व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याविषयी नेमकी माहिती कुठेच उपलब्ध नाही. तरीही या दिवसामागे एक रंजक अशी दंतकथा सांगितली जाते. इ.स. २७० मध्ये रोमन साम्राजाचा क्लाऊडियस गोथिकस (द्वितीय) नावाचा राजा होता. त्याला प्रेम करणे, विवाह करणे या गोष्टींचा तिटकारा होता. प्रेम, विवाह याला तो जोरदार विरोध करत असे. प्रेम आणि विवाह यामुळे सैनिक आपले लक्ष्य विसरतात, आपल्या कामावर लक्ष्य देत नाही. अशी त्याची ठाम भुमिका होती.
राजा क्लाऊडियस गोथिकस (द्वितीय) याने आपल्या साम्राज्यात एक फतवा काढला होता. त्यानुसार, कोणताही सैनिक प्रेमात पडणार नाही. तसेच विवाह देखील करणार नाही. विवाह न केल्यामुळे सैनिकांचे मनोबल आणि ताकद उंचावते, अशी राजाची स्पष्ट धारणा होती.
राजा क्लाऊडियस गोथिकस (द्वितीय) याने दिलेल्या आदेशाला संत व्हॅलेंटाइन यांनी तीव्र विरोध दर्शवला. रोमन साम्राज्याला त्यांनी प्रेमाचा संदेश दिला. तसेच राजाच्या विरोधात जाऊन त्यांनी सैनिकांना प्रेम करण्याची प्रेरणा दिली. इतकेच नव्हे, तर काही सैनिकांचे विवाह देखील करून दिले. ज्यावेळी राजाला ही गोष्ट समजली त्यावेळी राजाने संत व्हॅलेंटाइन यांना मारण्याचे फर्मान राजाने सोडले.
संत व्हॅलेंटाइन यांना ज्या दिवशी मारण्यात आले, तो दिवस होता १४ फेब्रुवारी. संत व्हॅलेंटाइन यांनी मृत्युपूर्वी जेलर याच्या आंधळ्या मुलीला बरे केल्याची दंतकथाही सांगितली जाते. जेलमध्ये असताना संताने जेलरच्या मुलीला पत्र लिहिले होते. त्यांनी पत्रात शेवटी 'फ्रॉम युअर व्हॅलेंटाइन' असे लिहिल्याचे सांगितले जाते.
काही पुस्तकाच्या उपलब्ध माहितीनुसार, इ.स. ४९६ मध्ये पहिल्यांदा "व्हॅलेंटाइन डे" साजरा करण्यात आला. सुरुवातीला हा दिवस "रोमन फेस्टिव्हल" म्हणून साजरा करण्यात येत असे, अशी त्याला मान्यता ही आहे. पोप गॅलेसियस यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून घोषित केल्याचे काही माहितीच्या आधारे समजते. तेव्हापासून १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.
सन १२६० मध्ये संकलित केलेल्या 'ऑरिया ऑफ जॅकोबस डी वॉराजिन' या पुस्तकात संत व्हॅलेंटाइन यांच्याबद्दल पुष्पळ अशी माहिती मिळते. या संताने प्रेमाचा संदेश समाजाला दिला आणि आनंदी राहण्याचा गुरुमंत्र दिल्याची स्पष्ट माहिती या पुस्तकातून देण्यात आलेली आहे. अनेक ख्रिश्चन हुतात्म्यांची नावे देखील व्हॅलेंटाइन असल्याचा उल्लेखही वरील पुस्तकात आढळतो.
सन. १९६९ मध्ये औपचारिकरित्या ११ दिवसांचा 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्याला चर्चनी मान्यता दिल्याची माहीती आहे. ख्रिश्चन धर्मातील सर्व संतांच्या सन्मानार्थ १४ फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो.
