प्रेमाचा जन्म हृदयातून झाला पाहीजे

खरं प्रेम म्हणजे नेमकं काय हे अजून कुणालाच कळलेलं नाहीये. फक्त आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे, एखादी व्यक्ती दिसायला खूप सुंदर आहे...

प्रेमाचा जन्म हृदयातून झाला पाहीजे

प्रेम ही भावना अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. जगातील एकुण साहित्यापैकी पन्नास टक्के साहित्य प्रेमाभौवती फिरते. तसेच जगातील एकुण चित्रपटापैकी नव्वद टक्के चित्रपट प्रेमावर चित्रित झालेले असतात. तसेच आध्यात्मिक ग्रंथात देखील प्रेमाची महती वर्णिली आहे. प्रेम ही खुप श्रेष्ठ व सहज भावना आहे. परंतु आजकालच्या युगात प्रेम या भावनेचा अर्थ कुणालाच समजत नाही. असे वाटायला लागले आहे. प्रेमाच्या नावाखाली एकमेकांची निव्वळ फसवणूक करण्यात येते.

खरं प्रेम म्हणजे नेमकं काय हे अजून कुणालाच कळलेलं नाहीये. फक्त आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे, एखादी व्यक्ती दिसायला खूप सुंदर आहे. ती आपल्याला मनापासून आवडते म्हणजे आपलं तिच्यावर प्रेम आहे असं नाही ना. अहो! प्रेम म्हणजे केवळ आकर्षण कधीच नसतं. प्रेम ही एक खूप पवित्र भावना आहे. जीचा जन्म हृदयातून झाला पाहिजे. फक्त एखादी व्यक्ती आपल्याला आवडते म्हणजे आपण तिच्यावर प्रेम करतो असं कधीच नसतं. 

खर प्रेम केलं राधेने तिच्या कृष्णावर. राधेच आणि कृष्णाच एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि ते होतं भक्ती प्रेम. भक्ती प्रेम या शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. लहानपासून राधा आणि कृष्ण एकत्र खेळले एकत्र वाढलेले होते तेव्हा कृष्णाने राधेवर किंवा राधेने कृष्णावर असे जाणून -बुजून प्रेम केले नव्हते. ती एक पराकोटीची भक्ती होती. ज्यातून प्रेमाचा जन्म झाला होता. ज्यामध्ये रागावणं सुद्धा होतं. कृष्णाने राधेच्या मुद्दाम खोड्या काढायच्या आणि राधेने कृष्णावर चिडायचं. गोकुळात असंख्य गोपिका असतांना देखील कृष्णाने मनापासून फक्त राधेवरच प्रेम केले. मला वाटतं खरं प्रेम जर कोणाला मिळालं तर त्या माणसाचा देव होतो. हो! हे अगदी खरं आहे. आपल्यावर मनापासून प्रेम करणारं कोणी भेटलं तर आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते. सगळं काही बदलून जातं. एकमेकांची काळजी करणं, एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना सारं काही सांगणं मला वाटतं यालाच 'प्रेम' म्हणतात. प्रेमामध्ये जात-पात-धर्म, कुळ-गोत्र, उच-निच, गरीब-श्रीमंत असं काहीच नसतं. ती एक शुद्ध भावना असते. जी मनापासून निर्माण होते. खऱ्या प्रेमाची ताकद खूप मोठी असते. त्यामुळे अशक्य गोष्टीदेखील खऱ्या प्रेमामुळे शक्य होतात.

प्रेमाची व्याख्या करता येत नाही. शब्दांने प्रेम सांगताच येत नाही. मुक्याने गुळाचा स्वाद घेतला, अनुभवला, पण ती गोडी त्या मुक्याला काही सांगता येत नाही. प्रेम ही अंत:करणाची वृत्ती आहे. भाव आहे. हृदयाचा जिव्हाळा आहे. प्रेम ओढून ताणून करता येत नाही. भगवत प्रेम प्रत्येकात निर्माण होईल असेही नाही. ती संवेदना एखाद्याच भाग्यवंताला मिळते. नामस्मरण, जप तर सर्वांनाच करता येईल, पण प्रेम कसे आणायचे?

सगळया गोष्टींचा अभ्यास करता येतो पण प्रेमाचा अभ्यास होत नाही. प्रेमात अपेक्षा नसते. कामवासनेचा तर पुसटसा स्पर्शही नसतो. प्रेमाला सत्व, राज, तमाचा यत्किंचित गंधही नसतो. त्रिगुणांच्या पलीकडची ती गोष्ट आहे. प्रेम ही परमभक्ती आहे. मीरेचं परमविशुद्ध प्रेम. ती परमभक्ती, ते परमप्रेम. त्यामुळेच वृंदावनातल्या गोपींना भगवंताचं दर्शन घडविले. भगवतदर्शन घडले तेव्हा गोपिका देहभान हरपून जायच्या.

कधी कधी अस वाटतं या बाजारू जगात निष्काम प्रेम करणारे सापडतील का? असा प्रेमातला उदात्तपणा आज खरंच हरवला आहे का? प्रेम कधी शब्दातून व्यक्त केले जात नाही. प्रेम एक दिव्य अनुभूती आहे. ती प्रत्येकालाच अनुभवायला मिळणार नाही. प्रेम म्हणजे केवळ वासना नव्हे. आजकाल कथा चित्रपटात दाखवतात ते प्रेम नसतं. एखादी व्यक्ती आपल्यापासून कितीही दूर असली ना, तरी ते अंतर जाणवत नसतं, सतत त्या व्यक्तीची आठवण सतत तिचे विचार आपल्या मनात असतात. ज्या व्यक्तीचा मिनिटभर सुद्धा आपल्याला विसर पडत नाही. मनातल्या मनात तिची काळजी करणं आणि केवळ तिच्यासाठी झुरण हा योगायोग नसतो, तर ते आपलं त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असतं. प्रेम हे मागून मिळत नसतं, तर ते आपोआप मिळायला हवं. समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून जर कुणी प्रेम करत असेल तर त्याला प्रेम म्हणता येणार नाही. प्रेम ही एक शुध्द भावना आहे जिथं तू मी असं काहीच नसतं.

प्रिती सुरज भालेराव,

धनकवडी, पुणे