कौमार्य मराठी Article

समाजात आजही मुलींना कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं, पवित्रतेचा पुरावा पहिला रात्री मिळाला नाही तर तिचा मानसिक कोंडमारा, अपमान सहन करावा लागतो.

कौमार्य मराठी Article

समाजात आजही मुलींना कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं, पवित्रतेचा पुरावा पहिला रात्री मिळाला नाही तर तिचा मानसिक कोंडमारा, अपमान सहन करावा लागतो. आजही अशा घटना समोर येत नसल्या तरी कथेतील नायिका राधा अनेक ठिकाणी आहे. काही जणी परिस्थितीला तोंड देत यशस्वी होतात तर काही जणींचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यातून घटस्पोट, कौटुंबिक वाद या गोष्टी घडतात. अशीच नायिका कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कथेतील पात्र पुढीलप्रमाणे आहेत. नायिका-राधा, मुलगी-प्रीती, पती-मनोज, नणंद- स्वाती, इतर पात्र-आई वडील, सासू- सासरे

आज राधाचं मन कशातच लागत नव्हतं. प्रीतीचा फोन आला का ते दहा वेळेस तपासून झाले. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. आई निकाल लागला, "मी कलेक्टर झाली" हे शब्द ऐकल्याबरोबर राधाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला बोलताही येत नव्हतं, तिने स्व:ताला सावरून कशीबशी बोलली, "अभिनंदन बेटा कष्टाचं चीज केलं." आणि फोन बंद केला. ती कॉटवर बसली उरात जो हुंदका दाबून ठेवला ते दुःख आक्रोशाने बाहेर पडले आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली. तिचा स्वाभिमान, 'स्वत्व' कुठेतरी हरवून कोणतीही चूक नसतांना अपराध्यासारखी वागत होती. अवहेलना, अपमानाची धग सोसत होती. संसार सुखाचा करण्यासाठी  पंचवीस वर्षापासून आनंदाच उसणं अवसान आणून ती जगत होती. आजही पंचवीस वर्षापूर्वी उंबरठा ओलांडून आलेली ती नववधू स्वच्छ आरशाप्रमाणे आठवत होती.
                 
मनोजचं स्थळ सुशिक्षित व संस्कारी घर म्हणून बाबांनी लग्न ठरवले तेव्हा मी बारावीची परीक्षा दिली होती. मी दिसायला सुंदर चारचौघीत उठून दिसणारी त्यामुळे कॉलेजला ऍडमिशन घेतानाच आईने समज दिली होती. परपुरुषाशी बोलायचं नाही, कॉलेजचे घर कुठे भटकायचे सलवार पायजमा व अंगभर ओढणी असा पेहराव घालत मान वर न करता अब्रू इज्जत या शब्दांनी इतकं जखडून ठेवलं की मुक्तपणे वावरले नाही. वडील शेतकरी त्यात आम्ही तिघी बहिणी होतो. दोन बहिणींची लग्न झाली होती. भाऊ शिक्षण घेत होता. शेतकरी बापाला मुलींचं लग्न म्हणजे तारेवरची कसरत त्यांची आर्थिक ओढाताण बघून असं वाटायचं मुलगी म्हणून शेतकऱ्याच्या घरात जन्मास येऊ नये. मी बाबांना समजवण्याचा प्रयत्न केला, "मला शिक्षण पूर्ण करू द्या मी नोकरीला लागल्यानंतर लग्न करते" पण तरुण मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर त्यांचा मुलींवर विश्वास होता पण जगावर नाही. त्यात शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी जायचं त्यामुळे त्यांनी माझं ऐकलं नाही. लग्न ठरल्यानंतर मी रडत बसले तेव्हा आईने डोक्यावरून मायेनं हात फिरवत म्हणाली,"तू शिकावं मोठी व्हावं असं आम्हाला वाटत नाही का? पण अब्रू म्हणजे काचेचं भांड तडा गेला तर जोडत नाय माझी बाय असं म्हणून प्रेमानं माझ्या तोंडावरून हात फिरवला.
       
सप्तपदी चालतांना सात जन्माच्या बंधनात अडकले. पती परमेश्वर हे संस्कार रुजवल्याने तेव्हाच तन मन अर्पण केले. नवरी सुंदर आहे म्हणून खूप कौतुक झाले, सासु सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. गृहप्रवेश करताना सुंदर संसाराचे स्वप्न घेऊन माप ओलांडून घरात आले. दोन भाऊजी, जावा, नणंदा, भाचे यांनी घर भरलेले होते दोन दिवसांनी सत्यनारायण पूजा करून परत मुळास माहेरी निघाले तेव्हा मनोजने डोळ्याने इशारा करून रूममध्ये बोलवले मी सर्वांच्या नजर चुकून रूममध्ये जाताच त्याने दरवाजा लावला. मी भिंतीला टेकले त्याने मला बाहूच्या पिंजर्‍यात अडकवून माझ्या ओठांवर ओठ ठेवले मी लाजेने लालबुंद झाले व बाहेर पळाले त्यांच्या नजरेत स्पर्श सुखाची मधु मिलनाची आस दिसली.
      
