प्रेम आकर्षण व वासना हे तिन्हीही वेगवेगळे प्रकार

माणूस जन्माला आला की, तो प्रेमाच्या नात्याने गुंफला जातो. मग त्या प्रेमाचे रूपांतर भक्तीत झाले की, ते प्रेम शक्ती बनते. भक्ती भोळी भाबडी कधीच नसावी त्यात पारदर्शकता असावी.

प्रेम आकर्षण व वासना हे तिन्हीही वेगवेगळे प्रकार

अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो,  आणि आपण तो प्रश्न जोडीदाराला विचारतो, तू इतका का जीव लावतो मला. किंवा इतके प्रेम कसे करतो? खरं खरं सांग असं काय पाहिलं माझ्यात. जो चंचल राजकीय बुद्धीचा (Political Mind) असतो ना! तो त्याला पटपट उत्तरे देतो. त्याला उत्तरे ही तसेच झकपक असतात. म्हणजेच तो म्हणतो, तू अगदी "तुझ्यात जीव रंगला" या सिरियलमधील अंजली (अक्षया देवधर) सारखी दिसतेस. कारण ती मुलींची आवडती नटी आहे. काहींचे उत्तरे तर तू माधुरीसारखी दिसते. तर काही म्हणतात, तू अक्षय कुमारसारखा दिसतो. वास्तविक पाहता, अंजली, माधुरी किंवा अक्षय कुमारसारखे अजिबात कोणीच दिसत नाही. हे फक्त जाळ्यात अडकविण्यासाठी आकर्षणाचे राजकीय षडयंत्र (The political conspiracy of attraction) असते. कारणं खरं प्रेम करणारा असे उत्तरे कधीच देत नाही. खरं प्रेम हे शब्दात मावणारं नसतं. आणि ते कुठल्या व्याख्येतही बसणारं नसतं. असे मला वाटते. 

जोपर्यंत समोरची व्यक्ती जाळ्यात अडकत नाही. तोपर्यंत स्तुती करत राहणे. स्तुतीचे प्रमाण इतके वाढवले जाते की, आपल्याला वाटते किती चांगली व्यक्ती आहे. किती जीव लावते आपल्याला. त्यामुळे आपण आकर्षणाला भाळतो. आणि होकार देतो. होकार मिळाला की लगेच थोड्यात कालावधीत त्या होकाराचे रूपांतर वासनेत होते. आणि वासना म्हटलं की दुःख आलेच म्हणून समजा, वासनेविषयी संत चांगदेव महाराज लिहितात,

वासनेच्या संगे नको जाऊ मना
पहा त्या रावणा काय झाले
इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा
नारद चुकला चाळा भजनाचा
चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो 
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा

महाराज म्हणतात, वासनेमुळे रावणासारख्या एवढ्या बलाढ्य माणसाचे काय झाले. ज्याची नगरी सोन्याची होती ती नष्ट झाली. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. देवाचा राजा इंद्र याचे पण वासनेमुळे काय झाले, हे आपणा सर्वांना माहितच आहे. तसेच वासनेमुळेच सुंदर असणारा चंद्र देखील काळा झाला. तसेच वासनेमुळेच रोज भजन करणारा नारद सुध्दा भजनापासून दूर गेला होता. एवढ्या मोठ्या लोकांची जर ही अवस्था झाली असेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची वासनेमुळे काय परिस्थिती होईल हे सांगणे कठीणच. कारण आकर्षणातूनच वासनेचा जन्म होतो. आणि वासनेमुळे फक्त दुःखच मिळू शकते, सुख कधीच मिळू शकत नाही.

वासना ही राक्षसी प्रवृत्ती आहे. कारण एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि त्याचे रूपांतर वासनेत झाले की, आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या जोडीदाराला ते आकर्षण व वासना एका क्षणात विसरायला लावते. कारण जो दुसरीकडे आकर्षित होतो. तो काही काळच आनंदी राहतो. परंतु या आकर्षणामुळे ज्याचा हात सुटला, त्याचे दुःख तर अवर्णनीय असते. ज्याने हात सोडला तो दूसऱ्या आकर्षणाच्या, वासनेच्या धुंदीत असतो. त्यामुळे त्याला हात सोडलेल्या व्यक्तीच्या दुःखाचे काहीच घेणे देणे नसते. त्याच्यातील माणूसकीचा पूर्णपणे अंत झालेला असतो. याचे कारण एकच ते म्हणजे आकर्षण आणि त्यातून जन्माला आलेली वासना.

