सर्जा आला अन् पोळा झाला...!

विश्वनाथने त्याच दिवशी सर्जाला घरी आणून त्याची मनोभावे पूजा केली. दोन दिवसानंतर पोळा होता.

सर्जा आला अन् पोळा झाला...!

बारावी पास झाल्यानंतर विजूने सर्वात आधी कोणतं काम केलं असंल तर स्मार्ट फोनचं. मयूरच्या ओळखीनं एक चकाचक फोन खिशात टाकून तो गावात आला खरा. पण विश्वनाथला मात्र हे आवडलं नव्हत. विजुचा बाप विश्वनाथ. गावात राहून पुढं काय करशील, त्यापेक्षा तालुक्याच्या गावाला जाऊन काही कामधंदा बघ... आणि शिक तुझा तू... असं म्हणून विश्वनाथ सारखा त्याच्या मागे असायचा... आता दोन तीन महिने झाले, विजू असलम भाईच्या व्हील अलायमेन्ट गॅरेजवर काम शिकतोय... असलम गावचाच आहे आणि तो बापाला आणि पोराला चांगले ओळखून आहे. त्यामुळं पगार का पैसा मैं विशू को दुंगा... असं त्यानं विजूला सांगून ठेवलंय. विजू दहा वीस रुपये देऊन येतो आणि जाताना असलम त्याला कुठल्या तरी गाडीत बसवून देतो... असं हे रहाट सुरू आहे. 

विश्वनाथचा फोन आल्यापासून विजू थोडा नाराज दिसत होता. गेल्या दोन एक दिवसात मात्र विजूचं कामात अजिबातच लक्ष लागत नव्हतं. 
क्या रे विजू... दिनभर फोन पे लगा रहता है... चल वो टायर इधर ला... असं असलम ओरडला. विजून टायर दिलं. असलमने ते फिट केलं. गाडीवाल्याकडून पेमेंट मिळाल्यावर असलम विजूला बोलला... क्या हो गया रे... नाराज क्यू दिखरा...?
चाचा... दादाचा फोन आला होता... विजू बोलला. क्या हो गया फिर...? असलमने विचारलं. चाचा... अपना सर्जा गायब हैं... दो दिनसे...!
दादांनी काल नाय सांगितलं. मला वाटलं, शेतात हाय... पण तिथं बी नाही. दादा लय टेन्शनमधी हाय. 

विश्वनाथला टोटल शेती पाच एकर. तीन त्याची स्वतःची, अन दुसरी दोन एकर काशीनाथची. ती पण विश्वनाथच कसायचा बटाईन.  काशीनाथ औरंगाबादला शिक्षक होता. बैलजोडीची आवड लहानपणापासूनच असल्यानं विश्वनाथने सर्जाराजाची जोडी जीवापाड जपली होती. त्यातही सर्जा म्हणजे घरच्यावानी. घरच्या गायीचं खोंड. डोळ्यासमोर मोठं झालेलं. रंगानं काळा पांढरा... कबऱ्या रंगाचा. उत्तम गडी. कामाला जबऱ्या. त्याला जोडी व्हावी म्हणून विश्वनाथने फुलंब्रीच्या पाहुण्याकडून राजाला आणले होतं. विश्वनाथला या जोडीच्या मदतीनं काम झेपत नव्हतं, पण म्हणतात ना... नाद लय भारी... घरच्या दावणीला बैलजोडी असायलाच पायजे... अशा स्वभावाचा होता विश्वनाथ. एका रात्रीतून सर्जाला कासरा सोडून पळवला होता चोरांनी. सर्जा नसल्यानं विश्वनाथचं चित लागत नव्हतं कुठं... याला फोन कर, त्याला फोन कर... असं चाललं होतं... गावच्या आसपासच्या शेतात जाऊन चकरा मारून झाल्या... जवळपास सगळ्यांना विचारलं.... पण सर्जा काही घावला नाही. एखादा फोटू असंल तर व्हॉट्स ॲपवर टाक... असं विजूला सांगताना विश्वनाथचे डोळे वल्ले झाले होते. सर्जाचा रिकामा खुटा पाहून त्याला घरात थांबावं वाटेना. विश्वनाथने गावातल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यानं साकडं घातलं. देवा... आता तूच कर बा काही तरी....!!! 
इकडं पारबताची अलगच भुणभुण चालू होती. पारबता ही विश्वनाथची कारभारीण, विजूची माय. तरकटी स्वभावाची. काय तुम्ही... किती वेळा म्या म्हणली, अव रात्री उठून एक चक्कर हानत जावा परसाकडं. गोठ्यात पाहत जावा... लाईट लावून घ्यावा... पण तुम्ही कुठं ऐकताय... आता पोळा तोंडावर आलाय... कधी भेटणार आपला सर्जा... विज्याला सांगा आता... तो लावीन काही डोकं...! 

विजय ऊर्फ विजू ऊर्फ विज्या.... पारबताचा लाडका पोऱ्या. आईचा विश्वास सार्थ ठरवण्यासारखी कामगिरी विजूने बजावली होती. एकजात सगळ्या ग्रुपवर त्यानं सर्जाचे फोटू अपलोड करून टाकले. खाली नंबर आणि नाव टाकलं स्वतःचं आणि पत्ता टाकला असलम व्हील अलायमेन्ट अँड गॅरेजचा. दोस्त मंडळीला... पाहाय ना बे कुठं... तुमच्या एरियात राऊंड मार... अबे हाव ना... खरंच ना... म्हाताऱ्याला फोन लाव... असं सांगून आणि प्रेमळ दम देऊन झालं होतं. आता विजू वाट पाहत होता मित्रांच्या कॉलची. असलम भाईने फोनवर तर सांगितलच, शिवाय त्याचे पंटर कामाला लावले होते. अखेर सवाल होता विश्वनाथशी असलेल्या मैत्रीचा....!!!

शनिवारच्या सायंकाळी विजूला चहा सांगून ये म्हणून असलमने जवळच्या हॉटेलात पाठवले. तंगड्या समोरच्या खुर्चीवर ठेवून तो आरामात बसला होता. एवढ्यात एक छोटा हत्ती दबकत दबकत येऊन त्याच्या गॅरेजसमोर थांबला. टायरचा काही तरी प्रॉब्लेम झाला होता. ड्रायव्हर सांगू लागला. ठीक है... ठीक है... म्हणत असलम भाईने बैठो... चाय पिओ... बाद में कामकु हाथ लगायेंगे... असं म्हणून ड्रायव्हरला दुसरी खुर्ची दिली. बोलता बोलता किधर से आये, किधार जा रे... अशी चौकशी झाली. गाडी ओपन बॉडीची असूनही ताडपत्रीने झाकलेली होती. माल हैं क्या गाडी मे... असलमने विचारलं. हाव... क्यू... ड्रायव्हर बोलला. लोड कम करनेकु होना... तभीच काम करते आयेंगा... असलम बोलला. तेवढ्यात विजू चहा घेऊन आला. चहा झाल्यावर ड्रायव्हरने गाडीतले तीन बैल बाहेर उतरवले. खांबाला बांधणार तोच विजूची नजर मधल्या सर्जावर पडली. त्याने जवळ जाऊन खात्री केली. सर्जानेही विजूला ओळखले होते. आता असलम भाईला कसे सांगायचे या विचारात तो पडला. चाचा, वो देशमुख साबने तुमको बुलाया है... अर्जंट बोलरे थे... आव ना जरा इधर... असं म्हणून विजूने त्यांना बाहेर आणले. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांना सर्व काही सांगितले. ठीक है... डर मत... मैं संभाल लेता... तू बापकु फोन लगा... असे म्हणून ते गॅरेजकडे आले. ड्रायव्हर आणि त्याच्या सोबत्यांना ओरिजिनल दमात घेतल्यानंतर त्यांना घाम फुटला. असलम भाईने उगाच काहीतरी बटने दाबून... जाधव साहब... हैं क्या... जय हिंद साहब... तीन लोग हैं... गाय बैल चुरानेवाले लग रे मेरेकु.... प्लीज जलदी आव साब... ओके साहब... ठीक है साहब... असा डायलॉग मारला फोनवर.... आजूबाजूचे दहा वीस लोकही आता जमा झाले होते. शेवटी ड्रायव्हरने सगळं खरं सांगतो, पण मारहाण करू नका... अशी विनंती केली. तीन बैलांपैकी दोन चोरीचे आहेत. तिसरा मात्र विकत घेतला आहे. मी फोन लावून देतो मालकाला... विचारून घ्या... असं तो असलम भाईला म्हणाला. एवढ्यात विश्वनाथही गॅरेजवर पोहचला होता. सर्जाला पाहून त्याला अत्यानंद झाला होता. त्याने सर्जाला अक्षरशः मिठी मारली. देवाधिदेव श्री महादेवाचे आभार मानले.
दुसरा बैलही देशमुख साहेबांच्या हवाली करून त्याच्या मूळ मालकाला तसे कळवले. तिसरा बैल मात्र ड्रायव्हरने विकत घेतला असल्याने त्यालाही सांभाळण्याची तयारी दाखवून विश्वनाथने पैशांसाठी साईड मागून घेतली. हवाला घ्यायला देशमुख साहेब आणि असलम भाई होतेच. ड्रायव्हरने गपगुमान सगळे कबूल केले. मार खाण्यापेक्षा ते परवडणारे होते....!!!

विश्वनाथने त्याच दिवशी सर्जाला घरी आणून त्याची मनोभावे पूजा केली. दोन दिवसानंतर पोळा होता. आता विश्वनाथकडे तीन बैल झाले होते. पारबता आपल्या विज्यावर खुश झाली होती. विजूलाही आनंद झाला होता. विश्वनाथच्या घरी यंदाचा पोळा जोरदार होणार होता....!!!

संदीप प्रभाकर कुलकर्णी,
औरंगाबाद.
मो. ९८५०८२६६७९