आत्महत्या - एक संवाद - Marathi Article

एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेते तेव्हा हा निर्णय नक्कीच सोपा नसेल यात मुळीच शंका नाही. परंतु त्यामागील कारण समजून घेताना ती व्यक्ती कुणाकडे, केव्हा आणि कधी व्यक्त होते का हे बघायला हवे.

आत्महत्या - एक संवाद - Marathi Article

‘आत्महत्या’ म्हटलं की डोळ्यासमोर एक विदारक चित्र उभं राहतं ज्यात एक शेतकरी - ज्याने गळ्याला लावलेला फास, एक विद्यार्थी - ज्याने विझवून टाकलेला ज्ञानाचा दिवा, एक महिला/स्त्री - जिने वैतागून घेतलेली उडी, अभिनेते - नैराश्याला बळी ठरलेले ! बस्स... इतकंच असतं का हे? यामागे दडलेल्या वेदना, यातना, मानसिक ताणतणावाच्या भावना, सामाजिक निराशेच्या आशा यातील या नि अशा कित्येक संवेदना आत्महत्या या एका समस्येमागील कारणीभूत समस्या आहेत हे मुळात आपण चुकूनही शोधायचा प्रयत्न करत नाही. किती भयावह आहे ना हे...!

एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेते तेव्हा हा निर्णय नक्कीच सोपा नसेल यात मुळीच शंका नाही. परंतु त्यामागील कारण समजून घेताना ती व्यक्ती कुणाकडे, केव्हा आणि कधी व्यक्त होते का हे बघायला हवे. शेवटी मनात दडून राहिलेल्या अव्यक्त गोष्टी या मानसिक खच्चीकरणाला कारणीभूत ठरत असतात. आणि एकदा माणसाचे मानसिक खच्चीकरण झाले तर त्यातून पुन्हा सावरणे खूप कठीण जात असते. त्यामुळे आत्महत्या करणारी व्यक्तीच एकमात्र दोषी नसून समाजाचा एक घटक म्हणून आसपासचा गोतावळाही तितकाच दोषी असतो.

प्रत्येक व्यक्तीला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच इच्छामरणाचा अधिकार कायद्याने देण्यात आलेला असला तरी त्यावर आत्महत्या हा मार्ग नव्हे. इच्छित मृत्यू आणि आत्महत्या यात शब्दांचाच नव्हे तर यामागील कारणांचाही भेद अभेद्य आहे. इच्छामृत्यू म्हणजे आधीच असलेल्या आजार किंवा मानसिक, शारीरिक इत्यादी वेदनांतून इच्छित सुटका परंतु काही निकषांसह तर आत्महत्या ही समस्याच मुळात एक मानसिक आजार आहे आणि अशा व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या सहानुभूतीची नव्हे तर आधाराची, समजून घेण्याची, म्हणणे मांडण्याची योग्य संधी यांची अधिक गरज असते.

