आपली नजर रावण पाहते, राम मात्र नजरेआडच राहतो...

आपल्या डोळ्यासमोर सर्रास घडणारे उदाहरण म्हणजे पहा नवीन लग्न झालेल्या घरात नव्याचे नऊ दिवस पार पडतात सासुबाई व सूनबाईचे खटके उडायला लागतात क्षुल्लक कारणावरून राईचा पर्वत हातखंडाच राहिलेला आहे.

आपली नजर रावण पाहते, राम मात्र नजरेआडच राहतो...

तिच्या यातनांचे
जाणकार बहु झाले 
त्याचे अंतकरण मात्र 
अश्रुंनीच चिंब न्हाले ...

मैत्रिणींनो, स्त्री यातनांचे वर्णन कथा, कादंबऱ्या, लघुलेख, रचना, चित्रपट या आणि अशा अनेक माध्यमातून हुबेहूब प्रकटीकरण चालू आहे. स्त्री सहनच करत आहे, हेच सत्य आहे. पण आपण भावनेच्या भरात जास्तच वाहून तर जात    नाही ना? 

कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत, पुरुष या नाण्याची एकच बाजू प्रकाशात  येत नाही ना? या गोष्टीचे सुक्ष्म निरीक्षण चिंतन, मनन, पठणाची खरी गरज आज निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यात काही गुण असतात, तसेच दोषही असतात. सर्रास स्त्री प्रश्नांचा यातनांचा पाऊस प्रत्येक लेखणीतून अनादी कालापासून बरसत आहे. अगदी इतिहास काळापासून स्त्रियांना बंधनाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा सहभाग पुढाकार जास्त राहिलेला आपणाला आढळतो. हो अपवादात्मक पुरुष देत असतीलही त्रास म्हणून आपण डोळे झाकून गव्हाबरोबर किडे रगडणे कितपत योग्य आहे? काही स्त्रिया खातात तोंड दाबून बुक्क्याचा मार मात्र यातील बहुतांश पिंजरा तोडून विरोध पत्करून स्वच्छंद विहरताना देखील आपण पाहिलेले आहेच की इथेही तिला साथ देणारे भाऊ, वडील, पुरुषच आहेत ना? प्रत्येक ठिकाणी पुरुष कळत नकळत पडद्या मागील भूमिका रंगवत असतात, स्त्रीच्या जीवनाला आकार देत असतात, हे मान्य करणे कर्मप्राप्तच आहे. यशस्वी पुरुषामागे आई, पत्नी, मैत्रीण, बहीण या रूपात स्त्री खंबीरपणे उभी असते हे आपण ऐकतो वाचतो म्हणतो लिहितो पण यशस्वीपणे यशशिखरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या स्त्रीमागे ही तीचे बाबा, भाऊ, पती, मित्र, गुरुजी या पुरुषांचे पाठबळ आहे. याचा उल्लेख कधी कुठे कोणी केलेला दिसत नाही वा तशी त्याची गरज आजपर्यंत कुण्या समंजस लेखकाला भासली नाही.

 स्त्री प्रश्नांचा बोलबाला अफाट आहे
 हृदयी पुरुषाच्याही यातनांचा घाट आहे...

आपल्या डोळ्यासमोर सर्रास घडणारे उदाहरण म्हणजे पहा नवीन लग्न झालेल्या घरात नव्याचे नऊ दिवस पार पडतात सासुबाई व सूनबाईचे खटके उडायला लागतात क्षुल्लक कारणावरून राईचा पर्वत हातखंडाच राहिलेला आहे. पुरुष कामावरून येताच घरात ३६ चा आकडा असतो. या परिस्थितीत भरडून मात्र पुरुष निघतात त्यांच्यापुढे आई किंवा पत्नी निवडण्याचा निर्णय दिला जातो, जो जगातील कोणत्याच बहादूर वकिलाला याचा निकाल लावणे शक्य नाही. कारण त्यांना आपल्या उदरातून जन्म देणारी पंचवीस वर्षे सांभाळणारी आई ही हवीच असते व जन्मभर साथ देणारी जीवनसंगीनी ही प्राणप्रिय असते. ही गोष्ट हा निर्णय त्यांनी कसा घ्यावा, माझ्या मायमाऊल्यांनो आपल्यामुळेच पुरुषांना मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावाचं लागतो, हेच आपल्या लक्षात येत नाही, ही मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे. यानंतरही त्यांच्या गळ्याचा फास सुटत नाही वेगळे राहिल्यास देखील आई म्हणते मुलगाच चांगला निघाला नाही. पत्नीचं आपलं चालूच असतं तुमच्यामुळेच माझं वाटोळं झालं अरेरे रात्रंदिवस घरासाठी रक्ताचं पाणी करून झटणारे राबणारे पुरुष पण काय त्यांची ही अवस्था पुरुषांचे महत्त्वाचे स्थान ज्या घरात कर्ता पुरुष नाही, त्यांनाच विचारावे? ज्या डोक्यावर बापाचे छत्र नाही, त्यांच्याकडून जाणून घ्यावे पुरुष हा घराचा आधार भरभक्कम पाया आहे छत्र होता, आहे, राहील आणि राहणारच...  