प्रेमाचा उत्सव मानला जाणारा 'व्हॅलेंटाइन डे' पूर्ण विश्वात साजरा केला जातो. महाविद्यालयातील युवकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असतो. युवक-युवती आपापल्या जोडीदाराचा शोध या दिवशी घेत असतात. प्रेम सागरात युवक युवती डुंबतात. प्रेमात कोणतीही अट नसते. प्रत्येक युगुल आपापल्या पद्धतीप्रमाणे 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करत असतो. विवाह झाला असो, अविवाहित असो, नवीन रिलेशनशिप असो वा जोडीदाराचा शोध घ्यायचा असो, 'व्हॅलेंटाइन डे' ची आतुरतेने वाट पाहिली जाते. या दिवशी जोडीदार एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट असते. प्रेमाला मर्यादा नसतात, बंधने नसतात, प्रेमात कोणतीही अट नसते. तसेच प्रेम ही पूर्ण विश्वाला व्यापून टाकणारी सुखद भावना आहे. दिव्य प्रेमामुळे प्रत्येक दुःखी माणूस सुखी होऊ शकतो. असे माझे मत आहे.
प्रेम म्हणजे मंद झुळूक वाऱ्याची
प्रेम म्हणजे संथत धार पाण्याची,
प्रेम म्हणजे आकाशाची व्याप्ती
प्रेम म्हणजे अनोखी दैवी शक्ती,
प्रेम गगन धरतीचे दिव्य मिलन
प्रेम राधा-कृष्णाचे अनुशीलन,
प्रेम खळखळणारा प्रीतीचा झरा
प्रेम दुःखी मनाला मिळालेला आसरा,
प्रेम परमेश्वराची अंतकरणातून भक्ती
प्रेम सर्व व्यक्त होता येईल अशी व्यक्ती
खरंच प्रेमाला समजून शब्दात बांधणं तसं कठीणच पण प्रत्येक जण स्वतःच्या विचारशक्तीप्रमाणे त्याची व्याख्या करतो. माणसाला जीवन जगताना एक आनंदाचा क्षण जगण्यासाठी कारण लागतं. त्यातीलच एक कारण म्हणजे प्रेम. आनंदी जगण्यासाठी प्रत्येक जण प्रेमाचा आसरा घेतो. कोणी देवावर भक्तीरूपी प्रेम करतो, कोणी मातापित्यावर वात्सल्यरुपी प्रेम करतो, तर कोणी सखीवर राधाकृष्णरुपी प्रेम करतो. प्रेमाला दिशा, बंधन किंवा मर्यादा नसतातच मुळी. प्रेम स्वच्छंद आणि निर्मळ भावना आहे. 'व्हॅलेंटाईन डे' एक निमित्त आहे. पण वास्तविक पाहता प्रेम कोण्या दिवसाचं किंवा आठवड्याच बांधील नाही. प्रेम अपार, अथांग सागरासारखं आहे. त्याचा तळ आजून कोणालाच सापडेलेला नाही. 'व्हॅलेन्टाईन डे'च्या निमित्ताने निव्वळ प्रेमाचं भडक प्रदर्शन करणाऱ्या युवक युवतींनी थोडं भान ठेवायला हवं. सामाजिक आणि कौटुंबिक जेणे करून 'व्हॅलेंटाईन डे' सारख्या सर्वांच्या प्रेमदिवसाला बंधन न पडता तो मोकळेपणाने आपलं प्रेम मग ते आईवर, बाबांवर, ताईवर, दादावर, मित्रावर किंवा मैत्रिणीवर असो व्यक्त करता येईल. पाश्चात्य उतावीळपणा म्हणून त्याची अवहेलना होणार नाही.
करा प्रेम आकाश आणि धरतीसारखे,
करा प्रेम राधा, कृष्ण, मीरेसारखे
करा प्रेम श्वासासारखे,
करा प्रेम निस्वार्थ सागरासारखे,
प्राण त्याग करूण सखीच्या चेहऱ्यावर
हास्य फुलविणारे...
बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद