प्रेमाचे राजकारण Marathi Article

आजकाल प्रेम कमी आणि प्रेमात भावनेचे राजकारणच जास्त दिसून येत आहे. आज प्रेमात खरेपणा नसून दिखावा, वासना, उपभोग याला आपण प्रेम म्हणायला लागलो आहे.

प्रेमाचे राजकारण Marathi Article

प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे ओढ, प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे आपुलकी, प्रेम म्हणजे काळजी या सर्व गोष्टी खऱ्या प्रेमात असतात. एकमेकांना मिळवणं म्हणजे खरं प्रेम नसतच, एकमेकांच्या ह्रदयात आयुष्यभर घर करून राहणं म्हणजे खरं प्रेम होय. कोसो मैल दूर असूनही आठवण आली की दोघांचेही डोळे भरून येणं म्हणजे खरं प्रेम. परंतु आजकालच्या लोकांना प्रेमाची परिभाषाच बदलून टाकली आहे.

आजकाल प्रेम कमी आणि प्रेमात भावनेचे राजकारणच जास्त दिसून येत आहे. आज प्रेमात खरेपणा नसून दिखावा, वासना, उपभोग याला आपण प्रेम म्हणायला लागलो आहे. आज प्रियसीला किंवा प्रियकराला सोना, बबड्या, पिल्लू, टिल्लू अशा उपमा देऊ लागले आहे. त्यालाच आपण खरं प्रेम म्हणतो, मग त्यावेळी एकमेकांविषयी किती आदर आहे. किती काळजी आहे. हे कोणीच बघत नाही. त्यामुळे प्रेमाचे रूपांतर हल्ली 'अफेयर'मध्ये झालेले दिसून येत आहे. प्रेम ही नितळ आणि निस्वार्थ भावना आहे. पण हल्ली तरूण तरूणी त्यातही राजकारण करू लागले आहे. ही मोठी शोकांतिका म्हणतात येईल. अशीच एक प्रेमाची कळी अमित आणि वेदिका यांच्यात उमलली. वेदिका ही साधी भोळी असल्यामुळे तीला माहित नव्हते, तीचं प्रेम तिला कोणत्या रस्त्यावर आणून सोडेल.

म्हणतात ना! महिलांना अक्कल नसते, तीची अक्कल गुडघ्यात असते. पण महिला या कुठंलही नातं बुध्दीने नाही तर मनाने जोडतात आणि निभवतात. तरी आपण त्यांनाच मूर्खात काढतो. त्यामुळे त्याचा त्रास त्यांनाच जास्त होतो. कर्तव्य, जबाबदारी, पुरूषप्रधान संस्कृती यामुळे ती एकविसाव्या शतकातही मोकळा श्वास घेऊ शकत नाही. 

वेदिका चांगल्या परिवारातील सुसंस्कृत मुलगी. तीला आई वडील नव्हते. लहानपणापासून तीचा आणि तिच्या बहीणीचा सांभाळ तिच्या काकांनी केला. वेदिकाचे लग्न झाल्यानंतर तिची बहीण देविका तिच्याकडेच राहायला आली. लग्नानंतर वर्षाभरात तिला मुलगी झाली. वेदिकाची सासरची परिस्थिती साधारण असल्यामुळे ती व तीचे पती दोघेही नोकरी करायचे. 

पण थोड्याच दिवसानंतर वेदिकाचे आणि तिच्या पतीचे त्याच्या व्यसनामुळे वाद सुरू झाले. आणि दिवसेंदिवस ते वाद वाढतच गेले. वेदिकाची बहीण तिच्या मुलीला सांभाळायची, वेदिका तिच्या पतीच्या व्यसनामुळे त्रस्त झाली होती. तो नोकरी देखील करत नव्हता, त्यामुळे ती खुप तणावात राहायची, पण काय करणार बहिणीची आणि मुलीची जबाबदारी तिच्यावरच होती. 

एकटीची कमाईमध्ये ती कसाबसा उदरनिर्वाह चालवायची. अशा परिस्थितीमध्ये तिची ओळख अमित नावाच्या तरूणासोबत झाली. अमित शिकलेला आणि चांगल्या नोकरीवर होता. त्याचे प्रेमळ बोलणं बघून दोघांची मैत्री झाली. काही दिवसातच अमित वेदिकाला म्हणाला तू मला आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण वेदिकाला तिची जबाबदारी व कर्तव्य माहीत होते. त्यामुळे तीने त्याला सुरूवातीला नकार दिला. कारण वेदिका विवाहीत होती. आणि अमित अविवाहित होता. वेदिकाने अमितला सर्व सत्य परिस्थिती सांगितली. तरी अमितने सांगितले मी तुला साथ देईल. माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. वेदिकालाही आधार हवा होता. त्यामुळे वेदिकाच्या मनात देखील प्रेम फुलले. दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले, एकमेकांना साथ देऊ लागले. वेदिकाचे टेंशन कमी झाले होते. तीही आनंदात जीवन जगू लागली. कारण अमित तिच्या बहीणीची आणि मुलीची देखील काळजी करायला लागला होता.

वेदिकाच्या नवऱ्याला परिवारासोबत काहीही घेणेदेणे नव्हते. तुम्ही खा किंवा उपाशी रहा; त्याला काहीच काळजी नव्हती. अमितने एक दिवस वेदिकाची त्याच्या परिवारासोबत ओळख करून दिली. आणि परिवारात दोघांच्या नात्याविषयी माहिती दिली. आणि म्हणाला मी वेदिकासोबत लग्न करणार आहे. वेदिकालाही बहीण व मुलीशिवाय कोणीच नव्हतं. नवरा निष्काळजी होता. त्यामुळे वेदिका लग्नाला तयार झाली. पण ती स्पष्ट बोलली तुला माझ्या बहिणीचा आणि मुलीचा सांभाळ करावा लागेल. त्यावर अमित हो बोलला. मग वेदिका नवरा सोडून एकटीच राहायला लागली. मुलगी, बहीण व वेदिका त्यांच्यावर अमित लक्ष ठेऊ लागला. त्यांना काय आहे काय नाही विचारू लागला. वेदिकाचा अमितवर खुप विश्वास होता. 

जवळपास एक वर्ष झाले. मग वेदिकाची मैत्रीण एक दिवस अमितला म्हणाली तुम्ही वेदिकासोबत लग्न कधी करणार आहात. तेव्हा अमितचे उत्तर ऐकून वेदिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. अमित म्हणाला माझा एक मित्र आहे. तो खुप श्रीमंत आहे. मी वेदिकाचे लग्न त्याच्यासोबत लावून देणार आहे.  हे ऐकून वेदिका दायमोकळून रडली. ती म्हणाली मी, माझी मुलगी व माझी बहीण आम्ही राहतो तू जा! तुझी गरज नाही मला. मी इतकं जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर आणि तू माझं लग्न दुसऱ्यासोबत लावायला निघाला. गोड बोलून अमितने तिची समजूत काढली. तिचे अमितवर प्रेम असल्यामुळे तीनेदेखील तो विषय सोडून दिला. खरं तर वेदिकाला त्या दिवशी त्याच्या नालायकपणाचा इशाराच त्याने दिला होता. परंतु वेदिका त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होती. आणि त्या आंधळ्या प्रेमात दिला काहीही दिसत नव्हते.

अतिप्रेमामुळे वेदिका त्याच्याकडे लग्नाचा हट्ट धरू लागली. मग मात्र अमितकडे आता काहीही उत्तर नव्हते. वेदिकाला टाळावं कसं हे अमितला काही समजेना. मग अमितने वेदिकापुढे एक अट ठेवली. तू तुझ्या बहीणीला काकाकडे पाठव. आणि मग मी तुझ्याशी लग्न करेल. वेदिका आता मात्र खूपच खचली होती. कारण तीला बहीण आणि मुलीशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. आणि ती आईपणाला धोका देऊ शकत नव्हती. आणि अमितला सोडणं पण कठीण होतं. आता मात्र वेदिका खुप मोठ्या धर्म संकटात अडकली होती. काय करावं तिला काहीच कळेना. मग मात्र तीने अमितला स्पष्ट सांगितले. मी बहीणीला आणि मुलीला सोडू शकत नाही. आता तर अमितला कारणच झाले होते. अमित वेदिकाला काहीही न सागंता सोडून गेला.

वेदिका खूप खचली होती. पण मुलगी आणि बहिणीकडे पाहून ती तिची जबाबदारी पार पाडत राहिली. असं करत पाच वर्षे गेली पण ना अमित आला ना त्याचा फोन. वेदिकाने एवढे जीवापाड प्रेम करून देखील अमितने तिच्यासोबत प्रेमाचे राजकारण केले. तीने मात्र नातं जीवापाड जपलं. पण अमितने तिला धोका दिला.

आजही आपल्या अवतीभवती अमितसारखे शिकारी, हे शिकारीच्या शोधात असतात. त्यामुळे अनेक दुःखी कष्टी तरूणी त्यांच्या जाळ्यात अडकतात. वेदिका ही आपल्या मुलगी व बहीणीच्या प्रेमामुळे वाचली. अन्यथा तीचे अस्तित्व अमितने केव्हाच संपवून टाकले असते. त्यामुळे भावनेचे राजकारण करणाऱ्या अशा अमितपासून नेहमीच सावध राहिले पाहिजे. 

Sanjivani Ingale

संजिवनी इंगळे, औरंगाबाद