एकटेपण वाटून घेण्यापासून ते एकटेपण वाटूच न देण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम..!

सुखाच्या प्रसंगी आपली सगळेच साथ देतात, परंतु दुःखाच्या प्रसंगी आपल्याला एका चांगल्या माणसाच्या आधाराची नितांत गरज भासते. जेव्हा जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा आपल्याला मानसिक आधार देणारी एक व्यक्ती असायलाच हवी.

एकटेपण वाटून घेण्यापासून ते एकटेपण वाटूच न देण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम..!

आपल्या आयुष्यात असे अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. ज्यामुळे आपलं आयुष्यचं बदलून जाते. आपल्याला अनेक निंदा करणारे माणसं भेटतात. त्यावेळी मन शांत होतं, आपणं एकटे पडतो, नेमका काय निर्णय घ्यावा, ते आपल्याला सुचत नसत. अशा लोकांमुळे फक्त आपली निराशाच होत असते. मला वाटतं, अशा लोकांचा विचार करण्यात आपण आपला वेळ फुकट वाया घालवतो. त्या लोकांकडे लक्ष न देता आपण आपल्या प्रगतीच्या मार्गावर चालत रहावं. 

आयुष्यात असे खूप कठीण प्रसंग येतात, प्रत्येकाला तोंड द्यावच लागत. लोकांनी कितीही निंदा केली तरी आपणं त्याकडे दुर्लक्ष करावं, फक्त शरीराने स्वस्थ असून काहीच उपयोग नसतो, माणसाने मनाने देखील निरोगी आणि स्वस्थ असावं, कधी कधी आपल्याला ते खूप आवश्यक असतं. जिथं आयुष्य आहे, तिथं अडचणी आणि वाईट प्रसंग नक्कीच येतात. 

सुखाच्या प्रसंगी आपली सगळेच साथ देतात, परंतु दुःखाच्या प्रसंगी आपल्याला एका चांगल्या माणसाच्या आधाराची नितांत गरज भासते. जेव्हा जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा आपल्याला मानसिक आधार देणारी एक व्यक्ती असायलाच हवी. असं मला तरी वाटतं. अहो, माणूस जर एकदा मनाने एकटा पडला की त्याचा एकटेपणा दूर करणारी व्यक्ती सतत त्याला त्याच्याजवळ असावी असं मनापासून वाटतं. अशावेळी एखादी प्रेमळ आणि मनाने सुंदर व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तर नक्कीच ती आपल्यासाठी स्पेशल असते. आपल्या मनातील सर्व काही आपण हक्काने त्या व्यक्तीला सांगतो. आपोआपच हळू हळू एकमेकांबद्दल जाणून घ्यायला लागतो, एकमेकांचे सुख दुःख वाटून घेतो. आपल्या मनातील सर्व इच्छा एकमेकांना हक्काने सांगतो, मग जगाने आपली कितीही निंदा केली तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. 

एकटे पडलेल्या माणसाला आपल्या बोलण्यामुळे जर आधार वाटत असेल आणि त्याचा एकटेपणा दूर होणार असेल तर नक्कीच आपण त्याचा एकटेपणा दूर केला पाहिजे. दूर असूनही आपण मनाने त्याच्याबरोबरच आहोत याची जाणीव सतत त्याला वाटायला हवी. शरीराने लांब असलो तरी मनाने एकमेकांच्या सोबत असणाऱ्या त्या दोन व्यक्तींच्या नात्याला नावाची गरज भासत नाही. अदृष्यपणे त्याची सोबत आपल्याला खूप काही सांगून जाते. एकाकी पडलेल्या आपल्या मनाला त्याची कायमस्वरुपी साथ मिळते. मग एकटेपणा वाटून घ्यायचा कारणच उरत नाही. समजा असं झालच तर त्या व्यक्तीच्या गोड आठवणी आपल्यासोबत असतातच ना! काही कारणांमुळे बोलणं झालं नाही संपर्क होऊ शकला नाही तर हताश होण्याची गरजच नसते. कारण त्या व्यक्तींसोबत आपण घातलेले क्षण आणि आठवणी ह्या इतक्या सुंदर असतात की, आपल्याला त्या व्यक्तीची कमी जाणवतच नाही. कारण आपण त्याचा एकटेपणा वाटून घेतलेला असतो. अर्थात त्या व्यक्तीला एकटे वाटत नाही कारण हा एकटेपणा आपण दूर केलेला असतो. मग त्या व्यक्तीला आपण एकटं पडूच देत नाही. 

हा 'एकटेपणा वाटून घेण्यापासून' ते 'एकटेपण वाटून न देण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे खरे प्रेम असते. हे प्रेम असं असत जे दोन व्यक्तींनी एकमेकांसाठी वाटून घेतलेलं असतं म्हणून कधीच कुणाला एकटं वाटत नाही, असं मला तरी वाटतं.

  प्रिती सुरज भालेराव, पुणे