विश्वशांतीचे दूत : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून कीर्तनातून जातीभेद पाडू नका, अस्पृश्यता गाळून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत असायचे.

विश्वशांतीचे दूत : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

"या भारतात बंधुभाव नित्य वसु दे, दे वरचि असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे." असे म्हणणारे एकमेव महान  राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे, वंदनीय, परमपूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना कोटी कोटी वंदन. आज ३० एप्रिल म्हणजे राष्ट्रसंतांची तुकडोजी महाराजांची जयंती. राष्ट्रसंतांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी करतात. पण राष्ट्रसंतांचे विचार मात्र सर्वत्र आचरणात का? आणत नाही. हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. एकीकडे राष्ट्रसंतांची जयंती साजरी करायची, आणि दुसरीकडे अंधश्रद्धा, जातीभेद, मतभेद निर्माण करायचे, हि शिकवण राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांनी कधीच दिली नाही

आपल्या भारत देशातील महाराष्ट्र हा थोर महात्म्यांचा, संतांचा राष्ट्र म्हणून जगात ओळख आहे. या भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा असे अनेक महान संत या भूमी जन्माला आले. म्हणून आपली संतांची भूमी म्हणून अजरामर आहे. या भूमीला थोर मोठ्या संतांचे चरण स्पर्श झालेले आहेत. साधू संतांची भूमी म्हणून ओळख आहे. असेच एक संत महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती जिल्ह्यात यावली गावात ३० एप्रिल १९०९ मध्ये या अवलियाने वडील बंडोजी इंगळे आणि माता मंजुळादेवी या दांपत्याच्या पोटी चंद्रमौळ झोपडीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जन्म घेतला. त्यांचे खरे नाव माणिकदेव बंडोजी इंगळे होते. त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी त्यांना तुकड्या हे नाव दिले. आणि पुढे हेच नाव आचरणात आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. तुकडोजी महाराजांनी तिसरीतून शाळा सोडून दिली. आणि ध्यान,भजन, पूजन यात रंगून गेले. ते नेहमीच तुकाराम महाराजांचे भजन म्हणायचे.

एकदा ते आपल्या आजोळी गेले असता, त्यांचे गुरु आडकोजी महाराज त्यांना म्हणाले, आपल्या अभंगातून "तुकड्या असे" म्हणत जा असे संबोधले. तेव्हापासून गुरुच्या आज्ञेनुसार "तुकड्या म्हणे" या नामपदाने संपणारे अभंग रचू लागले. आणि लोक त्यांना तुकडोजी महाराज म्हणून ओळखू लागले. पुढे महाराजांनी अनेक  अभंग भजन लिहिलीत. त्यांचे हिंदी, मराठी भाषेत काव्यरचना तयार झाल्यात. याशिवाय ४१ अध्यायाचे ४६७५ ओव्यांचे "ग्रामगीता" हे काव्य त्यांनी रचले. तसेच ईश्वर भक्ती, सद्गुनांचा उपदेश, सामाजिक जागृती इत्यादी विषयावर ते कीर्तन करीत गावोगावी फिरायचे. आपल्या कीर्तनातून खंजरीच्या साथीने समाजात जनजागृती करीत असायचे. आपले कीर्तन आणि खंजिरी यांचा उपयोग त्यांनी फक्त समाजसेवेसाठीच केला.

समाजात परंपरेने आलेल्या  अनिष्ट रूढी, जातीधर्म ,पंथ भेद, अंधश्रद्धा या गोष्टीवर राष्ट्रसंतांनी आपल्या अमोघ वाणीने घणघणीत हल्ला केले. तसेच आपल्या कीर्तनातून व्यायामाचा सुद्धा प्रचार केले. त्यांनी भारतातच नव्हे तर जपान सारख्या बलाढ्य देशात जाऊन विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलना  दरम्यान ब्रिटिश सरकारने त्यांना काही काळ अटक केली. आपला भारत  खेड्याचा  देश आहे. असे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की, राष्ट्राचा विकास होणार अशी श्रद्धा आणि विचारसरणी त्यांच्या मनात होती. खेड्यातील परिस्थितीची त्यांना  परिपूर्ण कल्पना होती. खेडे स्वयंपूर्ण कसे होईल याविषयी ते उपाययोजना करायचे. खेडे हे सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात असे त्यांना वाटायचे.      

आपल्या अनुयायांना आत्मसाक्षात्काराचा मार्ग अवलंबनाचा सल्ला दिले. त्यांनी पुरोहिशाहीला ठामपणे विरोध केले. तुकडोजी महाराजांनी  सामूहिक प्रार्थनेवर जास्त भर दिले. त्यामध्ये लोक कोणत्याही धर्माचे असोत, ते सहभागी  व्हायचे. त्यांची प्रार्थना प्रणाली खरोखरच जगात अद्वितीय व अतुलनीय ठरली. काळाच्या ओघात त्यांनी  जनतेच्या मनात ठसा उमटविला. देव हे केवळ मंदिर, चर्च किंवा मश्चित मध्ये नाही, तर ते सर्वत्र चराचरात आहे असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून कीर्तनातून जातीभेद पाडू नका, अस्पृश्यता गाळून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत असायचे. प्रत्येक भजन कीर्तनाच्या प्रारंभी थोडे गुरुचे स्मरण करून अंधश्रद्धा, वाईटरूळी, व्यसन यांचा त्याग करा अशा आशयाचे भाषण करायचे. आणि हातातील खंजिरीच्या वेगवान ठोक्यावर त्यांनी आपल्या पहाडी आवाजातील सुंदर चालीवर मराठी, हिंदी पदाचे भजनाची, कीर्तनाची सुरुवात करायचे. आणि सर्व धर्मातील श्रोते तल्लीन होऊन जायचे. सर्वधर्माचे, पंताचे लोक राष्ट्रसंतांचे अनुयायी बनले होते.

महिला उन्नती विषयी महाराजांच्या  विचार विश्वासाचा एक लक्षणीय पैलू  होता. स्त्रीवर कुटुंबव्यवस्था समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था कशी अवलंबून असते. हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले, त्यामुळे स्त्रीला अज्ञानात,  दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे. हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे समाजाला पटवून दिले. तसेच देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. हे समाजाचे राष्ट्राचे कसे संरक्षण करू शकतील, हे तरुण नीतीमान सुसंस्कृत कसे होतील, या विषयाचे उपदेशपर व  मार्गदर्शनपर लिखाण राष्ट्रसंताने केलेले आहेत. आपल्या लेखणीतून त्यांनी व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांचे हिंदी भाषेतही विपुल लेखन झालेले आहे. आजही त्यांचे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. यावरून आपणास लक्षात येते की, राष्ट्रसंतांचे साहित्य अक्षर वाङ्मयाचे मूल्ये  कशी दडली आहेत याची सहज कल्पना येते. एकदा राष्ट्रपती भवनात खंजिरी भजन झाले. ते भजन ऐकून  भारताचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले. आणि महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. तुकडोजी महाराजांनी अमरावतीजवळ मोझरी येते गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. आपल्या आयुष्यातील लक्षनीय कार्य राष्ट्रसंतांनी केले. असे हे महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन कृष्ण पंचमी शके १८९०(३१ऑक्टोबर १९६८) रोजी झाले. अशा या महान राष्ट्रसंतांची कीर्ती जगविख्यात आहे. आणि पुढे राहणार यात काही शंका नाही.

Jyotsana Bansod

सौ.ज्योत्स्ना भास्कर बन्सोड, 
कुरखेडा, जि.गडचिरोली.