स्वतःवर प्रेम करा जग सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल

परमेश्वराने माणसाला एवढा सुंदर देह दिला त्यावर आपल्या सर्वांना गर्व असायला हवा. तसे तर जीवजंतू, कीटक, प्राणी, पक्षी देखील जीवन जगत असतात. परंतु त्यांना कोणत्याच प्रकारच्या संवेदना नसतात.

स्वतःवर प्रेम करा जग सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल

परमेश्वराने माणसाची निर्मिती करताना अतिशय विचारपूर्वक केली असावी. राग, द्वेष, प्रेम, इर्षा, समाधान असे अनेक प्रकारचे भाव त्याने फक्त मनुष्याला दिलेले आहेत. आजकालच्या कलियुगात कोणतीही गोष्ट करायची झाली तर आपण प्रथम समाजाचा विचार करतो, हे असं केलं तर समाज काय म्हणेल, ते तसं केलं तर समाज काय म्हणेल, हाच विचार आपल्या मनात ठाण मांडून बसला आहे. पण मला वाटतं आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करायची असेल, तर त्यासाठी आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. ज्या समाजाचा आपण प्रत्येक गोष्टीसाठी विचार करत राहतो, तो समाज म्हणजे तुम्ही आणि मी असा मिळून तयार झालेला असतो. त्यापैकी एक म्हणजे आपण 'स्वतः' असतो.

मला हे जमेल का? मी हे करू शकेल का? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात, या प्रश्नाचे उत्तर आपण आपले स्वतः शोधावं लागते. जेव्हा आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्याला त्याची योग्य उत्तरं मिळतात. नाव ठेवणे हा जणू काही लोकांचा एक आवडीचा विषय आणि गुणधर्म आहे. आपल्याला जर आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर त्यासाठी लोकांनी केलेली निंदा व टीका आपण सहन करायला हवी. ते म्हणतात ना! "निंदकाचे घर असावे शेजारी."

आपणं स्वतः जेव्हा आपल्या स्वतःवर  प्रेम करू तेव्हाच तर जग देखील आपल्यावर प्रेम करेल. आपण आपल्या स्वतःमध्ये विश्वास निर्माण करायला हवा, प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याकडे दांडगा विश्वास असायला हवा. प्रचंड इच्छाशक्ती असायला हवी. कोणतीही गोष्ट अशक्य नसते, तिला शक्य करणे हे केवळ आपल्याच हातात असते. जेव्हा आपण आपल्याच प्रेमात पडू तेव्हाच तर जगावर आपल्या कलागुणांची आपल्यातील सुप्त गुणांची छाप पडू शकते. मला सर्वकाही येतं. हा आत्मविश्वास खूप काही शिकवून जातो. आपल्यामध्ये असलेल्या एखाद्या गुणावर, कृतीवर आपणं मनापासून प्रेम केलं की आपोआपच जगाला ती गोष्ट आवडायला लागते. असं मला वाटतं.  म्हणूनच कदाचित कवीवर्य मंगेश पाडगावकर म्हणाले असतील, 

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे 
चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती 
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती 
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

परमेश्वराने माणसाला एवढा सुंदर देह दिला त्यावर आपल्या सर्वांना गर्व असायला हवा. तसे तर जीवजंतू, कीटक, प्राणी, पक्षी देखील जीवन जगत असतात. परंतु त्यांना कोणत्याच प्रकारच्या संवेदना नसतात. चौऱ्याऐंशी लक्ष जिवांमधून फिरून येऊन शेवटी माणूस जन्म मिळतो, तर त्या देहाची किंमत आपल्याला असायलाच हवी ना. खरे पाहायला गेले तर केवळ माणूस हा एकच प्राणी आहे जो प्रेम करू शकतो. प्राणी, पशूपक्षी यांना प्रेम करण्याचा अधिकार देवाने दिला नाही. आपल्या अंतरात्म्यामध्ये प्रत्यक्ष देवाचे वास्तव्य आहे. तो सर्वाभुती व्यापक, निर्गुण निराकार आहे. असा जो आपल्या देही वसलेला परमेश्वर आहे त्याच्यावर आपण प्रेम करावं. थोडक्यात नकळत आपण आपल्या स्वतःवरही प्रेम करावं. जिथं आपण आपल्या स्वतःवर प्रेम करायला लागू तिथं हळूहळू सगळं जग देखील आपल्यावर प्रेम करणारच. आपल्यामध्ये असणारे शुध्द भाव, सात्विक वृत्ती आपल्या जगण्यामध्ये चैतन्य निर्माण करते. अर्थातच आपण नव्याने आपल्याच प्रेमात पडतो असे मला वाटते. मला सर्वकाही येऊ शकते, मी सर्वकाही करू शकते हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहावे. याच आत्मविश्वासाच्या बळावर आपण सगळ जग जिंकू शकतो असे मला वाटते.

सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्रत्यक्ष परमेश्वर या चराचरात वसला आहे. त्याचा अंश या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवांमध्ये आहे. परंतु केवळ माणसालाच प्रेम करता येतं... न्हवे न्हवे ते केवळ माणसालाच शक्य आहे. थोडक्यात प्रेम करायचे  वरदान ईश्वराने मनुष्याला दिले आहे, असेच म्हणावे लागेल. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की ज्यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो की काय अशी भिती माणसाला वाटते. परंतु त्याच क्षणी आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून एखादे पाऊल उचलले की अशक्य गोष्ट देखील आपण शक्य करू शकतो. त्यासाठी प्रथम आपण आपल्या स्वतःवर प्रेम करावे. दैनंदिन जीवनात काय काय घडले याची चर्चा आपण आपल्या स्वतःशीच करावी. योग्य अयोग्य याचा विचार करायला हवा. त्यासाठी आपण स्वतःशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. स्वतःला वेळ देऊन आपल्या गुणांचे परीक्षण करायला हवे. योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टींची सांगड आपण घातली की, आपण परिपूर्ण झालो असे मला वाटते, शेवटी काय तर जग जिंकण्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करा, नकळतपणे सगळं जग आपल्या प्रेमात पडेल. यात मला अजिबात शंका वाटत नाही. 

प्रिती भालेराव, पुणे