माननीय मुख्यमंत्री यांचा आदेश कानी पडला आणि विचारांच वादळ डोक्यात सुरू झालं. माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ अनाथांच्या माय. म्हणाल्या होत्या 'बेटा कर्नाटकात माझं पुस्तक अभ्यासक्रमात आहे, पण महाराष्ट्रात नाही.' कारण महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं, बेटा मरावं लागतं! "
अनंतात विलीन झाल्यानंतर त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करावा असा मुख्यमंत्र्यांचा आदेश हेच सिद्ध करतोय की, महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी खरोखरच मरावं लागतं. कोण होत्या सिंधुताई सपकाळ, कोणाशी रक्ताचं नातं होतं का त्यांचं? कोणाशी प्रेमाचे लागेबांधे होते का? कोणाशी पारिवारिक संबंध होते का? कोणाशी फायद्याचा व्यवहार होता का? का उभ्या महाराष्ट्राने सुतक पाळले सिंधुताईचे? प्रत्येकाच्या स्टेटसला अश्रुपूर्ण नयनानी सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली का दिली? का अवघा महाराष्ट्र नव्हे बहुतांश भारत देश हवालदिल झाला सिंधुताईच्या जाण्याने? का सर्वजण अनाथांची माय गेली असा आक्रोश करत होते? का सख्ख्या आईला नीट न बघणारे यांना सुद्धा माईच्या जाण्याची हळहळ वाटली? का फक्त एका माईच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. असं वाटून गेलं? असे हजारो का आहेत याचे उत्तर जरी शोधायचं म्हटलं तरी अशक्य आहे किंवा एक पुस्तक तयार होईल माईवर.
मला प्रकर्षाने आताही आठवतात ते माईंचे शब्द "बेटा भाषण नहीं, तो राशन नहीं!" मी बोलावलेल्या सर्व ठिकाणी भाषणाला जाते आणि शेवटी माझ्या लेकरांसाठी पदर पसरते. आज भलेही सिंधुताई सपकाळ सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ समाजसेविका, त्यागाची मूर्ती, अशा अनेक मोठ्या शब्दात वर्णन केले जात असेल. वर्तमानपत्रातून भरभरून त्यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंत लिहिलं जात असेल, पण हयात असताना अनाथांना सांभाळत असताना त्यांना एवढ्या अडचणींना सामना का करावा लागला. महाराष्ट्रातून त्यांना मदतीचे हात कमी का पडत होते. कारण महाराष्ट्रात मेल्याशिवाय माणसाची किंमत कळत नाही. त्याचा उदोउदो होत नाही. मेल्यावरच विविध उपाध्यांनी महाराष्ट्रात माणसाचा सन्मान केला जातो. अभ्यासक्रमात समावेश करून मोठं केलं जातं, आणि हे जर खोटं असेल तर, माईंच्या मृत्यूपूर्वीच्या वक्तव्याचा नक्कीच कमीत कमी महाराष्ट्र शासनाने तरी विचार केला असता. कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रात माईच्या डोळ्यात प्राण असेपर्यंत जिवंतपणी अभ्यासक्रमात त्या त्यागमूर्तीचा, अनाथाच्या माईचा, पोरक्याच्या आभाळाचा समावेश केला असता. कमीत कमी माई तरी जाण्यापूर्वी समाधानात बोलून गेल्या असत्या, नाही माझ्या महाराष्ट्रात मोठे होण्यासाठी मरण्याची गरज नाही, तर जगून प्रामाणिक लढण्याची गरज आहे.
असो काळ कोणासाठी थांबत नाही. वीस वर्षाच्या वयापासून वयाच्या ७५ वर्षांपर्यंत संघर्षमय जीवन जगणाऱ्या, शेकडो अनाथांच्या माय होऊन त्यांचे भविष्य घडविणार्या माई म्हणजे परमेश्वराने महाराष्ट्राला प्रदान केलेला जणू परिसच होत्या. ज्या त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक लहान थोराचं, गरीब-श्रीमंत, अडाणी उच्चशिक्षितांचे सोनं करून गेल्या, सोन पेरून गेल्या.
अनाथांची माय असच कोणी कोणाला म्हणत नसतं. आणि महाराष्ट्राच्या माय म्हणून पूर्ण राज्य कोणाच्या जाण्याने शोक सागरात बुडत काही नसतं. सिंधुताई त्यांच्या निस्वार्थ कार्याने प्रत्येकाच्या हृदयात आपली जागा करून गेल्या. विचार करा रक्ताच्या नात्याची मुलेदेखील सख्या आईचा दुखवटा मोजक्या दिवसांचा पाळतात. पण अख्खा महाराष्ट्र दुःखसागरत बुडालेला होता. माईच्या जाण्यानं क्षणभर वाटून गेलं एवढ्या लवकर एक्झिट घ्यायला नको होती. पण म्हणतात ना जो सर्वांना आवडतो, तोच देवाला आवडतो आणि देव लवकर त्याच्याजवळ बोलावून घेतो.
सोशल मीडियावर आजही माईचे व्हिडिओ पाहिले की वाटते, माई आपल्यातच आहेत, दूर गेल्याच नाहीत. त्यांच्या तोंडून "बेटा" हा शब्द एवढा प्रेमळ वाटायचा की प्रत्येकाला ती आपलीच आई वाटायची. माईचा जीवन संघर्ष पाहून एवढं नक्की समजतं की, कधीच ठरवून मोठे होता येत नसतं, तर त्यासाठी खरोखरच परमेश्वराच्या प्रत्येक्ष अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघावं लागतं. तेव्हा कुठं २४ कॅरेट सोनं बाहेर पडत असतं.
माईच्या प्रत्येक भाषणाचा शेवट म्हणजे "भाषण नही तो, राशन नही" या वाक्याने काळीज चिरावं असं वाक्य. किती मोठी व्यथा त्यांच्या हसर्या चेहर्याने अचूक शब्दात समोर भाषण ऐकणाऱ्या उच्चभ्रू, उच्चशिक्षित लोकांना सांगत होत्या. माईंचा हसरा चेहरा नक्कीच त्यांचं दुःख, व्यथा लपवण्यात यशस्वी होत असेल. पण माईच वाक्य भावनाशून्य, स्वार्थी समाजाच्या कानशिलात नक्कीच चपराक मारल्याशिवाय राहत नाही. न मागता या जगात काहीच मिळत नाही. हे सांगताना माई म्हणत, "रडल्याशिवाय आई सुद्धा बाळाला भूक लागली म्हणून दूध पाजत नाही."
निस्वार्थ समाजसेविका, अनाथांची खऱ्या अर्थाने माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातील काही जिवंत प्रसंग ऐकताना अक्षरशः डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. सुरुवातीपासून म्हणजे पतीने घराबाहेर काढल्यापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत कितीही मोठ्या व्यासपीठावर असो किवा परदेशात उपस्थित माईंची नऊवारी साडी आणि डोक्यावरचा पदर कायम राहिला. पोटची मुलगी ममता हिला स्वतःपासून दूर करून हजारो अनाथांची आई झाल्या.
अगदी तारुण्यात सिंधुताईंनी जीवनाचा सर्वात मोठा संघर्ष स्वीकारला. आयुष्यभर लढत राहिल्या आणि मागत राहिल्या त्यांच्या कोणीच नसलेल्या अनाथांसाठी. अल्पशिक्षण घेऊन देखील मोठे व्यासपीठ आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर गाजवणाऱ्या माईंची महाराष्ट्राला खूप गरज होती. अलौकिक बुद्धिमत्ता, हजरजबाबी वक्तृत्व, प्रेमळ भाषा, मृदू आवाज, आणि जीवनातला कटू अनुभव माईंच्या भाषणाचे भांडवल होते.
स्वतःच्या जीवनात भोगावा लागलेला त्रास, अपमान, जगण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, आणि वांसनान्ध नजरेपासून वाचण्यासाठी आणि पोटाची आग विझवण्यासाठी घेतलेला स्मशानाचा आसरा, माईचं जीवन अधिक समृद्ध करत गेलं. संयम सहनशीलता, क्षमाशील माईच दर्शन तेव्हा खऱ्या अर्थाने घडतं, जेव्हा आपल्याला चारित्र्यहीन ठरून घराबाहेर काढणाऱ्या पतीला माई अनाथांमध्ये आसरा देतात. माई म्हणतात "उन्होंने मुझे अगर छोडा नही होता, तो चिंधी की सिंधू कभी नही बनती।"
महाराष्ट्र अभिमानाने इतिहास सांगेल सिंधुताई सपकाळ महाराष्ट्र कन्या होत्या म्हणून .माईचा जीवन संघर्ष सदैव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
"खरंच किती वर्ण त्यांची गाथा
चरणी अपोआप टेकतोय माथा,
शेकडोना घर दिलं तुम्ही न मागता
माई का गेल्या तुम्ही न सांगता."
जयश्री उत्तरेश्वर औताडे,
गंगाखेड, जि. परभणी