मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन Marathi Article

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य पर्वामध्ये सर्वात मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम...

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन Marathi Article

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून आपला भारत स्वातंत्र्य झाला. संपूर्ण देश स्वातंत्र्याचे गोड फळ अगदी आनंदाने चाखून मोठ्या जल्लोषाने मुक्ततेचा हर्ष साजरा करत होता. स्वातंत्र्य हिंदुस्थानची सुखद स्वप्ने पाहण्यात सारे देशबांधव एकाग्रतेने मग्न झाले होते. पण त्याच वेळी मात्र भारतातील ५६५ संस्थांनापैकी हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने मात्र स्वातंत्र्याची आतुरतेने वाट पाहत होते. पण नुसते वाट पाहूनही स्वातंत्र्य हाताला येणारे नव्हते म्हणून अनेकांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्धार केला आणि अखेर त्यांच्या बलिदानातून माझा सुंदर मराठवाडा बंधनाच्या आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडून खडकन् स्वातंत्र्य झाला. पण त्यासाठी मात्र स्वामी रामानंद तीर्थ, हुतात्मा गोविंदराव पानसरे, रवी नारायण रेड्डी, गोविंदभाई श्रॉफ, देवीसिंग चव्हाण, बाबासाहेब परांजपे, विश्वनाथ परदेशी  आणखी ज्ञात-अज्ञात प्रभावी नेतृत्वानी आणि आपल्या प्राणाचे बलिदान देवून मराठवाड्याची गुलामगिरीतून मुक्तता केली. त्या आधी विशेष सांगायचं झालं तर हैद्राबादचे संस्थान हे क्रूर निजामाच्या राजवटीत होते आणि सर्वात मोठे तर हेच हैद्राबादचे संस्थान होते. आणि मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानातील महत्त्वाचा भाग होता. कधी संपेल माझी गुलामगिरी?

कधी संपेल माझ्यावरील अन्याय?
कधी संपेल माझ्यावरचे पारतंत्र्य?

यासारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतीला आक्रांतांने विचारत होती, एकच भारत मातेची ही सारी लेकरं पण त्यांच्यामध्ये भेदभावाची मोठी भिंत क्रुरपणे उभारली गेली होती. ही जनता नियतीसोबत भारत मातेला सुद्धा कळकळून प्रश्न विचारत होती एकाच भूमीवरचे आम्ही लेकरे का न्याय सारखा नाही. आम्हा हा अन्याय अन्  गुलामगिरी हे पोरकट चटकेच का आम्हाला? हेच विचार मराठवाड्याच्या आतून धगधगत होते बेचैन करत होते हाच अन्याय आपल्या क्रांतीकारी मराठवाड्यातील देशभक्तांना शूरवीरांना झोप येऊ देत नव्हता, मग सर्वांच्याच एकीने एका विचाराने अन् एकदिलाने सुरू झाला तो मराठवाडा मुक्तिसंग्राम... स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थान एक झाले या संग्रामाचा वेग आणि प्रभाव इतका जबरदस्त होता की अवघ्या काही दिवसातच प्रत्येक गावागावात हा वनवा पेटला. असंख्य स्वातंत्र्यवीर या संग्रामात स्वतःहून सहभागी झाले.

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य पर्वामध्ये सर्वात मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम... पण मुक्तीसंग्राम सुरु झाल्याचं त्या क्रूर निजामाच्या लक्षात येताच त्याने त्याच्या मुख्य सेनापती कासिम रझवी यांना जनतेवर अनन्वित अत्याचार आणखी वाढवण्याचे सांगितले, त्यांनी लोकांना खूप त्रस्त केले, रझाकार नावाच्या दहशतवादी संघटनेचा दहशतवादाखाली माझा संपूर्ण मराठवाडा भरडत होता. ह्या संग्रामातील गोविंदराव पानसरे हे पहिले हुतात्मा होते. पण यांचे हुत्मामे  क्रांतिकारकांनी वाया जाऊ दिलेच नाही. त्यांनी एकसंघटित होऊन निजामाचे वेगळे राष्ट्र करण्याचे स्वप्न खोडून काढण्याचा निर्धार केला, १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरू झाले मुख्य फौजा सोलापूरकडे घुसल्या, आणि पहाटे चार वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर दोन तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर परभणी ते मनिगड कनेरगाव विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगाव कडून आलेल्या तुकडीने कन्नड दौलताबाद तर बुलढाणाकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले, दुसरीकडे वरंगल बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर या दिवशी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या तेव्हा निजामी सैन्य हे माघार घ्यायला लागले होते. कुठेतरी मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ लागला होता. भारत देशाच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले.

मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला महाराष्ट्र राज्याच्या एक भाग म्हणून मराठवाड्याला महत्त्व प्राप्त झाले. अखेर मराठवाड्यातील जनतेने भारत देशाचा भाग बनवण्याचे स्वप्न सत्यात उतरवलं. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला. हैद्राबाद मुक्तीसंग्राम यशस्वी झाला. शेवटी हैद्राबाद संस्थानात तिरंगा मानाने फडकला. किती मोठा संग्राम, किती महान ते क्रांतिकारी, किती महान मोठा त्यांचा संघर्ष, किती मोठे त्यांचे बलिदान, किती मोठा ठरला त्यांचा इतिहास आणि हे सारे त्यांनी कशासाठी केले ते फक्त महान भारताच्या अखंडत्त्वासाठी.

शेवटी कोणीतरी म्हटलं आहे... निजाम रझाकार आणि निसर्गाची ही आमची लढाई. क्रांतिकारी इतिहास अन् पराक्रमी आमुचा बाणा... संग्राम विरांचा मराठवाड्याचा आम्हा सदैव अभिमान. राष्ट्रभक्ती उन्नतीसाठी नेहमीच आमचा ताठ कणा.

सरिता उद्धव भांड - खराद, पैठण