तो हृदय नगरीचा राजा, ती डाव खेळणारी राणी...

कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...

तो हृदय नगरीचा राजा, ती डाव खेळणारी राणी...

मित्रांनो नमस्ते कालच्या कथेत आपण वाचलं की कशाप्रकारे आपल्या कहानीच्या नायिकेला सर्व नात्यांची झलक व उणीव भरुन काढणारा कृष्ण भेटतो... पण विचार केला तर प्रत्येक कहानीत दरवेळी समाजच खलनायक नसतो बरं, कधी कधी नायक किंवा नायिका सुद्धा, खलनायिका असू शकते.

आपली आजची कहानी ही अशीच ट्विस्ट आहे, जसे वाचत जाल तसे आपणास तीची व्याप्ती समजेल... तर दोस्तहो या कहानीचा जो नायक आहे. तो लहानपणापासून एक संवेदनशील माणुस, ठरवूनही कुणाचं मन दुःखवणे हे त्याला कधी जमलच नाही. मराठवाड्यातल्या एका मोठ्या शहराजवळच्या, छोट्या गावात, त्याचं बालपण गेलं, पण त्याला खरी दुनियादारी शिकवली, ती गाव सोडल्यानंतर भेटलेल्या हर एक माणसाने, नी हर एक शहराने, संघर्ष करत करत तो चांगल्या पदावर आरुढही झाला, समाजसेवेतही त्याने उत्तम कामगिरी केली.

दुनियेच्या वर्गामध्ये जगण्याचे धडे घेताना, त्याला माणसं कळत गेली, समजत गेली, उमजत गेली. आणि त्याच्यातला कवी/ लेखक अगदी उफाळुन वर आला. नवनव्या विषयावर आर्टीकल लिहून ते वर्तमानपत्रातून लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्याचे नित्य कार्यच बनले, जनमाणसांना त्याच्यातला लेखक आवडायला लागला, लोक त्याला ओळखायला लागले. हल्ली काही दिवसांपुर्वीच लोकांनी त्याच्या जन्मदिनाच्या दिवशी त्याच्यावर केलेल्या काव्यवर्षावावर आधारीत त्याचे एक पुस्तक ही साहित्य क्षेत्रात झळकले... लोकप्रियता अलिंगन देत असतानाच, त्याच्या आयुष्यात "ती" ची बहारदार एन्ट्री झाली... अगदी अनपेक्षीत...

कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली... लाजाळुच्या पानांपरी सहज पापण्यात लुप्त होऊन दडणारी ती हची नजर त्याच्या नजरेशी कधीच जुगलबंदी खेळुन गेली... आणि चारी धामाच्या देवालयात सोबतच ठणाठण घंटानाद व्हावा तसा घंटानाद त्याच्या धडाडत्या हृदयात झाला.

तुम्ही किती सुरेख विचार मांडता हो; या तीच्या अमृतमय शब्दावर तो जास्तच भाळला... मग आपल्या नेहमीच्या नायक नायिकांप्रमाणे यांच्यातही संवादाची टी टेन क्रिकेट ठरली... पाच दिवस ते नॉर्मलीच बोलले, पण सहाव्या दिवशी त्याने तीला दिल की बात बोल डाली... तीने ही विचार करुन सांगते म्हनुन दुसऱ्याच दिवशी होकार ही दिला.
   
दिवसभर गर्द राईच्या वनात मृगया करुन एखाद्या क्षत्रियाला शिकार भेटल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद याच्या ओठांच्या ताम्रपटात मावेना... होकाराच्या दुसऱ्या दिवशी तीने याला तीचा ब्रेकअपने बटबटीत झालेला भुतकाळ म्हणजे, दर्द ए दास्ता याच्यासमोर मांडली की हो, एक होता, भेटला, सर्व झालं, नी भावनेशी खेळुन गेला... परत इच्छाच मेली होती, पण तुम्ही भेटलात; व माहीत नाही कैसे पण, हम दिल दे चूके सनम... आणि मग काय हमारा नायक तो अजूनच इंप्रेस झाला, छप्पन इंच छाताड ताणुन म्हणाला, जो गया सो हो गया आता मी आहे ना! तुझ्या मनाला आधार देईल... त्यातून तुला आनंद मिळेल और क्या चाहिये अपने प्यार में जानू... अशा पद्धतीने त्याला वाटलं चलो हमे किसीने दिल के काबील तो समझा हेच खुप काही आहे. पण त्याची जानू किती गावाचं नी किती नळाचं पाणी पिऊन थकली होती यह साला उसको माहीतच नही था!
  
तिसऱ्या दिवशी तीचा त्याला कॉल येतो की, सॉरी सर मी भावनेच्या भरात तुम्हाला हो म्हणाले, पण मी नाही प्रेम करु शकणार, वाटल्यास अधुन मधुन एक मैत्रीण म्हणुन बोलत जाईन; तो तर अचंबीतच झाला... व्हॅक्सिनच्या लाईनमधे पहाटपासून थांबून अखेर दुपारी रुग्णालयाच्या दरवाजाजवळ जाता डॉक्टरने लसी संपल्याचं घोषीत करताच जी लसीधारकाची अवस्था व्हावी तशी त्याची गत झाली. निशब्द आणि स्तब्ध होऊन तीला "काय झालं" असं विचारायचं त्राण ही त्याच्या शब्दांना राहीलं नाही. त्याला वाटलं कदाचीत तीचा प्रेमावरचा विश्वास उडाला असेल, किंवा सब पुरुष एक समान असं वाटलं असेल, म्हणुन नकार दिला असेल तीने, बट भई बात कुछ अलग ही थी...
   
त्या दोघांचं नातं एका तिसऱ्या व्यक्तिला माहीत होतं ती सुद्धा याची खास मैत्रीण होती. तीने याला सांगितलं की वेड्या तीच्या लाईफमध्ये चार दिवसापुर्वीच एक गलेलठ्ठ पगार कमावणारा व तुझ्यापेक्षा ही सुंदर व्यक्ती आला आहे. तू आता काय समजायचं ते समजून घे... तीने तुझा बॅकग्राऊंड काढलं आहे. तीला वाटतं केवळ आर्टीकल लिहून, समाजसेवा करुन, काय पोट भरतं का? खरं जगायचं असेल तर पैसा हवा, रुतबा हवा, लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे काही होत नाही. अजून एक सांगु तीच्या आयुष्यात जो व्यक्ती आला आहे. तो तुझा चाहता आहे. पण ती तुला चाहते, हे त्याला सहन नाही झालं  व त्याने तुझ्याबद्दल तीच्या मनात भलतच विष कालवलं आहे. सो लेखकराज आता आक्रोश करुन तांडव करुन... कुछ नही मिलने वाला... एक मैत्रीण म्हणुन हेच सांगेन की, गुलाबावर प्रेम नक्की करावं, त्याच्या आवरणावर नक्की भाळावं, पण बाबू त्याला काटे ही असतात. जखम ही होऊ शकते, याचं विस्मरण ही होऊ देऊ नये, क्या समझे... तो मैं चलती हू स्वतःला सांभाळा आता!
  
त्याची तर झटक्यात नशाच उतरली... आठच दिवसाची त्याची प्रेमकहानी... एखाद्या टिव्हीवरच्या थुकरट जाहिरातीसारखी संपली सुद्धा... काही दिवस तो शांत बसला, पण तीचा संवाद, तीचं रुप त्याला स्वस्थ बसु देईना... आता काही इलाज ही नव्हता...
शेवटी तो लेखकच, त्यानेच लिहीलेल्या लिखानाने व मैत्रीणीने सांगितलेल्या त्या उपदेशाने तो जरा भानावर आला... काही दिवसांनी त्याला समजतं की तीच्या स्वभावाला ओळखुन, तो ही तीला सोडून गेला आहे. ती पुन्हा एक नवीन आधार शोधत आहे... कदाचीत आपल्याला ती कॉल करु शकते, पण आपण आता बिल्कूल गुंतायचं नाही. हे त्याने मनोमनी ठरवलं व आपल्या कार्यात मग्न झाला.

बरोबर एका आठवड्याने तो त्याच्या कार्यालयात विचारमग्न बसला असताना त्याच्या मोबाईलची रिंग वाजते, तीचाच कॉल होता. फोन उचलायला जाणार तोच त्याच्या धक्क्याने कपाटातील वरच्या कप्प्यातलं एक पुस्तक जमीनीवर पडतं... एकीकडे फोनमधील ग्रीन लाईन स्वाईप करणार तोच त्याची नजर त्या पुस्तकाचं शिर्षक वेधुन घेते, ते शिर्षक असतं "असुरी सौंदर्य..." आपला फोन वाजतोय याचं भान विसरुन नी जणु बहिरा होऊन, तो त्या पुस्तकाच्या शिर्षकाकडे काही क्षण बघतच उभा राहतो अगदी आहे त्या अवस्थेतच..!

Gajanan Ufade

लेखन - गजानन ऊफाडे...