जग एक नाट्यपट आहे आणि आपण सर्वजण या नाटकात आपली आपली भूमिका सादर करत आहोत. हे सत्य एकदा का आपल्या लक्षात आले की, जीवन आपोआप सहज आणि सरळ होत जाते.
जर जीवन खरोखरच एक नाटक आहे आणि आपण सर्वजण या नाटकातले पात्र तर मग ह्या नाटकाचा डायरेक्टर ही कोणीतरी नक्कीच असेल आणि डायरेक्टर म्हटला की,, कोणाला कोणते पात्र द्यायचे हे ठरवणारा. म्हणूनच आपल्याला मिळालेली प्रत्येक जबाबदारी म्हणजे आपली पात्रता बघून आपल्याला मिळालेली एक भूमिकाच म्हणावी लागेल.
नाटकात काम करत असताना जो कलाकार जितक्या जास्त प्रमाणात त्याच्या भूमिकेशी समरस होतो त्याचाच प्रभाव इतर लोकांवर अधिक पडतो. याचा अर्थ जीवनाच्या नाट्य पटावर आपल्याला जी भूमिका मिळाली आहे त्याच्याशी आपण किती प्रमाणात प्रमाणिक आहोत यावर आपली प्रगती व जीवनाचा आनंद ठरलेला असतो.
आपल्याला मिळालेली भूमिका ही आपली पात्रता बघून आधीच निश्चित झालेली असते . तरीदेखील आपल्यापैकी अनेक जण इतरांना मिळालेल्या भूमिकेकडे जास्त आकर्षित होण्यात आपला वेळ वाया घालत असल्यामुळे स्वतःकडे वेळ देण्यासाठी वेळच उरत नाही. थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात नक्कीच येईल की ,जी वेळ आपण इतर लोकांशी आपली स्वतःची तुलना करण्यात वाया घालवत आहोत तीच वेळ तर आपण आपल्यामध्ये असलेल्या क्षमता ओळखण्यासाठी दिली तर आपल्यामध्ये अनेक असे बदल आपण स्वतः घडवू शकतो ज्यामुळे आपल्या स्वतःबरोबर इतरांचे जीवन देखील आनंदी बनू शकते.
प्रत्येक नाटकात वेगवेगळी भूमिका करणारे वेगवेगळे पात्र असतात. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणीच कोणाशी कोणाची तुलना करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने फक्त आणि फक्त आपली भूमिका प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न केला तर जीवन खरोखरच खूप सुंदर आहे. याचा अनुभव प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही.
ज्याप्रमाणे फुले, झाडे ,वेली, पक्षी, पर्वत, आपल्या आपल्या भूमिकेशी एकरूप आहेत त्याप्रमाणेच आपल्याला देखील आपल्या भूमिकेशी एकरूप होता यायलाच हवे,, यातच जीवनाचा खरा आनंद आहे. हा लेख वाचून समाजात आपली भूमिका काय आहे आणि आपण त्याच्याशी किती समरस आहोत याबद्दल नक्कीच विचार कराल...!!
पुनम सुलाने