आम्ही बदलतोय; तुमची साथ आहे का?

माझ्या या विचारांना माझे वडील व मिस्टर यांची अनमोल साथ आहे. या दोघांमुळे आज माझे विचार मी मांडू शकत आहे. माझ्या मावशीमुळे एक विचार आलाय आम्ही हळूहळू बदलतोय

आम्ही बदलतोय; तुमची साथ आहे का?

गेल्या महिन्यात माझ्या काकांचे हार्ट अटॅकने निधन झाले. वय वर्षे ७५. अत्यंत प्रेमळ, भावूक माणूस. मी, आईवडील, बहीण भाऊ मावशीला भेटायला तिच्या घरी गेलो. आम्हांला
बघताच मावशीला प्रचंड रडू कोसळले. दुःख आवेग ओसरल्यावर माझं लक्ष मावशीच्या कपाळाकडे गेलं. मनातून खूप बरं वाटलं. काका जाऊन पाच दिवस झाले होते. मावशीने कपाळावर टिकली लावली होती. थोड्या वेळाने मावशीने आम्हांला विचारलं,

 "मी टिकली लावली तर चालेल ना तुम्हांला? "आम्ही तिला हो म्हणालो. मग ती सांगू लागली "तुझे काका गेल्यावर शेजारच्या बायका आल्या होत्या शेवटचं कुंकू लावा आता हिच्या कपाळावर. हिच कुंकू गेलं. आणि कार्याच्या दिवशी तर म्हणाल्या टिकली काढा आता. मला मेल्याहून मेल झालं. वाटलं की आपण मेलो असतो तर बरं झालं असतं. या सगळ्या रूढी परंपरा यातून सुटका झाली असती. पण माझी सून पुढे आली तिने सगळ्यांना निक्षून सांगितले. त्यांची टिकली काढायची नाही. एक बाई नवरा जाण्याने आधीच दुःखी असते आणि बाकीचे तिला तिच्या अंगावरील दागिने काढण्याच्या मागे असतात. सगळ्या बायकांनी माघार घेतली आणि मी टिकली कपाळावर ठेवली." मावशी म्हणाली की, मला काकांची आठवण म्हणून टिकली लावायची आहे. मग मी समाजाचा का विचार करू?

मावशीच्या या विचारांनी मला विचारात पाडलं. खरंच एखाद्या बाईचा नवरा जाण्यात तिचा काय दोष असतो? काय गुन्हा असतो तिचा? आधीच दुःखाचा डोंगर त्यात रूढी पाळण्यासाठी सर्व दागिने काढून ठेवायचे. नटायचे नाही. अगदी निराश चेहऱ्याने जगायचं. कोणतं पाप केलेलं असतंय तिने की तिला हळदीकुंकू या सारख्या कार्यक्रमातून वगळलं जातं? देवाच्या पूजेसाठी बाजूला सारलं जात. असे कितीतरी सण आहेत ज्यात त्यांना घेतलं जात नाही. कारण सण म्हटलं की हळदी कुंकू आलेच. मग अशा महिलांना टाळलं जात. विधवा होणं शाप ठरते अशा महिलांना. कारण सणाच्या दिवशी ना त्यांना बाहेर पडता येत ना मिरवता येत. 

नुसती घुसमट होते त्यांच्या मनाची की असं का? जणू बाईच बाईची शत्रू झालेली असते. नवरा जाण्याचं दुःख ती पचवते, विसरू पहाते, पण आजूबाजूचा समाज एक विधवा म्हणून तिला वेगळी वागणूक देऊन तिला तिच्या दुःखाची जाणीव पदोपदी करून देत असतो. त्यातल्या त्यात महिलाच जास्त असतात. मला कोणावरही राग आहे किंवा रूढी मोडीत काढायच्या आहेत म्हणून मी हे लिहीत आहे असं नाही तर मला असं मांडायचे आहे की अशा रूढी काय कामाच्या ज्यामुळे एक बाई सणासुदीचा आनंद घेऊ शकत नाही. जरा तिच्या मनाचा विचार व्हावा. किती दुःख होत असेल तिला?  असं मला मनोमन वाटतं. काही महिला वासनांध नजरांपासून वाचण्यासाठी टिकलीचा आधार घेतात. बरोबर आहे त्यांचे. वेगळा विचार करणाऱ्या बऱ्याच जणी मी पाहिल्या  आहेत. अगदी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन आपल्या मैत्रिणींना आवर्जून बोलावणाऱ्या. पण अगदी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या. काही महिला अगदी बोल्ड आहेत. नवरा गेल्यावर सगळे दागिने घालतात, टिकली लावतात. पण आपल्या समाजाचं दुर्दैव इतकं की त्यांच्याकडे सुद्धा वाईट अर्थाने बघितलं जात. माझ्या मते हे कोणीतरी थांबवायला हवयं. मग आपल्यापासून सुरुवात व्हायला हवीय. नवरा गेल्यावर तिच्या शारीरिक भुकेपेक्षा तिला आत्मसन्मानाची गरज जास्त असते. आणि ती सुद्धा नाकारली गेली तर ती खचून जाते. तिला दया म्हणून नव्हे तर तिचा आनंदाने जगण्याचा हक्क म्हणून तिला आत्मसन्मान देऊयात. 
      
हे वाचणारे पुरुष वर्ग असेल तर त्यांनीही आपली आई, बहीण, आणखीन घरातील इतर महिला कोणी असेल तर तिच्या मनाचा विचार करा. कपाळाकडे बघा. तिची कुंकू, टिकली लावायची वर्षानुवर्षाची सवय क्षणात मोडायला लावून तिच्यावर अन्याय करायचा का? 
तिचा चेहरा निस्तेज दिसतो तो आपणच फुलवूयात. फक्त एक बदल करुन. 
       
माझ्या सासूबाई जुन्या विचारांच्या. माझे सासरे गेल्यावर बरेच दिवस कुंकू लावत नव्हत्या. मग त्या सत्संगला जायला लागल्या. त्यात एकदा त्यांनी ऐकलं की लग्नाच्या आधी तुम्ही कुंकू लावत होतात ना मग आता का नाही लावत? त्यांना ते पटलं असावं. पण प्रश्न होता की कोण काय म्हणेल. एकदा त्यांनी मला हळूच विचारलं की, मी कुंकू लावलं तर तुला चालेल का? मी त्यांना म्हटलं खुशाल लावा आणि कोणी विचारलं तर सांगा सुनेने सांगितले आहे म्हणून. त्या कुंकू लावल्या की खूप आनंदी, प्रसन्न दिसतात. म्हणजे त्या आनंदी तर घर आनंदी आणखी काय हवं. आता घरातील कोणतंही चांगलं काम असेल तर मी त्यांना पहिला  मान देते. पूजन करायला सांगते. त्यांना खूप आनंद वाटतो. असं प्रत्येकाने जर वागलं तर प्रत्येक घर आनंदी होईल. 
      
तरीही सासूबाईंना  मी दागिने घाला असं नाही सांगू शकले. ती उणीव मी मावशीला सांगून पूर्ण केली तिला सांगितले की टिकली तर असू दे. पण तुला काकांची आठवण म्हणून मंगळसूत्र घालायचं असेल तर ठेव गळ्यातच आणि जोडव्या सुद्धा. माझी आई आणि बहिणीने सुद्धा याला पाठींबा दिला. मावशी म्हणाली,"मला हेच म्हणायचं होत की नवऱ्याची आठवण म्हणून तरी मला हे सगळं घालायचं आहे. आता मी तुमच्या अशा विचारांमुळे घालेन. त्यांची (काकांची) पण अशी इच्छा होती की त्यांच्या नंतर मी आठवणीच्या रूपात माझ्या सोबत राहावं.

असा विचार करून स्वतःच्या दुःखात समाजाला एक आदर्श घालून देणाऱ्या माझ्या मावशीला,  तिला खंबीर साथ देणाऱ्या तिच्या सुनेला अनेक  सलाम आणि जगातून जाऊन एक वेगळा विचार देऊन मावशीला सन्मानाने जगायला देणाऱ्या काकांना मनापासून लाखो  लाखो धन्यवाद...

माझ्या या विचारांना माझे वडील व मिस्टर यांची अनमोल साथ आहे. या दोघांमुळे आज माझे विचार मी मांडू शकत आहे. माझ्या मावशीमुळे एक विचार आलाय आम्ही हळूहळू बदलतोय; तुमची साथ आहे का या विचारांना?

Jayshree Avinash Jagtap

सौ. जयश्री अविनाश जगताप, सातारा