पहिला आणि शेवटचा दिवस समजून जगा आयुष्य..

जीवन खूप सुंदर आहे. या जीवनात कुठे आपल्याला पुन्हा-पुन्हा यायचे आहे.  दिलखुलास हसायचे, मनमोकळ रडाव पण झाले गेले तिथल्या तिथे सोडावे पुन्हा तिथून नव्याने आयुष्य जगायला सुरूवात करावी

पहिला आणि शेवटचा दिवस समजून जगा आयुष्य..

साधे-सरळ असणारे हे आयुष्य आपल्याकडून कधी गुंतागुंतीचे होऊन जाते ते कळत देखील नाही. अनेकजण जे आज आपल्याजवळ आहे त्यात आनंदी न राहता. जे नाही त्याचा विचार करत दुःखी राहतात. गेले काय आणि मिळणार काय? याकडे लक्ष असल्यामुळे आपल्याकडे आहे काय? हेच आपण विसरून जातो. यातूनच तर मग दुःखाचा जन्म होतो. जेव्हा कळेल ना खूप जास्त पैसे कमवून नाही, तर लहान-लहान गोष्टीतही आनंद शोधता येतो. जे आपल्याजवळ आहे त्यात समाधानी राहायला शिकले की, आयुष्याची गाडी बरोबर आनंदाच्या वाटेवर पळायला लागते. मग त्यासाठी वेगळी काही करायची गरज पडत नाही. नेहमी लक्षात ठेवायचे जास्त आनंद झाला आणि जास्त दुःखही झाली तरी, डोळ्यातील अश्रू सारखेच असतात. म्हणून फक्त सुख आणि दुःख यातील अंतर ओळखता आलं पाहिजे. कारण एक फुगा विकणारी मुलगी आणि विकत घेणारी मुलगी यांच्या चेहऱ्यावरील आनंद सारखाच असतो. फक्त एकीकडे विकला म्हणून आणि आणि एकीकडे विकत घेतला म्हणून आनंद असतो. मुखावरील अलगद उमटणा-या आनंदाची व्याख्या वेगवेगळी असते पण मिळणारा आनंद  एकच असतो. सुख कशात शोधायचे  याचा जुगाड जमला की, आयुष्यातील आनंदाला लागलेले कुलूप हळूवारपणे उघडते. 


जीवन खूप सुंदर आहे. या जीवनात कुठे आपल्याला पुन्हा-पुन्हा यायचे आहे.  दिलखुलास हसायचे, मनमोकळ रडाव पण झाले गेले तिथल्या तिथे सोडावे पुन्हा तिथून नव्याने आयुष्य जगायला सुरूवात करावी. किती दिवस कमवायचे, किती दिवस झटायचे. फक्त जबाबदारी पार पाडता-पाडता मनसोक्त आनंद घेत आयुष्य जगत रहायचे. आयुष्याला सकारात्मक दृष्टीने पहात प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. आज माझा पहिला आणि शेवटचा दिवस आहे असे समजत लोकांचा विचार न करता वेड्यागत जगून बघा. रात्रीनंतर दिवस येणारच या आशेवर जगले पाहिजे. सुखात सर्व हसतात पण दुःखात ही हसता आलं पाहिजे. थोडक्यात म्हणायचे तर, संकटांचा डोंगर समोर असतानाही हळूहळू करत आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे. खूप पुण्य असेल आपले कारण आपल्याला बुद्धिवान मनुष्याचा जन्म मिळाला. म्हणून सगळे व्याप विसरून कधीतरी चाकोरीबद्ध आयुष्य सोडून लहान मुलांसारखे आनंद मिळणा-या वाटेवर पळत सुटायचे, मग बघा जीवनाचा खरा आनंद काय असतो ते कळेल. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकांना आनंदाचे, हास्याचे काही क्षण देऊन न मोजता येणारी आपलेपणाची साथ देऊन बघा. जेव्हा तुम्ही इतरांचे आयुष्य, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी बघाल तेव्हा आपला त्रास आपोआपच कमी वाटायला लागले आणि आपले जीवन सर्वात सुंदर आणि अनमोल वाटायला लागेल.

कावेरी आबासाहेब गायके
भिवगाव तालुका वैजापूर
जिल्हा औरंगाबाद