मागील वर्षी (वर्ष २०२०) सर्वोच्च न्यायालयाने 'आत्महत्या - एक मानसिक आजार' असा निकाल देताना अनेक गोष्टींचा उहापोह केला होता. ज्यातून 'आत्महत्या - मानसिक आजार की सामाजिक समस्या की दोन्हींचा मेळ' असा नवा पेच उभा राहतो. जसे आपण म्हणतो एका गोष्टीमागे हजारो कारणं असतात मग या हजारो कारणांमागे निदान एक सामान्य समस्या किंवा समस्येतून उद्भवलेली नवीन समस्या नक्कीच असू शकते ना? न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आत्महत्या हा जर मानसिक आजार मानला तर आजाराची सुरुवात एकाएकी होत नाही, त्याच्या मुळाशी अनेक गोष्टींची मूळं जन्माला आलेली असतात व त्यामुळे माणसाचं मन कमजोर होत जातं. असेच एक मूळ म्हणजे सामाजिक गोष्टी अर्थात समाज !
एखादा शेतकरी जेव्हा परिस्थितीपुढे असह्य होतो, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो, एखादी महिला अन्याय/अत्याचाराला कंटाळते अथवा एखादा अभिनेता नैराश्याच्या विळख्यात अडकतो तेव्हा त्याच्या ध्यानीमनी फक्त अपराधाची भावना असते. आपण चुकतोय इतकंच त्याच्या बोलण्यात, वागण्यात आढळून येतं. ही अपराधीपणाची भावना एका किंवा काही दिवसांची नसते तर समाज - जो दूरदूरपर्यंत ओळखीचा असून अनोखळी असतो त्याच्या चष्म्यातून स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण होते. उद्या आपल्याबद्दल बाहेर कळले तर त्याचे परिणाम प्रत्यक्ष होण्याआधीच ते अशा व्यक्तीच्या दृष्टिपटलापुढे चित्रपटासमान उभे राहतात. अनेक दृष्यांच्या वाटा त्याला वेगवेगळ्या दिशेने खेचत असताना आधार म्हणून एक वाट तो निवडू शकत नाही, कुणापुढे आपले म्हणणे मांडू शकत नाही, कोण समजून घेईल अन कोण वेड्यात काढेल या आणि अशा कित्येक शंका-कुशंका त्याच्या मनात घोळत असतात. तेव्हा आपल्या जवळच्या माणसापुढे व्यक्त व्हायला घाबरणारा अशा वेळी भल्यामोठ्या समाज नावाच्या अमर्यादित घटकापुढे कसा निभावणार? यातूनच मग आत्महत्या हा एकमात्र मार्ग निवडला जातो. 

अर्थातच, या संवेदनशील बाबीकडे बघताना माझ्या-तुमच्यासारखा मोजक्या लोकांचा स्वतःवर परिणाम होऊ देणारा एक गट म्हणेल, आसपास इतकी माणसं असताना एकटं वाटणं यापेक्षा वेगळा एकटेपणा असू शकतो? 'लोक क्या कहेंगे' इतकं महत्वाचं असतं? स्वतःच्या नजरेतून तपासलेली साधी गोष्टसुद्धा हजारदा तपासणारे आपण समाज आपल्या घराचा उंबरठा ओलांडून मनाच्या दरवाजापर्यंत येऊन ठेपतो तरीही साशंक का? आपल्याच माणसासमोर मन मोकळं करता येत नसेल तर इतका गोतावळा हवाच कशाला? स्वतःवर समाजाचा किती परिणाम होऊ दयायचा हे त्या व्यक्तीच्या हातात नाही का? यावर नक्कीच सकारात्मक उत्तर असू शकेल पण नैराश्याच्या टोकावर उभा ठाकलेल्या व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं असता यामागे कुठे ना कुठे माणूस म्हणून माणसाची मानसिकता, माणुसकी जबाबदार असल्याचे आढळून येईल. कुटुंबासमवेत वेळ घालवत असताना एकमेकांना आपण किती समजून घेतो याचा कानोसा घेतला गेला पाहिजे. लोकांच्या विचारातून एखाद्याकडे बघण्यापेक्षा आपण समोरच्या व्यक्तीचे अधिक जवळचे असल्यामुळे तिच्या हालचालींतून काहीतरी वेगळं घडतंय का हे टिपता यायला हवे. परंपरांच्याआड लपून व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला घातला जाऊ नये याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मित्रपरिवारात सामील होताना मनातलं चांगलं-वाईट सहज सांगता येईल असं कुणीतरी जवळचं असलं पाहिजे. समाजापासून वेगळं होता येत नसलं तरी समाजाचा आपल्यावर मर्यादित परिणाम होऊ देणं जमायला हवं. कुणीतरी जवळचा विश्वास ठेऊन आपल्याजवळ व्यक्त होईल अशी आपली माणुसकी असायला हवी. मात्र, मदतीचा हात देऊ करताना निःस्वार्थ माणुसकी आपल्या स्वभावगुणात प्रत्यक्षरित्या रुजलेली हवी. जसे बाह्य जग दोषी असतं तशीच ती व्यक्तीसुद्धा स्वतःच्या वागण्यासाठी तितकीच दोषी मानावी लागेल. या 'सो कॉल्ड सोशल मीडिया' नावाच्या व्हर्चुअल रिंगणात खरा रिंगमास्टर नेमका कोण हे वेळीच ओळखता यायला पाहिजे. व्हर्चुअल जगतातली नोंद कायमस्वरूपी असली तरी त्यातल्या प्रत्येक गोष्टीला आपण व्यक्तिशः जबाबदार असतो. पण जे आपण शेअर करणार तेच ते साठवणार असतं. तंत्रज्ञान कितीही अचूक होत असलं तरी त्याला सुरु करणारी नि रोखणारी आपलीच बोटं आहेत. त्यामुळे अशा या प्लॅटफॉर्म्सवर काय बोललं, लिहिलं अथवा दाखवलं जातं त्याचा परिणाम आपल्या हळव्या मनावर कुठपर्यंत होऊ द्यायचा हे नैराश्य बळी ठरलेल्या व्यक्तीने वेळीच हेरलं पाहिजे. तसंच काहीसं आसपासच्या ओळखी/अनोळखी लोकांचं. म्हणतात ना, 'ऐकावं जनाचं करावं मनाचं' योग्यच आहे की!

आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या हृदयपटलावर एक छाप सोडून जात असतो. मग ती चांगली की वाईट हे जरी येणारी वेळ ठरवत असली तरी आपलीच माणसं जेव्हा आपल्याला समजून घेत नाहीत तेव्हा जी निराशा होते त्यातूनच तर मनावरचा दबाव आणखी खोल होत जात असतो. त्यामुळे स्वतःकडे दयेच्या भावनेने न बघता सकारात्मक भावनेने बघणे गरजेचे ठरते. जसे आपल्या यशासाठी आपण स्वतः हक्काने स्वतःला जबाबदार ठरवतो तिथे अपयश पचवण्याची हिंमत ठेवलीच गेली पाहिजे. ज्यामुळे असे नैराश्य मानसिक तणावापासून आपल्याला दूर ठेऊ शकेल आणि कुणाचीतरी सततची भासणारी उणीव कायमची नाही पण थोड्याफार प्रमाणात कमी होऊन अयोग्य निर्णयापर्यंत पोहचण्यावर मात करणं शक्य होईल. पण याचा अर्थ असा नव्हे की नैराश्यातून जाणाऱ्या व्यक्तीला कुणाच्या असण्याची गरज कधीच पडणार नाही. फक्त ती गरज उपकारार्थी नसून अत्यंत भावनिक जवळीकतेतून दिली गेली पाहिजे. जेणेकरून आत्महत्या हे पाऊल उचलण्यापासून आपण कुणालातरी रोखू शकू. कारण आजच्या धकाधकीच्या जीवन प्रवासात उद्या ही वेळ कुणावर कधी आणि केव्हा येईल हे सांगता येत नाही.
ज्याप्रमाणे शून्याच्या डावीकडे अंक लावल्याशिवाय त्याची किंमत वाढत नाही त्याप्रमाणे आयुष्यात उजव्या-डाव्या व्यक्तिमत्वाचं सावट अन आपली किंमत वाढवणारं जिवंत भावनेतून सोबत असणारं कुणीतरी असेल तोपर्यंत स्वतःला संपवण्याचा हा अनुचित मार्ग मात्र नक्की टाळला जाईल. कारण अशा व्यक्तीसाठी आपल्यानंतर कोण याचं उत्तर तरी निदान हे टाळू शकेल, अशी सार्थ आशा!

एकूणच व्यक्तीच्या मनावरचा मानसिक ताण, समाजातल्या छोट्या-छोट्या गोष्टींचे मनावर येणारे दडपण आणि या दोन्हींचा मेळ यातून आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे ठोस असा उपाय नसलेल्या या मानसिक आजारापासून स्वतःस आणि सोबतच इतरांना रोखायचं असेल तर 'संवाद' हेच उत्तम साधन आणि एक सर्वोत्तम मध्यम मार्ग समजून एकमेकांना मानसिक तणावातून बाहेर काढायला साथ दिली गेली पाहिजे.

वर्षा शिदोरे, नाशिक