जीव गुदमरतोय

सद्य परिस्थिती पाहता माणसाने माणुसकी सोडली आहे असे वाटते. पूर्वीच्या काळी आई वडील सांगतील त्याप्रमाणेच सगळं घर चालायचं.

जीव गुदमरतोय

कधी कधी काळानुसार बदलत गेलेली आपली संस्कृती माणसाला विचित्र वागायला भाग पाडते की काय हा प्रश्न मला पडतो. पूर्वीच्या काळी माणूस माणसाशी अगदी प्रेमाने वागत होता. घरी कुणीही एखादा पाहुणा आला तर आपुलकीने विचारपूस करायचा.

सद्य परिस्थिती पाहता माणसाने माणुसकी सोडली आहे असे वाटते. पूर्वीच्या काळी आई वडील सांगतील त्याप्रमाणेच सगळं घर चालायचं. आई वडील सुयोग्य संस्कार मुलांवर करायचे. प्रत्येक गोष्टींच्या मागचं कारण मुलांना पटवून द्यायचे. चांगलं काय? वाईट काय? याची जाणीव करून द्यायचे. आजकाल प्रत्येक जण बिझी लाईफ स्टाईल जगत आहे. ज्याला त्याला स्वतःचच पडलेलं आहे. जो तो आपल्या फायद्यासाठी माणसाचा उपयोग करून घेत आहे. जिथं आपला फायदा असेल तिथच माणूस गोड बोलतो, तेही त्याचे काम होईपर्यंत. एकदा का आपले काम झाले की क्षणातच माणूस ओळख विसरतो. 

आपण जर विचार करायला गेलो तर तशी चांगली माणसं देखील जगात आहेत फक्त त्यांचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. वाईट प्रवृत्ती असलेली माणसं त्यांच्या मनाप्रमाणे जगतात, आपल्या वागण्यामुळे किंवा एखाद्या कृतीमुळे समोरच्यावर वाईट परिणाम होतो, ही गोष्ट त्यांच्या मनात देखील येत नाही. परंतु चांगल्या माणसाचं काय?

एखादा माणूस स्वप्नात देखील कुणाचं वाईट चिंतू शकणार नाही अशा माणसाच्या वाट्याला नेहमी वाईटच का यावं? एखादी व्यक्ती आयुष्यभर सर्वांच्या आनंदासाठी झटते, समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी लाखमोलाचे प्रयत्न करते. तरी तिची किंमत शून्य केली जाते. अशा व्यक्तींच्या बाबतीत नेमका काय विचार करावा? ती व्यक्ती चांगली वागते यात तिचा काय दोष? तिच्या चांगुलपणाचा फायदा संपूर्ण जग करून घेतं. अशावेळी सगळं चांगलं करून देखील त्या व्यक्तीला वाईट ठरवल्या गेलं तर नकळतपणे त्या व्यक्तीचा जीव गुदमरतो. प्रामाणिकपणे एक माणूस म्हणून चांगलं वागणं हा थोडक्यात गुन्हा झाला की काय असा प्रश्न मला वारंवार पडतो.

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे