छ. शिवाजी महाराज हा विचारांचा प्रवास आहे, कधीही न संपणारा

प्रत्येक मनुष्य, प्राणी, सजीव, निर्जीव हे जन्माला येतात आणि नैसर्गिकरीत्या नष्ट ही होतात. अस्तित्व संपल्यानंतर ही वर्षानुवर्षे टिकून राहतं ते आपलं नाव आणि कर्म.

छ. शिवाजी महाराज हा विचारांचा प्रवास आहे, कधीही न संपणारा

होय, आज माझा बर्थ डे... मी इंग्रजी कसा बोललो याचं आश्चर्य वाटलं का तुम्हाला? मला येतं हो इंग्रजी बऱ्यापैकी. माझ्यासमोर ही गोरी ब्रिटिशांची सत्ता आली ही आणि गेली ही. पाहिलंय मी इथे इंग्रज अधिकाऱ्यांना मान झुकवून आपल्या राजाला अभिवादन करताना, पाहिलंय मी फ्रेंचांना मुजरा करताना. मी स्वतः माझ्या डोळ्यांसमोर यांना आपल्या देशातील जनतेला छळताना सुध्दा पाहिलंय. त्यांच्या भाषेतील त्यांनी केलेली कुजबुज मी कान देऊन ऐकलीय. म्हणून त्यांच्या सगळ्या भाषा मला कळतात. असो, पण आज माझा जन्मदिवस. माझा जन्म कधी आणि कसा झाला हे मला ही नक्की सांगता येणार नाही. मी किती वर्षांचा आहे हे ही कदाचित या जगात कुणीच सांगू शकत नाही. कारण माझ्या जन्माच्या वेळी साक्षीला कुणी नव्हतच मुळी. साक्षीला होते ते फक्त ही पृथ्वी आणि हे अथांग पसरलेलं आकाश. माझा जन्म जरी कुणाला सांगता येत नसला तरी आज माझा खऱ्या अर्थानं पुनर्जन्म झाला, कारण आज तारीख ६ जून १६७४. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. प्रश्न पडला का तुम्हाला, मी नक्की कोण ते?  होय, "मी - रायगड."
  
प्रत्येक मनुष्य, प्राणी, सजीव, निर्जीव हे जन्माला येतात आणि नैसर्गिकरीत्या नष्ट ही होतात. अस्तित्व संपल्यानंतर ही वर्षानुवर्षे टिकून राहतं ते आपलं नाव आणि कर्म. आज माझी अवस्था थोड्याफार प्रमाणात भग्न झालेली असली तरी माझे महत्व कमी झालेले नाही की माझ्या प्रती हिंदूमध्ये असलेला आदर कमी झाला नाही. जो शिवरायांनी त्यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून मला घोषित करून मिळवून दिला. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकलो हे माझे परमभाग्य. आज निसर्ग ही त्याच्या या दगडाच्या उत्पत्ती वर समाधानी, "नव्हे, तर खुश असेल. 
    
आपला जन्मदिवस जरी महत्वाचा असला तरी ज्या दिवशी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख मिळते तोच आपला खरा जन्म. आणि मला माझी ओळख मिळवून दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. तोरणा, प्रताप , पुरंदर, जंजिरा असे अनेक किल्ले जिंकत जिंकत त्यांनी माझ्यातील "दगडाला" "गडपण" मिळवून दिलं. माझ्या जन्माच सार्थक झालं. 
तसा मी पृथ्वीच्या उत्पत्तीपासून इथे उभा आहे. माझं आयुष्य एकदम स्थिर, चिरंजीव आणि शाश्वत आहे पण हे चिरंजीवित्व म्हणजे एक शापच होता. एका डोंगराचं अस्तित्व ते काय असणार? त्याच डोंगराच्या पायथ्याशी फुलणाऱ्या रान फुलाच आयुष्य मात्र फक्त काही घटका. तरी ही ते किती सुंदर असत. कदाचित हेच समीकरण आहे, जे सुंदर असत त्याचं अस्तित्व फक्त काही घटकांसाठी. आणि जे शाश्वत आहे,चिरंजीव आहे ते मात्र अगदी कुरूप. माणसाचं ही तसच आहे. रान फुलासारखं काही क्षणांचं आयुष्य सौंदर्याने भरून टाकता येतं आणि डोंगरा सारखं त्या आयुष्याला स्थिर बनवण्याच्या नादात कुरूप ही बनवता येतं. ते मानवाच्या हातात. असो...

