एखाद्याचे डोळे वाचणं ही साधी गोष्ट नाही

एखाद्या व्यक्तीचे डोळे वाचणं ही साधी गोष्ट नाही बरं का! त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या मनाचा खोलवर जाऊन विचार करतो

एखाद्याचे डोळे वाचणं ही साधी गोष्ट नाही

आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात. काही लोकांशी आपलं नातं हे काही काळापुरतच मर्यादित राहतं, काही जणांशी ते नातं निरंतर काळासाठी टिकून राहतं तर याऊलट काहीजण फक्त आपल्या आयुष्याच्या वाटेवरील वाटसरु होऊन आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जातात. 

आपण आपल्या भावना, विचार, दु:ख, आनंद, आदर, राग व प्रेम शब्दातून व्यक्त करत असतो. प्रसंगी आपण लिहितो, बोलतो, हावभाव करतो आणि आपले विचार व्यक्त करतो, समोरच्यापर्यंत पोहोचवतो. पण काही भावना अशा असतात की, ज्या शब्दात व्यक्त होत नाहीत. याकरिता परमेश्वराने एक प्रभावी माध्यम दिले आहे आणि ते म्हणजे डोळे. डोळे, हे न बोलता बरेच काही सांगून जातात, याच डोळ्यात निर्माण होणारा ओलावा तर जाणिवेचे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. 

आपल्या शरीरातील डोळे हा एक असा अवयव आहे की ते खूप काही सांगू शकतात, समोरच्या व्यक्तीशी बोलू शकतात. आपल्या डोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निरागस भाव असतात ते फक्त ओळखता आले पाहिजे. मग हे प्रत्येकाला जमेल असे नाही बरं का! प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळीच भावना असते आणि ती प्रत्येकाला वाचता येईल असं मुळीच नसतं.

डोळे सर्वांचे सारखेच असतात, परंतु त्यातील भाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कुणाचे डोळे सौंदर्य पाहतात, एखादी व्यक्ती जर मनातून खूप दुःखी असेल तर तिचे डोळे दुःख  सांगून जातात, याउलट एखादी व्यक्ती मनातून खूप सुखी असेल तर तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक असते, एक वेगळाच आनंद असतो. हे सर्व डोळे सांगत असतात.

एखाद्या व्यक्तीचे डोळे वाचणं ही साधी गोष्ट नाही बरं का! त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या मनाचा खोलवर जाऊन विचार करतो, आणि त्या व्यक्तीशी आपण जेव्हा एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील भावना वाचता येतात. त्या भावना तितक्या शंभर टक्के खऱ्यादेखील असतात. मग आपण आपली एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीपासून लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो निष्फळ ठरतो. त्या व्यक्तीला आपल्या मनातील भाव आपल्या डोळ्यांमार्फत सहज कळून जातो.

या सगळ्या सृष्टीचा तो कर्ता धर्ता माझा सावळा पांडुरंग, त्याची मूर्ती पाहिल्यावर देह हरपून जातो, ते गोजिरे रूप आणि परमेश्वरी भाव डोळ्याच्या कोंदणात मावत नाहीत, उरतात ते फक्त अश्रू; त्यावेळी आपले भाव अगदीच सात्विक असतात, ते फक्त त्या विठ्ठलालाच समजतात. असे मला वाटते.

सौ. प्रिती भालेराव, पुणे