सासु सुनांनी विचारांचं अतिक्रमण रोखून संयुक्त कुटुंबपद्धती जपली तर पुरुषांची अडकित्त्यात सुपारी होणे टळेल त्यांना थकून आल्यावर हसतमुखाने पाणी देणारी पत्नी व मायने पाठीवरून हात फिरवणारी आई सुद्धा हवी असते, ज्या पुरुषाला या दोघी एकाच हाताखाली लाभतील तो पुरुष भाग्यवानच म्हणता येईल निदान या कलियुगात तरी आणि हे सर्व स्त्रीशक्तीच्या हातात आहे. विचारांची गंगा योग्य दिशेने वाहिल्यास संयुक्त घरगृहस्थी फुलवता येणे अशक्य नाही. चला हो मान्य आहे व्यसनाधीन पुरुष घरात लक्ष देत नाहीत अनपेक्षित प्रकारात गढलेले असतात हा नवरा पुरुष छळत असेल तरी साथ देणारा भाऊ, बाबा, हेही पुरुषच आहेत हे का विसरतो आपण ही पुरुषांची दुसरी बाजू कधी आपली नजर पाहू शकली का? जसे रावण आहेत तसेच रामही आहेत.
पत्नीला नमस्कार केल्याशिवाय घराबाहेर न पडणारे पुरुष आजही आहेत ही अतिशयोक्ती नाही किंवा ग्रंथात वाचलेली गोष्ट नाही. सत्य परिस्थिती आहे. ज्यांना पुरूषाचे अश्रू समजले, त्यांना सर्व काही समजले असे म्हणतात. कारण हजारो स्त्रीयांचे जेवढे दुःख असते, तेवढे दुःख पुरूषाच्या एका अश्रूत असते, कितीही मोठे संकट आले तरी पुरूष रडत नाही. पुरूष रडतो तेव्हाच जेव्हा त्याच्या भावना समजून घेतल्या जात नाही. रात्रीच्या अंधारात सर्व झोपलेले असताना रडतो तो पुरूषच असतो. अशा पुरूषांना खरच समजून घेतले पाहिजे. 

पत्नी एक क्षणाची, अनंत काळाची माता... या अभंगपक्तीला सत्यात अंतकरणात उतरवणारे पुरुष सुद्धा या पवित्र भारत भूवर आहेत ही अभिमानाची गोष्ट पण पत्नीच्या पाया पडून बाहेर पडणाऱ्या पुरुषांना देखील नाव ठेवणाऱ्या स्त्रियाच आहेत. याला आपण काय म्हणावे हे स्त्रियांनीच ठरवावे. आपली नजर रावण पाहते, राम मात्र नजरेआडच राहतो. पुरुषांच्या दुर्गुणांचाच पगडा आपल्या विचारांवर, मनावर बसला आहे. जेव्हा पुरुष व्यसनाधीन होतात पण त्यात याचे मूळ कारण घरातच दडलेले असते. घरात शांतता नसेल तर पुरुष जास्तीचा वेळ घरी न घालवता बाहेर घालवू लागतात. घरची कटकट ऐकण्यापेक्षा नसत्या उद्योगात ते बाहेर रमून जातात. आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतात.

बघा विचार करूया... नारीशक्तीला एक कळकळीची विनंती आहे. आपल्याच दुःखाला जाचाला कुरवाळत न बसता आपल्याच दुःखाच्या कहाण्या ऐकून, लिहून, वाचून त्यातच डुंबून न जाता उघड्या डोळ्यांनी जीवन जगू या...! इतरांच्याही मनात खोलवर प्रवेश करून त्यांच्या अंतरंगातील दुःख जाणून घेऊन, सुखाचे आनंदाचे मोती रुजवूया... आणखी किती दिवस आपल्या बंदिवासाच्या जाचाच्या पोथ्या आपण कुरवाळत बसणार आहोत. जोपर्यंत लिहिलेलं आपल्या वर्तनात उतरणार नाही तोपर्यंत ते कागदावरच राहील. आपण समोरच्याला जे देऊ तेच परत मिळते. 
जे पेरतो तेच उगवते, 


चला तर मग माणूस पेरू या... 
संकल्प करूया... वैचारिक परिवर्तनाचा...
सुधारू या गाभारा अंतर्मनाचा...

Durga Deshmane

सौ. दुर्गा देशमाने राऊत,
(सहप्रमुख - न्याय देणारा परिवार)
माजलगाव, जि. बीड