मला मात्र स्थिरता, चीरंजिवित्व, शाश्वत यासोबतच मानाचं ही स्थान मिळालं. त्या पुण्यवान व्यक्तिमत्वाचे पाय माझ्या शिरावर पडले आणि माझ्या आयुष्याला, जिवंत असण्याला अर्थ मिळाला. शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला राजा मिळाला. राज्याभिषेक सोहळ्यानंतर मला प्रचंड गर्व झाला, अंग अंग शहारून आलं होतं. संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगेत मीच उंच आणि मोठा आहे,असा माझा भ्रम झाला होता. पण माझ्यापेक्षा ही महाराजांची उंची खूप जास्त होती. " साक्षात कैलासच."
  
अनेक थोर लेखकांनी, कवींनी शिवरायांचा इतिहास अभ्यासून त्यावर बरेच लिखाण केलं. पण शिवराय खरच अभ्यासून समजण्या इतके सोपे होते का? त्यांनी केलेला हा स्वराज्याचा विस्तार इतका सोपा होता का, जो लिखाणातून व्यक्त होईल. 
  
शिवाजी महाराज आचरणात आणल्याशिवाय आताच्या पिढीला शिवराय काय होते हे कळणे केवळ अशक्य. शिवाजी महाराज म्हणजे असा एक इतिहास आहे, असा भूतकाळ आहे ज्याकडे पाहिलं की भविष्यकाळ घडविण्यासाठी आपल्याला वर्तमान दृष्टी प्राप्त होते. शिवाजी हा एक विचारांचा प्रवास आहे आणि तो कधीच संपणार नाही. ज्यादिवशी "शिवाजी" नावाचा अंत होईल त्या दिवशी माझं अस्तित्व ही संपलेल असेल आणि या जगाचं ही. छ्त्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं समजले ते फक्त त्यांच्या मावळ्यांना, जिजाऊंना, शाहिस्तेखानाला, औरंगजेबाला, संभाजी महाराजांना , शिवाजी महाराज समजले ते त्या एका संपूर्ण पिढीला जी "स्वराज्य" या ध्येयासाठी पेटून उठली होती आणि शिवाजी समजले मला. होय, मला. पण शिवरायांना पूर्णपणे ओळखणाऱ्या तीनच व्यक्ती त्या म्हणजे त्यांच्या आईसाहेब जिजाऊ, त्यांचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब आणि मी. आज ही स्वराज्याची राजधानी म्हणून मी माझ अस्तित्व जपण्याचा पुरेपूर प्रयत्न  करतोय. ते उगाच नाही. माझ्या राजाला आजही या जगात जिवंत ठेवण्याचं काम माझ्यासारखे अनेक गड, किल्ले त्यांच्या प्रयत्नांची परकाष्ठा करत उभी आहेत. असो..

६ एप्रिल १६५६ रोजी शिवरायांनी मला वेढा घालून मला त्यांच्या ताब्यात घेतल आणि माझी डागडुजी केली. माझ ठिकाण मुळात अवघड ठिकाणी असल्याने शत्रूला चाल करून येण्यास कठीण होत आणि सागरी मार्गाने दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने महाराजांनी मला राजधानी म्हणून निवडलं. अती उंच असल्याने येथे गवत उगवणार नाही आणि उभ्या  कड्यावरून माणूस काय तर पाखरू ही उतरण्यास जागा नाही. "तख्तास जागा हाच गड करावा" महाराजांनी माझ्या बाबतीत वापरलेलं हे वाक्य मला धन्य धन्य करून गेलं. 
      
गेल्या ३०० वर्षांपासून एकच स्वप्न बघत उभा आहे, शिवराय पुन्हा एकदा जन्मावेत आणि पुन्हा जातीधर्म विसरून स्वराज्यातील जनता गुण्या गोविंदानं नांदावी. राज्यातील स्त्रियांना मानाचं स्थान आणि सुरक्षिततेचं आश्वासन मिळावं.
भ्रष्टाचाराचा समूळ नाश झालेला असावा. खरचं माझ्या स्वप्नातलं माझ्या राजाचं स्वराज्य पुन्हा नव्याने आकार घेईल का? खरंच माझा राजा घेईल ना पुन्हा जन्म. शिवराया, घेशील ना जन्म पुन्हा?

(वरील लेख बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची प्रेरणा घेऊन लिहिलेला आहे.)

सौ. प्रियंका बागड-अमृतकर, कल्याण