वास्तवातील चेहरे

वास्तविक बघितलं तर माणसाच्या गर्दीत माणुसकी हरवत चालली आहे. पाऊस खूप पडला झरे भरले आहेत भरून वाहत देखील आहेत पण माणुसकीचा झरा आटतांना दिसतोय

वास्तवातील चेहरे

म्हणतात ना! "दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर जग फसतं" हल्ली अलीकडच्या काळात माणसाचे दोन चेहरे असतात. २१ व्या शतकातील परंपरा म्हणता येईल ही, तशी जुनी माणसं नव्हती हो! पूर्वी वचनाला जागणारी माणसं होती. एकदा शब्द दिला की दिला; तो पूर्णपणे पाळायचा. पण आताच्या काळात डिजिटल होतय सगळं, हल्ली नाते सुद्धा डिजिटल स्वरूपात दिसतात. कारण जग कॉम्प्युटर युगात प्रवेश करतंय, पूर्वीचे नाते कसे प्रेमाने घट्ट विणलेले असायचे पण आताच्या काळात हे दिसतच नाही. गरज संपली नातं संपलं. पण काही खरी माणसं सुद्धा आहे. ह्या जगात त्यांना नेहमी त्रासच होतोय, म्हणतात ना! जो इतरांचं चांगलं करतो, त्याचं नेहमी चांगलच होत असतं. हल्ली असे पाहायला मिळते की, खरच जो चांगलं वागतो ना, नेहमीच दुःख त्याच्याच वाटेला जास्त येते. दूरच्या माणसाचं ऐकून लोकं जवळच्यांना विसरून जातात. अगदी सख्खे भाऊ बांधावरून भांडतांना थेट कोर्ट गाठत असतात. नातं म्हणजे काही राहिलं नाही. अलिकडच्या काळात भावना बोथट होत जाताय मुळात त्या नष्ट होऊ नये म्हणजे मिळवलं! त्यात  कोरोनासारखी महामारी आली गरीब असो किंवा श्रीमंत एकाच पंगतीत बसवून गेली. मुळात बरं झालं म्हणावं लागेल कारण लोकांना खुप घमेंड होता पैशाचा व जातीचा पण तिथं वशिला चाललाच नाही. पण कोरोना फक्त कारण आहे एकमेकांपासून दूर राहण्याचं त्याचे म्हणणे आहे. सावधान रहा कुणीही आपलं नसतं, संवादाची साधनं हाताशी आलेत पण संवादच लोप पावताना दिसतोय, शरीराने दूर आहोतच पण मनानेही माणसं दूर जात आहेत.

वास्तविक बघितलं तर माणसाच्या गर्दीत माणुसकी हरवत चालली आहे. पाऊस खूप पडला झरे भरले आहेत भरून वाहत देखील आहेत पण माणुसकीचा झरा आटतांना दिसतोय; चांगुलपणाचं सोंग घेऊन लोकं मिरवतात पण त्यांचा वास्तविकतेमधील चेहरा वेळ दाखवून देते, तशी काही माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात चांगलं ज्वलंत उदाहरण म्हणजे मुलीचं लग्न जमवताना तिला परंपरेनूसार   बघायला येतात. तेव्हा वेगळेच चेहरे घेऊन येतात. खूप चांगलं असल्याचं नाटक करतात. पण लग्न झाल्यानंतर तिला हुंडा किंवा घरातील वस्तूंची मागणी केली जाते तिचा छळ केला जातो तेव्हा वास्तविकतेच्या चेहऱ्याचं खरं दर्शन घडतं. 

एकेकाळी सुखदुःखात धाय मोकळून रडणारे माणसं आज मृत्यू झाला तर फक्त Whatsapp ला स्टेटस अपलोड करतात. भावनांचा बाजार झालाय नुसता; आताची पिढी बघितली तर प्रेमाच्या नावाखाली वासनेच्या आहारी गेलीय, अन् त्याच वासनेला आकर्षणाला प्रेम समजून बसतात. काही खरं प्रेमही करतात. पण समोरची व्यक्ती कधी चुना लावून जाईल सांगता येत नाही. कारण त्या व्यक्तीकडे गर्दी असते लोकांची त्यामुळे तिला काहीच फरक पडत नाही सोडून गेल्याचे, ती खुश असते दुसरं कुणाबरोबर तरी. पण तिच्या विरहात दुसरी व्यक्ती पार जीवाचं रान करून बसत असते; जगात प्रेमाइतकं सुंदर काहीच नाहीये, म्हणतात ना! "प्रेमाने जग जिंकता येते" ,  तसच काही प्रेम असतं. पण ते शोधता आलं पाहिजे. आजच्या तरुणपिढीने खोट्या प्रेमाच्या आहारी जाऊन स्वतःला नशेच्या आहारी घेऊन जाऊ नये. प्रेम म्हणजे मिळवलं तर स्वर्ग अन् गमावलं तर नरक असं म्हणता येईल, त्यामुळं माणसं ओळखता आली पाहिजे. त्यांचे वास्तवातील चेहरे वाचायला शिकलं पाहिजे, कारण माणूस जरी खोटं बोलत असला, फसवाफसवी करत असला तरी त्याचे डोळे आणि चेहरा कधीच खोटं बोलत नाही. त्यामुळे चेहरा वाचणं  काळाची गरज बनली आहे. जेव्हा स्वतःला प्रतिष्ठित समजणारे नकली चेहरे आपण वाचायला शिकू ना. तेव्हाच वास्तवातील चेहरे आपल्या समोर येतील.

स्नेहल लक्ष्मण जगताप,
रा. सिरसगाव, ता. वैजापूर,
जि. औरंगाबाद