याउलट प्रेमाचे असते. खरं प्रेम हे जणू ईश्वरभक्तीच असते. म्हणून कदाचित म्हणत असतील, भक्ती हे प्रेमाचे परमोच्च रूप आहे. ज्याचे वर्णन करणे अशक्य. परमेश्वर आणि साधक जेव्हा एकनिष्ट होतात तेव्हा जो प्रेम प्रकार घडतो तो म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजेच एकरूपता. असमानता म्हणजे विभक्त परमेश्वर आणि भक्त दोघेही एकनिष्ट होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात. त्यालाच भक्ती असे म्हटले जाते. एकरुपता म्हणजे प्रेम. आणि प्रेम म्हणजे दोन जीव, नाते, संबंधी, एकत्र येवून विचाराची देवाण घेवाण करतात, त्यांच्या विचारातील एकता म्हणजे प्रेम असे म्हणता येईल.
     
माणूस जन्माला आला की, तो प्रेमाच्या नात्याने गुंफला जातो. मग प्रेमाचे रूपांतर भक्तीत झाले की, तेच प्रेम शक्ती बनते. भक्ती भोळी भाबडी कधीच नसावी त्यात पारदर्शकता असावी. नात्यात देवघेव नसावी. भक्तीत शुद्ध समर्पणभाव असावा. जसा निष्ठावंत वारकऱ्याच्या मनात विठ्ठलाविषयी भाव असतो ना! तशाचप्रकारचा भाव खरे प्रेम करणाऱ्यात असतो. प्रेम ही एक अशी शुध्द भावना की, त्यामध्ये प्रतिकूलतेचं भान कधीच नसतं. प्रेमाचं हे प्रमुख लक्षणच आहे. भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाची व्याख्या खुपच सुंदर केलेली आहे.

सर्वथा ध्वंसरहितं सत्यपिध्वंसकारिणे। 
यद्भावबंन्धनं यूनोतत्प्रेमा परिकीर्तितः ।। 

वरील पंक्तीचा अर्थ असा की, उद्‌ध्वस्त होण्याचे सर्व प्रयोग केले जातात. परंतु जे कधीच उद्‌ध्वस्त होत नाही, त्यास प्रेम असं म्हणतात.

तसेच संत तुकाराम महाराजांनी त्यांचा एका अभंगात प्रेमाची व्याख्या खुपच सुंदर केलेली दिसून येते.

प्रेम नये सांगता बोलता दाविता। 
अनुभव चित्ता चित्त जाणे ।।

महाराज म्हणतात, प्रेम ही काही प्रदर्शन करायची भावना नाही. प्रेम ही मनापासून ते मनापर्यंत पोहचणे आवश्यक असते. हल्लीच्या काळात खरे प्रेम मिळणे तसे खुप अवघड आहे. कारण प्रेम हा काय प्रकार आहे. ही भावना काय आहे. हे किती जनांना माहीत आहे. हाच खुप मोठा प्रश्न आहे असे मला वाटते. कारण सद्यपरिस्थितीत आकर्षणाला व वासनेलाच प्रेम म्हटले जाते. आणि त्यालाच "अफेयर" म्हटले जाते. हल्ली याचे तिच्याशी अफेयर आहे. तिचे त्याच्याशी अफेयर आहे. असे शब्दप्रयोग सर्रास केले जाते. परंतु याचे तिच्यावर प्रेम आहे. किंवा तीचे त्याच्यावर प्रेम आहे. असे बोलतांना कोणी दिसत नाही. त्यामुळे आपण सहज समजू शकतो, किती लोकांना प्रेम कळतं.

म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की, खरं प्रेम मिळणं हे ईश्वरप्राप्तीसारखेच असते. ज्याला खरे प्रेम मिळाले, त्याला साक्षात देव मिळाला, असे मला मनापासून वाटते. 

प्रेम म्हणजे देव
प्रेम म्हणजे भक्ती,
प्रेम म्हणजे साधना
प्रेम म्हणजे शक्ति।।


बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद