जीवन संघर्ष हा खेळच निराळा

जीवन संघर्ष कधीच संपणार नाही. आपण संपू तेव्हा आपल्यासोबतच तो संपेल, हे मात्र शाश्वत सत्य आहे. मग या संघर्षाला एवढं कशाला डोक्यावर चढवून ठेवायचं.

जीवन संघर्ष हा खेळच निराळा

अगदी सगळ्यांचाच चालू असलेला प्रवास म्हणजे 'जीवनसंघर्ष'. जन्माला आल्यापासून माणूस संघर्ष करायला लागतो. हातपाय हलवणे, हालचाल करणे यालाच हळूहळू वळण प्राप्त होऊन नंतर मोठे नावही प्राप्त होते. जसे लहान बाळ आपले हात पाय हलवून त्याच्या प्रतिक्रिया सांगते. जवळ बोलवण्यासाठी हात वर करते, आनंद झाला तेव्हा हसते, आवाज करते. तसेच पूढे चालून या सगळ्या हालचालीचा अर्थ बदलत जातो. राग आला की ओरडणे, ताण पडला की चिडचीड करणे, मानवाचा जन्मच संघर्ष करण्यासाठी झालेला असावा. कारण काही जरी मिळवायचे तरी संघर्ष हा करावाच लागतो, आईच्या गर्भातून बाहेर येण्यासाठी सुध्दा संघर्ष हा करावाच लागतो.

तेव्हा आपण या जगात येतो त्यानंतर तर अधिकच संघर्ष करावा लागतो. आपल्या आजूबाजूला बघितले तर प्रत्येक जण काहीतरी मिळवण्यासाठी संघर्ष करतोय, समाजात असे बघायला मिळते की जन्मापासून ते मरेपर्यंत तो फक्त लढत असतो, मग जगायचे कधी? जीवन म्हणजे काय? हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात. आपण आयुष्यभर काहीतरी मिळवण्यासाठी, बनण्यासाठी धावपळ करत असतो.

पण काय मिळवलं आपण आजपर्यंत धावपळ करून, आपण जगलो का झुरलो आनंदी राहिलो की कष्ट करत राहिलो? काय साध्य झालं. या सगळ्या धावपळीतून हा प्रश्न देखील खुप उशिरा पडला, वयाच्या मध्यानंतर जेव्हा अर्धे आयुष्य जगून झालेले होते आणि बाकीच्या कर्तव्यांनी भरलेले दिसत होते, माणूस हा एक 'कठपुतली'सारखा आहे. आणि या बाहुलीला खेळवणारा 'वेळ' आहे. जशी वेळ आली तशी' ही 'माणूसरूपी' बाहूली खेळत असते, ती वेळ अनेक वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याकडून संघर्ष करवून घेत असते. आणि आपण त्या वेळेच्या इशाऱ्यावर नाचत असतो. शेवटी काय उरतं आपल्या हाती? तर काहीच नाही. ही प्रत्येक जिवंत असलेल्या 'जिवाची' 'व्यथा' आहे मग तो 'स्त्री' असो वा 'पुरूष' संघर्षांचा धडा आयुष्यभर गिरवत बसलो तरी शेवटी शून्य असलेलं जग समोर दिसतं, मग एवढा संघर्ष, जिवाचा आटापीटा कशासाठी? म्हणून आयुष्यात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. पण मिळवलेलं तरी किती काळ सोबत असतं, याचा कधी आपण विचार केलाय का? आपण फक्त संघर्ष-संघर्ष करत असतो.

'जीवन संघर्ष' कधीच संपणार नाही. आपण संपू तेव्हा आपल्यासोबतच तो संपेल, हे मात्र शाश्वत सत्य आहे. मग या संघर्षाला एवढं कशाला डोक्यावर चढवून ठेवायचं.

मस्त एक मोकळा श्वास घ्या! विचार करा! प्रत्येक गोष्ट मनापासून करा! म्हणजे संघर्ष करणे सुद्धा सोपे होईल, संघर्ष हा खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय आयुष्य शून्य आहे. तो तर करावाच लागेल. मग आपण संघर्ष करण्याचा मार्ग जर बदलला तर? जसे कूलूप उघडण्यासाठी आपल्याकडे चावी असली तर सहज आपण ती उघडू शकतो, नसेल किंवा हरवली तर ती तोडण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, एवढे करूनही नुकसानच होते.

मग संघर्षाचेही ही असेच आहे. संघर्षाशिवाय पर्याय नाही. पण याची चावी जर आपल्याकडे असेल तर नक्कीच सोपे होईल, आता संघर्षाची चावी म्हणजे अगदी मूर्खपणाच झाला असे तुम्हाला वाटेल, पण हो चावी असू शकते. बघा एखादे काम जर आपल्याला आवडत असेल तर ते अगदी सहज आपण करतो, आवडत नसेल तर कंटाळा येतो, आपण ते व्यवस्थितपणे छान करत नाही. हो मग आयुष्यात आपण संघर्ष कशासाठी करतो, तर चांगले पद मिळवण्यासाठी, संसार चांगला थाटण्यासाठी, पैसा, संपत्ती मिळवण्यासाठी, प्रेम, समाधान, शांती मिळवण्यासाठीच ना. मग ती गोष्ट आपण सहज, आवडीने, आनंदाने प्राप्त करू शकतो. आपण त्यातच संघर्ष केला पाहिजे, जे काम आपलेला आवडते. जे काम आपल्याला आवडते त्यातच आपला सर्वस्व ओतून काम करा म्हणजे वरील सगळ्या गोष्टी आपोआपच आपलेला मिळतील. आणि 'जीवनसंघर्ष' ही अगदी आनंदात परिवर्तीत होऊन जाईल. आता बघा जगाला वाटेल हे कसे शक्य आहे. तुम्ही, विचार करून बघा आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे, सर्व काही इथेच मिळणार आहे. स्वतःला आत्मनिर्भर करत जर तुम्ही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितले तर सगळे सकारात्मकच घडेल. परंतू आपण जगण्याकडे कंटाळवाणे किंवा मलाच सगळी संकटे येतात अस जर म्हटले तर सगळे जगच कंटाळवाणे आणि संघर्षमय बनून जाईल. म्हणून आपला दृष्टीकोन बदला, आपोआप जग बदलेल. 

देवाने सृष्टीची निर्मिती खूप विचारपूर्वक केलेली आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याने आपल्या अवतीभवती लपवून ठेवलेले आहे. ती शोधणं आपलं कर्तव्य आहे. हे सत्य आहे. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. तुम्ही पण हा अनुभव नक्कीच घेऊन बघा! विचार करा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. मग 'जीवनसंघर्ष' करत असतांना कुठेतरी एक मोकळा श्वास घेतला जाईल, धावपळीच्या विश्वात आपण हा सगळा विचार करण्याचा 'विचार' कधीच करत नाही. फक्त जगतो. संघर्ष-संघर्ष करतो, पण थोडे थांबून विचार करून बघा! कदाचित या क्षणापासून आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. आणि तुम्ही सुध्दा वरील सांगितलेल्या गोष्टीवर थोडा विचार करून स्वतःच आयुष्य स्वतःच बदलू शकता.

'जीवन संघर्ष' हा खेळच निराळा 
कधी उन्हाळा तर कधी पावसाळा 
बहू ऋतूंचे उधळण करणारा 
अबोल अन् निशब्द झरा

कधी खळखळ वाहणारा 
कधी शांततेत डोळ्यांतून झरणारा
डोळ्यांतून गुलाबाप्रमाणे उमलणारा 
काट्यासारखा कधी हृदयात रोवणारा

कधी धगधगत्या ज्वालेत ढकलणारा 
कधी फुलांच्या मऊ गादीवरती झुलवणारा.
कधी तर ह्रदयाची धडधड वाढवणारा
जीवनसंघर्ष' हा खेळच निराळा

सुख अन् दुःखाने 
भरलेला संसाराचा घडा 
पाऊलोपाऊली शिकवतो 
'जीवन संघर्षाचा' धडा

एकटा आहेस तू समजावून सांगणारा 
जीवन यात्रा एकदाच आहे. 
थकू नको पळत रहा, लढत रहा, 
'जीवनसंघर्ष' हा खेळच निराळा... 

Manisha Maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
परसोडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद