गर्दीतला माणूस गर्दीत हरवला

माणूस कुठे जात आहे , त्याला नेमक काय हवं आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे.यामुळे माणूस आतल्या आत पोखरला जात आहे त्याला व्यक्त होण्यासाठी , समजून घेण्यासाठी संवाद हरवला आहे.

गर्दीतला माणूस गर्दीत हरवला

आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेक घटना अशा घडतात की आपण त्या काही केल्या विसरत नाहीत.मला एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी काळा मुळे म्हणा किंवा आधुनिकते मुळे म्हणा माणूस खूप खूप व्यस्त आहे. साधा संवाद साधायला ही वेळ नाही.  मोबाईल वर तासनतास घालवायला भरपूर मनसोक्त वेळ सर्वांकडे आहे. पण आंतरिक जवळीकता साधायला मात्र कोणीच तयार नाही आहे. असे हे यांत्रिक युग मानवाने आपल्या सुखसोयीं साठी अनेक महान शोध लावले पण शोध लावता लावता जीवनात कधी यांत्रिकपना आला तेच सर्वांना कळलेच नाही.

पूर्वीच्या काळी लहान असताना सांजवेळी आपण तुळशी जवळ दिवा लावून शुंभ करोती म्हणत होतो त्यात एक खूप महत्वाचा संस्कार मुलांवर होत होता . तोही आता लोप पावत आहे असच अनेक बाबीत घडत आहे. पहिले खेळ पण सामुदायिक आणि निर्मळ , प्रांजळ आनंद देणारे होते. लपाछपी,आंधळी कोशिबीर, छपरा पाणी, कब्बडी , लंगडी, सुर पारंब्या, डफ असे नाना खेळ आपण खेळायचो. अंगत पंगत किती मजा यायची . एकमेकांची भाजी ,खाऊ एकमेका ना द्यायचा आणि खायचा . 

सर्व मैदानी खेळ खेळून खेळून आपला सर्वागीन विकास होत होता . आत्म विश्वास जबरदस्त वाढत होता. आताची मुळे व्हिडिओ गेम खेळू न एक ल कोंडी बनत चालली आहेत. सतत दूरदर्शन पाहणे, मोबाईल वर व्हिडिओ पाहणे , कुणाच्या सोबतीत संगतीत खेळून जी मजा आनंद मिळत असतो याला ही मुले मुकत आहेत. कोणाला कोणाचा कसलाही कशाच्या बाबतीत ही व्यत्यय नको आहे. हा यांत्रिकपना या भौतिक सुख सुविधांमुळे आला आहे . खेळताना येणारा घाम, नंतर त्याला मोकळ्या मैदानात लागलेली थंड हवेची झुळूक त्याची मजा सतत घरात स्वतः ल कोंडून मोबाईल पाहणाऱ्या मुलांना कशी कळणार. झऱ्याच्या नैसर्गिक पाण्याच्या मधुर जो खळखळाट आहे तो मुलांच्या कानापर्यंत पोहचत नाही आहे त्याचे एकमेव कारण निसर्गाशी त्याची ओळख होण्या अगोदर त्याच्या हातात मोबाईल इंटरनेट यासारखे गॅझेट देण्यात आल्यामुळे अंतर्मुख होत आहेत. तसेच ती बोलकी होण्याऐवजी अबोल होत आहेत.

प्रौढ व्यक्ती ही यास अपवाद नाहीत. त्यांच्याही मनात मोबाईल विषयी खूप आकर्षण आहे. ते पण सतत सेल्फी घेणे व्हिडिओ बनवणे यात टाईम पास करतात . पाठीमागे एक व्हिडिओ खूप खूप व्हायरल होत होता. त्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती रेल्वे वर  चढतो आणि त्याला विजेच्या तारेचा स्पर्श होतो. अनेक बंधू भगिनी त्याला शॉक कसा लागत आहे याचा व्हिडिओ काढण्यात गुंग होते. जर यातील कोणी थोडी तत्परता दाखवून त्याला काठीने तारे पासून विभक्त करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचे प्राण वाचू शकले असते. पण लोक असे उपाय करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात स्वतः चा खूप मोठा पराक्रम समजतात . 

आपल्या देशात असे चित्र पाहून खरोखर खूप दुःख होते. मोबाईल मुळे माणसा माणसामध्ये कसा दुरावा येत आहे . मानवता नष्ट होत आहे याची जाणीव होत आहे.
आता पतिपत्नी यांच्या नात्यात असणाऱ्या एकांताची, सुसंवाद याची जागा मोबाईल घेत आहे. 
एका रूम मध्ये असूनही दोघे दोन दिशेला तोंड करून मोबाईल पाहत टाईमपास करत असतात . दिवसभर तर कामामुळे, नोकरीमुळे, वेगवेगळ्या जबाबदारी असलेल्या व्यस्त दिनचर्ये मुळे आपल्याला दिवसा आपणास बोलायला संधी नाही. आणि रात्री जेव्हा बोलायला हवं , सु संवाद साधायला हवा, भाषिक संप्रेषण व्यवस्थित असणे म्हणजे ते नाते अतिशय घट्ट जिवलग होणे. आता साधं कोणाला बोलायला वेळ नाही तर नात काय जवळ होणार .
सकाळच्या चहाची एकत्रित गंमत पूर्वी खूप वेगळी होती. एकमेकांची सतत विचारपूस होत असे. एकत्रित जेवणे जेवताना सुसंवाद होता, काळजी, माया , ममता , होती. मनाचा मनाशी गोड संवाद होता अनेकदा न बोलताही एकमेकांच्या मनातील गोष्ट सर्व गोष्टी ओळखायचे . आणि आता मात्र हे सार व्यवहारिक होत आहे. 

माणूस कुठे जात आहे , त्याला नेमक काय हवं आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे.यामुळे माणूस आतल्या आत पोखरला जात आहे त्याला व्यक्त होण्यासाठी , समजून घेण्यासाठी संवाद हरवला आहे. सर्व जण असेच कोरडे , व्यवहारिक वागत आहेत. कोणाची कोणाशीच आंतरिक connectivity राहिली नाही.

ग्रामीण भागात जरा परिस्थिती वेगळी आहे . शेजारी पाजारी मिळून मिसळून प्रत्येक गोष्टीत आनंदाने सहभागी होतात , त्यांच्या सतत चर्चा होतात. ग्रामीण लोकांच्या हातात मोबाईल फक्त कामापुरता आणि अर्जंट कॉल महत्वाचे काम असेल तरच येतो आणि त्यामुळे त्यांची जवळीकता टिकून आहे. 
ग्रामीण भागात महिला पण बऱ्याच जिवलग आणि शहरी भागापेक्षा  छान मनमिळावू दिसतात .एकमेकिंच्या सुख दू: खात सहभागी होतात . कपडे धुताना नदीवर, तळ्या वर जातात. तिथं पण दिलखुलास मनसोक्त गप्पा मारतात . नात्याचा पाया संवादात आहे हे कळतं.
प्रत्येकाच्या जीवनात आचार स्वातंत्र्य, विचार स्वतंत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्या विचारात कोठेतरी आपलेपणा हवा, माणुसकी हवी. गर्दी माणसाची आपल्या भोवती खूप आहे परंतु त्यात आपल मन जिंकतील, मन सांभाळतील, मन ओळखतील अशी माणसं खरोखरच 
दुर्मिळ आहेत आजच्या युगात.

माणसाने स्वत: च्य स्वार्थासाठी जंगले कापली , भरभरून कापली म्हणून कदाचित त्याच्या मनातील हिरवळ मावळली.
माणसाने नदीचे पाणी अडवले त्यामुळे त्याच्या मनातील प्रेमाचे झरे आटले.विशाल समुद्रावर राज्य केले पण त्याच्या स्वतःचा मनात साचलेल डबक तयार झालं. माणसाने चंद्रावर , मंगळावर भ्रमण केले परंतु त्याच्या विचारावर संकुचित पणाचे ग्रहण लागले ते कायमचेच.
गर्दीत माणसाच्या माणूस एकाकी बनत आहे. आणि हाच तो एकाकीपणा माणसाला असह्य आणि जीवघेणा ठरला आहे. अशा वातावरणामुळे माणसाचे अपरिमित भावनिक नुकसान होत आहे . नकारात्मकता वाढत आहे.


गर्दीतला माणूस गर्दीत हरवला

गर्दीतला माणूस गर्दीत हरवला
छंद ना आवडे मनाला तो छंद करपला...    

एकाकीपणा आला त्याच्या वाटेला
आनंद गगनात तो मावेना चांडाळ चौकडीचा........

ना संवाद असे सोबती
ना  निःस्वार्थ असे मैत्री
विसंगती नशिबी विना दोष का हो आली.....

गर्दीत माणसाच्या
आपला माणूस जवळचा
कोणीच किहो दिसेना 
सारे भास हो आभासी 
मृगजळ तृष्णा भागवेना

जवळी असून अमृत  
ते पिता मज येईना
गरज भावनांची 
संपता संपेना

अतृप्त मन आणि भावना
कोणासही समजेना
गर्दीतला माणूस गर्दीत का रमेना
कळ आतल्या जीवाची कोणालाच दिसेना.....

अथांग विचार सागरा त
आले तुफान वारे
खोल विचार भोवऱ्यात 
मन खोल खोल जारे

गर्दीत माणसाच्या 
आपला कोणी असेना
ही शोकांतिका जगाची
ही वास्तविकता मनाची
गर्दीत एकटेपण
पोखरून टाकी मन
प्रांजळ, स्वच्छ, पारदर्शी
कोणी मज मिळेना

गर्दीत माणसाच्या
 कुठे मिळेना किनारा
गर्दीत माणसाच्या 
कुठे मिळेना आधार

गर्दीत माणसाच्या 
आपलेपणा नाही
गर्दीत माणसाच्या
अकृत्रिम प्रेम नाही

गर्दीत माणसाच्या 
माणसे माणसांची शत्रू
माणसेच ओढती पाय
मग काय करी रिपु

गर्दीत माणसांच्या
माणूसपण हरवलं
पशु पेक्षा एक गुण अधिक
सारासार विचार शक्ती
आणि बोलण्याची अभिव्यक्ती
आधुनिक यंत्रामुळे 
तीही लोप पावली

गर्दीत माणसांच्या
आधुनिक गझेट मुळे
निर्जीव वस्तू प्रिय
होत आहे
सजीव वस्तू अप्रिय 
होत आहे
सत्य कथन माझे 
हा हेतू आहे
दुखावणे कुणाला
हा हेतू मुळीच नव्हे

Jayashree Arjun Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे