कलियुगातील आधुनिक राम

परमेश्वराने एक दार बंद केलं तर तो दुसरं दार आपल्यासाठी उघडतो. सागरच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जीने त्याला खूप समजून घेतलं. त्याला खूप जीव लावला.

कलियुगातील आधुनिक राम

ईश्वरावर प्रेम करणं, ईश्वर भक्ती करणं हे आपणं पाहिलं असेलच. पण परमेश्वराच्या दगडाच्या मूर्तीवर पण कोणीतरी प्रेम करत असावं. अहो! जिवंत माणसावर कोणीही प्रेम करेल पण दगडाच्या मूर्तीवर प्रेम करणारा असा हा सागर. लहानपणापासून त्याला देवाचे एक वेड लागले, ते म्हणजे नित्यनेमाने मंदिरात जाणे आणि त्या निर्गुण निराकार भगवंताचे रुप डोळे भरून पाहणे. सागरचा असा रोजचा नित्यनेम ठरलेला असायचा. रोज मंदिरात जायचं आणि त्या परमेश्वराची गप्पा मारायच्या मग त्या गप्पा काय बरं असायच्या. देव बाप्पा आज दिवसभर असं झालं आज दिवसभर तसचं झालं, अरे तो माझा मित्र खुप दुःखी आहे. त्याला सुखी ठेव. हे बघ तुझ्याशिवाय सगळं काही अपूर्ण आहे. मला ना तुला भेटू वाटतं, तुझ्याशी खूप खूप बोलू वाटतं.  तुझ्याशिवाय मी शून्य आहे. ज्या वयात आपल्याला काहीच कळत नसतं अशा वयात परमेश्वराशी एकनिष्ठ होणं म्हणजे कठीणच न्हवे का? अंतःकरणापासून परमेश्वरावर श्रद्धा ठेवून नित्यनेम करणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगात सांगतात, 

नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ
लक्ष्मी वल्लभ तयाजवळी

जो मनुष्य असा नित्यनेमाने मंदिरात जाऊन दर्शन घेतो, त्याचे भाग्य आणि पुण्य असेल याची फक्त आपण कल्पना केलेलीच बरी नाही का?  लक्ष्मी आणि वल्लभ म्हणजे लक्ष्मी आणि नारायण या दोघांचाही त्याच्याजवळ वास असतो. अर्थातच जीव आणि शिव यांचे मिलन झाले की मोक्ष प्राप्त होतो. 

नित्यनेम करणारा माणूस अगदी दुर्लभ आहे. असा नित्यनेम करणाऱ्या माणसासोबत कायम देव पाठीशी उभा राहतो. त्याचा कितीही मोठा अपघात होऊ दे. तो सुखरूप असतो. कुठलाही आजार त्याला जास्त त्रास देत नाही. म्हणुन तुकाराम महाराज म्हणतात, 

मागे पुढे उभा राहे सांभाळीत
आलिया आघात निवाराया

साक्षात भगवंत आपल्यासोबत असताना भिती ती कशाची? दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष सरत गेली. योग्य वेळ आल्यानंतर सागरचे लग्न झाले. छान असा सुंदर संसार सुरू झाला. संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलले. परंतु सागर मात्र कायम दुखी आणि चिंतेत असायचा त्याच्या आयुष्यात सतत काहीतरी असं घडायचं की त्याचा खूप त्रास त्याला व्हायचा. 

कालांतराने त्याने ठरवलं की आपण संसारापासून अलिप्त राहायचं आणि परमेश्वराशी एकनिष्ठ राहायचं. कालांतराने सागरची संसारातील गोडी आपोआपच कमी होत गेली आणि परमेश्वराशी असलेलं त्याचं नातं आणखी घट्ट होत गेलं. सागराच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपायचे नावच घेत नव्हते आणि कायम दुःख पाठलाग करत होते. सागरच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले की त्यातून सावरणं देखील मुश्कील होतं, परंतु परमेश्वराची साथ असतांना आणि त्याचा वरदहस्त असतांना कुणीच त्याचं काही बिघडवू शकले नाहीत. आलेल्या प्रत्येक संकटांना हसत तोंड देणे हे सागरला खूप छान जमायचं. गावामधील सर्व लोक सागरला खूप महत्व देत होते. सागरला भजन किर्तनाची खूप आवड होती. सागर कीर्तनात बसला की, त्याचं सगळं दुःख तो आपोआपच विसरायचा. गावात भजनाचा कार्यक्रम असला की सागर पहिली हजेरी लावायचा. गावातल्या माणसांना आपल्याला जमेल तशी मदत करणे, लोकांच्या अडी अडचणी सोडविणे, तसेच समाजकार्य करणे या सर्व गोष्टींमुळे सागरचे गावामध्ये एक वेगळच स्थान निर्माण झाले होते. शेतामध्ये काबाडकष्ट करायचे आणि आलेल्या तेवढ्याच पैशात स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. कधीच कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, कधीच कोणाचं वाईट चिंतायचं नाही. सर्वांना मदत आणि फक्त मदतच करायची. रात्री बारा वाजता जरी कुणी सागरला मदत मागितली तरी तो तत्पर असायचा, आपल्या हातून होईल तेवढं सत्कार्य करायचं. सगळ्यांचं भलं व्हावं सगळ्यांनी सुखात राहायला हवं. अस सागरला मनापासून वाटायचं. अशाप्रकारे सागरचा दिनक्रम चालू होता. सागरला कलियुगातील आधुनिक राम म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.

एके दिवशी अचानकपणे त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडून आली की सागरचा देवावरचा विश्वास उडायला लागला. एवढं सगळं करून सुद्धा जर हाती अपयश आणि दुःख येत असेल तर काय उपयोग, असं सागरला मनोमन वाटायचं. परंतु म्हणतात ना, परमेश्वराने एक दार बंद केलं तर तो दुसरं दार आपल्यासाठी उघडतो. सागरच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जीने त्याला खूप समजून घेतलं. त्याला खूप जीव लावला. त्याची खूप काळजी घेतली. सागरच्या आयुष्यात त्या व्यक्तीच्या येण्याने खूप मोठा बदल झाला. जणू काही सागरच आयुष्यच बदलून गेलं. 

निराश आणि हताश झालेल्या सागरच्या मनात आशेची नवीन पालवी फुटली. सगळं काही नीट होईल अशी त्याला आशा वाटू लागली. आता दिवस बदलले होते. सागर मंदिरात गेला की देवाच्या रूपात त्याला ती व्यक्ती दिसायची. त्याने त्याचे डोळे बंद केले तरी देखील तिच व्यक्ती दिसायची. सागरला हळुहळू त्या व्यक्तीच्या नात्याची ओढ लागत होती. सागर पुन्हा एकदा परमेश्वराच्या अधिक जवळ गेला. त्याचा नित्यनेम चालूच ठेवला, आजदेखील सागर रोज मंदिरात जातो, देवाचे अखंड चिंतन करतो, त्याच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारतो. त्या दगडाच्या मुर्तीने सागरला काय दिले असेल हा मला प्रश्न पडतो. मात्र असा हा नित्यनेम करण्यातच त्याला परमानंद मिळतो, हे मात्र तितकेच खरे. 

प्रिती सुरज भालेराव
धनकवडी, पुणे