दोन दिवस आईच्या सहवासात तिने संस्कारांची उजळणी केली. आता सासरचं तुझं घर आहे, "प्रेमानं माणसं आपलेसे कर." आता मला कळून चुकलं ह्या घराला मी कायमची पारखी झाले. सासरी आल्यानंतर आज स्वयंपाक घरात माझा पहिलाच दिवस असल्याने सासूबाईंनी मला भाजी करण्यास सांगितले. गृहप्रवेशानंतर माझी परीक्षा सुरू झाली होती. रात्री जेवण करतांना माझ्या स्वयंपाकाची तारीफ झाली. मी मनोमन सुखावले, चला..! पहिला पेपर पास झाले... रात्री बेडरूममध्ये नणंदा व मित्रपरिवार यांचा चेष्टा मस्करी हसण्याचा आवाज येत होता. स्वातीताई मला बेडरूममध्ये घेऊन आल्या,"वहिनी बेस्ट ऑफ लक" म्हणत हसत बाहेर गेल्या. आयुष्यातील मधुचंद्राची रात्र दोन अनोळखी जीवांचं मिलन एकमेकात एकरूप होऊन संसारिक जीवनास प्रारंभ होणे. मनोजने प्रेमाने मला बघितले व त्याच्या मिठीत मी सामावून गेले. सकाळी उशिराच जाग आली ते दरवाज्याच्या आवाजाने मी घाई घाई उठले तोवर मनोज खाली गेले. मी बेडशीट व्यवस्थित केले, सासूबाई आत आल्या माझं लक्ष सासूबाईंकडे गेले तर त्या बेडशीटवर काहीतरी न्याहळतांना दिसल्या तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकला तसा माझा थरकाप झाला, माझं काय चुकलं मला समजेना. मी नजर चुकवत खाली गेले.
         
हॉलमध्ये सर्वजण जमा झाले. सासुबाई तावातावाने बोलत होत्या,"उष्ट्या पत्रावळीवर मनोज जेवला वाटतं." कुठे तोंड काळे केले असेल देव जाणे. पूर्वी आपल्या जातपंचायतीत नववधू पवित्र नसली तर लगेच सोडचिठ्ठी देत असत. तेवढ्यात स्वातीताई म्हणाल्या, "सुशिक्षित म्हणवतेस आणि असा विचार करतेस,"असं काही नसतं. जावांची नजर बदलली त्यांच्या नजरेत मी अपमानित झाले. खरंच, स्त्री पवित्र अपवित्र असते का? निसर्गाने सृजनशीलतेचा हक्क भावना दिलेल्या असतांना तिला पावित्र्य व पवित्र्यावर तोलायचं का? मी विचार करू लागले, कोमार्य परीक्षेत मी नापास झाले. आता मानहानी अपमान तिरस्कार आयुष्यभर सोसावं लागेल का? तेही माझी काही चूक नसतांना! या विचारांनी मी कोलमडली. मनोज काय प्रतिक्रिया देतात यावर माझा आत्म स्वाभिमान घरातील स्थान अवलंबून होते.
         
मनोज हॉलमध्ये आले. घरातील वातावरणावरून त्यांना अंदाज आला काहीतरी बिघडले, काय झालं? तसं सासुबाई बोलल्या, "तुझी नाजूक सुंदर बायको कोरी नाही, "हे तुझ्या लक्षात आलं नाही का? ते गडबडले काही न बोलता घराबाहेर गेले. आतल्या मला आईच्या बोलण्यातील काळजी अब्रू म्हणजे काचेचे भाडं काय ते समजायला लागलं, मी रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि विचार करू लागले खरंच! स्त्री शिकून मोठी क्षेत्र पादाक्रांत करून उच्च पदावर आहे ती मुल, घर सांभाळते तरी तिला आदर सन्मान मिळतो येतो का? ती मनमोकळेपणाने हसली, परपुरुषाशी बोलली तरी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. एक वस्तू नवी कोरी असली की तिला किंमत आणि ती वापरून झाल्यानंतर किंमत नाही. माझं मात्र मी नवं खेळणं असून सुद्धा काही कारणास्तव कोरे पण सिद्ध करू शकले नाही म्हणून मला वस्तूसारखं भिरकावलं जाईल का? स्त्रीचा मान, सन्मान, आदर तिच्या पवित्र्यावर ठरतो का? असे प्रश्न माझ्या बालिश बुद्धीला पडले कशाचाच ताळमेळ लागेना मी सैरभैर झाली.
            
मनोजनं मला स्वीकारले परंतु कोरेपण सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांच्या नजरेत प्रेम सन्मान कधीच दिसला नाही. संधी मिळेल तेव्हा सासुबाई टोचून बोलायच्या कोण्या पुरुषाशी बोलले तर संशयाने बघायच्या चार भिंतीत स्वत्व नसलेली मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायची, पण मी पवित्र आहे. हे आयुष्यभर दाखवण्याचा प्रयत्न केला तरी मी पास होणार नव्हते, मला मुलगी झाली, आई झाल्याने मातृत्व मिळाले पण त्याच दिवशी मी ठरवले माझ्या मुलीला समाजात इतकं उच्च स्थानावर बसवेन की तिला कधीच अपमानित व्हावं लागणार नाही.  आणि आई म्हणून तरी माझा सन्मान मिळवेन. माझे स्वप्न तिच्यात रुजवत होते, तिला घडवत होते. आणि आज अभिमानाने माझी मान उंच झाली होती.

Manisha Kandalkar

सौ. मनीषा शंतनु कांदळकर,
मु. पो. ता. येवला, जि. नाशिक