प्रेम ही जगातील सर्वात सुंदर आणि अदृष्य भावना आहे. प्रेम म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूपच आहे. जसा परमेश्वर आपलेला डोळ्याने दिसत नाही. पण त्याचे अस्तित्व आपलेला नक्कीच जाणवते. तसेच प्रेमाचे देखील असते. प्रेम डोळ्याने कधीच दिसत नाही. ते फक्त जाणवते. त्याची सुखद अशी अनुभूती आपल्या अंतर्मनाला जाणवते. सुखद अनुभव घ्यायचा असेल तर आपलेला खरं प्रेम करावा लागेल.
हल्ली खरे प्रेम कुठच दिसत नाही. दिसते ती फक्त शारीरिक वासना आणि शारीरिक आकर्षण. प्रेम हा शरीरावर करण्याचा विषयच नाही. शारीरिक भूक तर वेश्या वस्तीतही भागवली जाते. तिथे एकत्र येतात फक्त दोन शरीरं. मनाचा तिथे काहीही संबंध नसतो. प्रेमासाठी दोन शरीरं एकत्र येण्यापेक्षा दोन मनं एकत्र येणं गरजेचं असतं. दोन स्वभाव एकत्र येणं आवश्यक असतं.
प्रेम हे एका क्षणात होणारी अनुभूती नाही. प्रेम हे सहवासाने, काळजीने, स्वभावाने फुलत जाते. आकर्षण हे क्षणिक असते. परंतु एकाच व्यक्तीबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत असणारं आकर्षण याला ही आपण प्रेम म्हणू शकतो. कितीही अडचणी आल्या तरी जे आकर्षण कायम टिकून ठेवले जाते तेच खरे प्रेम. जसे एखाद्या विठ्ठल भक्ताला विठ्ठलाची मूर्ती डोळे भरून पाहण्याचे आयुष्यभर जे आकर्षण असते तीच खरी भक्ती असते. आणि भक्ती म्हणजे प्रेम. काही मोठेपणाचा गंज चढलेल्या वृत्तीचे लोकं असतात. ते फक्त दिखाव्यासाठी भक्ती करतात. त्याला भक्ती म्हणता येणार नाही. त्याला क्षणीक आकर्षण म्हणावे लागेल. क्षणीक आकर्षणात कधीच माणूस सुखी होऊ शकत नाही. ईश्वर भक्ती असो किंवा प्रेम असो हे मनापासून केले पाहीजे, तरच आपलेला सुख मिळू शकते. आकर्षण हे क्षणिक असतं. परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल आयुष्यभर आकर्षण ठिकून ठेवणे याला देखील प्रेम म्हणता येईल.
संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून एका ठिकाणी म्हणतात की,
आवडे हे रूप गोजिरे सगुण ।
पाहतां लोचन सुखावले ।। १ ।।
आता दृष्टीपुढे ऐसाचि तूं राहें ।
जो मी तुज पाहें पांडुरंगा ।। २ ।।
महाराज म्हणतात, अरे देवा, तुझे गोजिरे सगुणरूप पाहून माझ्या डोळ्यांस सुख झाले आहे, म्हणून मला हेच रूप आवडते. हे पांडुरंगा, ज्या वेळी मी तुला पाहीन त्यावेळी माझ्या दृष्टीपुढे तू जसा आहेस तसाच कायम रहा. तुकाराम महाराज पांडुरंगाची भक्ती करू लागले, त्यांच्या नामस्मरणात तल्लीन होऊ लागले. विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. ते जेथे जातील तेथे विठ्ठल त्यांच्याबरोबर असायचा. त्यांची सावलीही त्यांना विठ्ठलाप्रमाणे भासायची. त्यांना उठता-बसता, जागेपणी, स्वप्नही विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे, कटीवर हात ठेवलेले, कंठी तुळशीमाळा, कंबरेला जरीकाठी पितांबर नेसला आहे. कपाळी कस्तुरी मळवट भरला आहे व मस्तकावर मुकुट व कानात कुंडले धारण केली आहेत. अंगावर भरजरी शेला आहे. शेजारी आई रखुमाबाई उभी आहे. असे सगुण श्रीमुख त्यांना दिसत आहे. त्यांना हे रूप पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद दिसत आहे. (डोळ्यास सुख प्राप्त झाले आहे.) त्यांना विठ्ठलाचे हे रूप आवडायला लागले. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, तू जसा आहेस तसाच माझ्या दृष्टीपुढे रहा. हे झालं आपल्या परमेश्वराबद्दल आयुष्यभर असणारं आकर्षण. विठ्ठलनामाशिवाय कोणत्याही गोष्टीचे त्यांच्या मनात कधीच आकर्षण निर्माण झाले नाही. आपल्या मृत्यूपर्यंत त्यांच्या मनात फक्त विठ्ठल नामाचेच आकर्षण होते. दुसरे कधीच आकर्षण त्यांच्या मनात निर्माण झाले नाही. याच आकर्षणाला भक्ती म्हणतात. आणि आपल्या भाषेत प्रेम म्हणतात.
असेच माणसाच्या आयुष्यात पण घडत असतं. माझा सागर नावाचा एक आहे. तो ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करायचा. खुप जीव लावायचा. तिच्या आठवणीत व्याकुळ व्हायचा. पण ती त्याच्यासोबत नेहमीच अबोल असायची. पण सागर तिच्यावर मनापासून प्रेम करायचा. ईश्वर भक्तीसारखी श्रद्धा त्याच्या मनात तिच्याविषयी असायची. कधी स्वप्नात पण तिच्याविषयी सागरच्या मनात तिरस्कार निर्माण झाला नाही. ती जेव्हा आजारी असायची. काही संकटात असायची तेव्हा परमेश्वरच सागरच्या मनात येऊन सांगायचा अरे तू जिच्यावर जीवापाड प्रेम करतो ती आजारी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर माहीती घ्यायचा तेव्हा त्याला लगेच कळायचे 'ती' आजारी आहे. तीची आजारपणाची बातमी ऐकून सागर कासावीस व्हायचा. आणि त्याचे डोळे आपोआपच भरून यायचे. यालाच खरं आयुष्यभराचं आकर्षण म्हणावं, यालाच खरं प्रेम म्हणावं.
हल्ली चेहऱ्याच्या व शरीराच्या आकर्षणामुळे प्रेम केलं जातं. आणि ते क्षणीक असतं. चेहऱ्याचे आणि शरीराचे सौंदर्य फक्त काही काळ असते. ते आकर्षण नंतर कमी कमी होत जाते. ते फक्त काही काळापुरते मर्यादित असते. आणि एक दिवस संपुष्टात येते.
जे आकर्षण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस वाढत जाते. त्याला देखील प्रेम म्हणतात. आणि प्रेम हे कधीच तिरस्कार शिकवत नाही. प्रेम हे शांततेचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. हे प्रेम करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. असे माझे मत आहे.
बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद