राष्ट्रीय युवा दिवस

स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील सर्व युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या उन्नती मध्ये सहभागी व्हावे...

राष्ट्रीय युवा दिवस

12 जानेवारी 1963 ला स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकत्ता या शहरात झाला होता. स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील सर्व युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या उन्नती मध्ये सहभागी व्हावे यासाठी 12 जानेवारी 1985 पासून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला तेव्हापासून  प्रत्येक 12 जानेवारीला हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
 
तरुण पिढी म्हटली की,प्रत्येक देशाची सर्वात मोठी संपत्ती असे आपण नेहमी म्हणतो. जर खरोखरच तरुण पिढी ही आपली संपत्ती आहे, तर मग एक प्रश्न नकळतपणे डोळ्यासमोर उभा राहतो की,  तारुण्य ही सर्वात मोठी संपत्ती प्रत्येक तरुणाकडे असताना आज आपल्या देशातील हजारो युवक इतके हताश आणि  निराश का...?
 
प्रत्येक तरुण  स्वतःच्या भविष्याबद्दल इतका उदासीन का...?

हजारो तरुणांचे पाय व्यसनाच्या मार्गावर का...?

रोज कोठून आणि कुठून तरी तरुणांनी आत्महत्या केलेल्या बातम्या का...?

छोट्या छोट्या कारणावरून एकमेकाच्या जीवावर उदार झालेले तरुण का...?

एखाद्या व्यक्तीला पाठिंबा देणे वाईट गोष्ट नाही मात्र एखाद्या व्यक्तीच्या नावाने आपल्या नावाला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्या व्यक्तीचा प्रचार करत फिरणाऱ्या तरुणांची संख्या इतकी जास्त प्रमाणात का...? 

सर्वधर्मसमभाव हे वाक्य लहानपणापासून जरी कानावर पडत असली तरी झेंड्याच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करणारा तरुण वर्ग इतक्या जास्त प्रमाणात आजही प्रत्येक गावात का...?
आणि ह्या सर्वांमध्ये जर  सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला तर शंभर पैकी एक दोन तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन काही वेगळे करायचे ठरवले तरी त्यांना देखील भ्रष्टाचाराला बळी पडावेच लागते. या सर्वात मग परत एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे याला जबाबदार कोण...?

या प्रश्नाचे उत्तर देताना एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी नक्की सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे. आपण आपल्या डोळ्यासमोर एखाद्या गरीब व्यक्तीला श्रीमंत होत असतांना पाहत असतो तर दुसरीकडे एखाद्या श्रीमंत व्यक्तीला गरीब होताना देखील आपण पाहिलेले असते. त्यांच्याबद्दल थोडासा विचार केला तर एक गोष्ट डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे जे श्रीमंत होतात ते आपल्या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करत असतात आणि जे गरीब होतात त्यांना आपल्या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करता येत नाही. अगदी ह्या उदाहरणाप्रमाणे प्रत्येक देशाची परिस्थिती झाली आहे जो देश आपल्या देशातील युवाशक्तीचा योग्य वापर करत आहे तोच देश आज आपली वेगळी ओळख निर्माण करु शकत आहे.
 
समाजातील प्रत्येक घटकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की,, वाईट मार्गाकडे भटकलेल्या जाणाऱ्या युवकांना दोष देत बसण्यापेक्षा देशातील युवा शक्तीचा वापर योग्य दिशेने कसा करता येईल. संपत्ती जरी किती मोठी असली तरी त्याचा वापर करणारा योग्य नसेल तर ती स्वतः काही करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशातील युवाशक्ती देखील असून नसल्यासारखी झाली आहे . युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी  काय करणे आवश्यक आहे याचा विचार करणे आजची खरी गरज आहे. युवा असणे म्हणजे एखाद्या ठराविक वयापर्यंत कधीच मर्यादित नसते. युवा असण्यासाठी आपली विचारशक्ती युवा असावी लागते. तरुण युवकांना त्यांचे कर्तव्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते स्वतः स्वतःला युवक जरी इतरांकडून म्हणून घेत असेल.

मात्र आपण खरेच युवक आहोत का...? 

यासाठी एखाद्या अन्यायाविषयी आपले रक्त सळसळते का...? 

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण काही करत आहोत का...? 

आपल्याकडून समाजाला फायदा होईल असे कार्य आपल्या हातून घडत आहे का...? 

आपण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहोत का...? 

असे प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारून स्वतःची ओळख स्वतः बनवून समाजाला तसेच आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवून आपल्या मधील युवा शक्तीचा योग्य वापर केल्यास संपूर्ण राष्ट्रास राष्ट्रीय युवा दिवस साजरा केल्याचे खरे श्रेय लाभेल.

Poonam Channe

पुनम सुलाने,जालना