वारसा पुढे चालवायचा असेल, तर आजच जागे व्हा! तुमच्या रक्तातील अग्नीने जगातील अत्याचारांना थांबवा, पेटून उठा! तुमच्या 'माता भगिनी' आजही असुरक्षित आहेत. आजही बलात्कारासारख्या क्रूर घटना समाजामध्ये राजरोसपणे घडताय, आजही वयोवृद्ध भीख मागताना दिसतात. त्या हाताना आधार द्या! ज्यांचे या जगात कोणीच नाही त्यांचा आधार बना! शिवजयंतीला लाखो रुपयांचा गुलाल उधळण्याअगोदर गरजूच्या डोळ्यांतील अश्रू पुसा, या राज्याला तुमची गरज आहे. कारण तरुणच देशाचा कणा असतो. आणि तोच देश घडवतो. तुमचे बलाढ्य शरीर व बुद्धीचा वापर करून बलाढ्य युगाचे निर्माण करा.

प्रत्येक तरूण शिवबा बनला तर हे कलियुग नव्हे तर स्वर्ग बनण्यात वेळ लागणार नाही, आणि कित्येक शत्रू निर्माण झाले तरी स्वराज्याला स्पर्श करण्याची ताकद कुणी करणार नाही. 

Manisha Maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,

रा. परसोडा, ता. वैजापूर