ती भावना, ती ओढ, तो जिव्हाळा, तो विरह आता फक्त शाब्दिक उरलाय

एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे, ते प्रेम नसतेच. ते असते फक्त शारीरिक आकर्षण आणि आम्ही त्यालाच प्रेम समजतो. शारीरिक आकर्षण हे वासनेपासून निर्माण होत असते.

ती भावना, ती ओढ, तो जिव्हाळा, तो विरह आता फक्त शाब्दिक उरलाय

प्रेम ही एक सहज व सुंदर भावना आहे. पवित्र प्रेम म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूपच होय. प्रेम आणि सौंदर्य याचा कुठेच संबंध नसतो. प्रेम म्हणजे मनापासून सुरू झालेली प्रकिया मनापर्यंत येऊन थांबते, तेच खरे प्रेम. 

एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे, ते प्रेम नसतेच. ते असते फक्त शारीरिक आकर्षण आणि आम्ही त्यालाच प्रेम समजतो. शारीरिक आकर्षण हे वासनेपासून निर्माण होत असते. वासना ही फक्त शारीरिक सुखासाठी निर्माण झालेली भावना असते. या शारीरिक आकर्षणाच्या नांदी लागून आतापर्यंत कित्येक जन बरबाद झाले. कित्येक जन बरबाद होत आहे. आणि यानंतरही कित्येक जन बरबाद होणार आहे. यात अजिबात शंका नाही.

खरं प्रेम काय असतं, ते एखाद्या लेखकाला विचारा, कवीला विचारा त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. एखादा लेखक जेव्हा प्रेमकथा लिहायला घेतो. तेव्हा त्या कथेत जिवंत भाव उमटलेले असतात. तसेच एखादा कवी कविता लिहितो किंवा गीत लिहितो, त्यातही त्याच्या भावना प्रकर्षाने जाणवतात. हजारो वर्षांपासून कवी व लेखक यांनी प्रेम भावना आपल्या साहित्यातून, कवितेतून तसेच गायकाने आपल्या गायिकेतून जिवंत ठेवले आहे. संत कवी ज्ञानेश्वर महाराज प्रेमाविषयी ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक १ व ओवी क्रमांक २०१ मध्ये प्रेमाचे वर्णन करतात.
     

जैसा भ्रमर भेदी कोडे।
भलतेसे काष्ठ कोरडे।
परि कळिकेमाझी सापडे।
कोवळिये।।
तेथ उत्तीर्ण होईल प्राणे ।
परि ते कमलदल चिरून नेणे ।
तैसे कठीण कोवळेपण ।
स्नेह देखा ।।

खरं नातं कसं असावं, खरं प्रेम कसं असावं तर ते भुंगा आणि कमळाच्या फुलासारखे असावे. भुंग्याचे कमळाच्या फुलावर इतके अतूट प्रेम असते की भुंगा मृत्यूला कवटाळतो परंतु फुलाला कुठलिही इजा होवू देत नाही. एकदा भुंगा कमळाच्या फुलावर बसून प्रेमाचा निखळ आनंद घेत होता. फुलाप्रती आसणाऱ्या प्रेमात तो  इतका मग्न झाला की केव्हा रात्र झाली हे भुंग्याला कळलेच नाही. दिवसभर फुललेले फुल रात्री मिटले गेले आणि त्या फुलात भुंगा अडकल्याने त्याला आँक्सीजन मिळणे अशक्य झाल्यामुळे फुलातच भुंग्याचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता लाकडाला छिद्र पाडणारा भुंगा एका क्षणात फुलातून बाहेर येऊ शकत होता. परंतु फुलावर असलेल्या अतूट प्रेमापोटी फुलाला इजा होऊ नये म्हणून त्या भुंग्याने फुलातच मृत्यू पत्कारला परंतु फुलाला इजा होऊ दिली नाही. परंतु हल्ली आकर्षणाच्या जमान्यात असे प्रेम मिळणे कठीणच आहे. 
        
प्रेम हे ईश्वरभक्तीचे प्रतिक असून प्रेम माणसाच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे काम करत असते. प्रेमामुळे माणूस नेहमी प्रसन्न असतो. परंतू हल्लीच्या तरूणांनी प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे. वासनेलाच प्रेमाचे नाव देऊन ते मोकळे झालेले आहे. त्यामुळे 'प्रेम' हा शब्दच बदनाम झाल्यासारखा मला तरी वाटतो.

खऱ्या प्रेमात विश्वास हा खुप महत्वाचा विषय असतो. विश्वासाच्या पायावर प्रेमाचे मंदिर उभे राहते, आणि जिव्हाळ्याचा कळस त्यावर शोभून दिसतो. प्रेमाला जर ज्ञानरुपी खत घातले तर ते प्रेम भव्य वृक्ष बनून दिव्यप्रेम बनून जन्मोजन्मी सोबत राहते.

हल्ली प्रेमातील जिव्हाळा खुप कमी झालाय, प्रेमाचा कालावधी देखील कमी झालाय. हल्ली प्रेम फक्त कविता, कवी व लेखकांपूरता मर्यादित उरलेला शब्द आहे. ती भावना, ती ओढ, तो जिव्हाळा, तो ह्रदय तोडणारा विरह सगळं फक्त शाब्दिक राहिलंय, उरलाय फक्त आकर्षणाचा खेळ आकर्षण संपलं की प्रेमही संपलं, आणि मग जोडीदारापासून दूर होण्याचा सोपा मार्ग निवडला जातो, "ब्रेकअप" आणि मग परत नवीन आकर्षणाच्या (प्रेमाच्या) शोधात. यामुळे आता असे वाटायला लागले की, प्रेम ही भावना कवी, लेखकच आपल्या साहित्यातून जिवंत ठेवू शकतात. म्हणून 'प्रेम' व कवी यांचे नाते जन्मोजन्मीचेच आहे. असे वाटते. जोपर्यंत कवी आपल्या भावना साहित्यातून व्यक्त करत राहील तोपर्यंत प्रेम आपला श्वास घेत राहील, यात तीळमात्र ही शंका नाही. 

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद