अखंड साथ तुझी माझी

आज त्यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा करताना रिनाला या साऱ्या गोष्टी आठवत होत्या.पत्रिका पाहण्यावर विश्वास ठेवणं चुकीचं असतं हे तिला पटलं होतं. 

अखंड साथ तुझी माझी

बी. ए. ची परीक्षा संपल्यामुळे   रीना  आनंदात होती. घरात आई -वडील तिची वाट पाहत होते. मामा  आला होता. रीनासाठी स्वतःच्या मुलाचं स्थळ घेऊन.  आईलाही आवडलं होतं हे स्थळ. मुलगा राकेश समजूतदार होता. नोकरीला  होता. रीनाही  दिसायला सुंदर होती. स्वयंपाकात हुशार होती. ती घरी येताच  आईवडिलांनी तिला जवळ बसवून  मामाचा लग्नाचा प्रस्ताव सांगितला. ती खूपच खुश झाली.  तिला आकाश ठेंगणे वाटू लागले. तिने हसून  होकार दिला.मामालाही आनंद झाला. 

रीनाला तिच्या लहानपणापासूनच्या घटना आठवू लागल्या. ती जेव्हा  मामाच्या घरी जायची तेव्हा राकेश आणि ती भरपूर खेळायचे, भांडायचे. कळत्या वयापासून ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. आता तोच जीवनसाथी बनणार म्हणून ती जाम खुश झाली होती. लग्नाची बैठक झाली . मामानं काहीच हुंडा वैगेरे घ्यायला नकार दिला. 2 महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली. भांडी, दागिने, साड्या, कपडे खरेदी आनंदात चालू झाली. 

रीनाच्या वडिलांच्या अचानक काय डोक्यात आलं कोण जाणे? त्यांनी रीना व राकेशच्या पत्रिका ज्योतिषाला दाखवल्या. ज्योतिषाने लग्नानंतर रिनाला मृत्यूयोग आहे असे सांगितले. वडिलांचा यावर विश्वास नव्हता. पण मुलीच्या जीवासाठी त्यांनी काळजावर दगड ठेवून कोणाला काहीही न सांगता लग्न मोडून टाकले. वडिलांना वाटले की दुसऱ्या मुलाबरोबरची पत्रिका जुळेल आणि रीनाचे लग्न होईल. तोपर्यंत लग्नाची तयारी अर्धी झाली होती. रिनाने शालू, साड्या खरेदी करून ब्लॉऊज सुद्धा शिवायला टाकले होते. ती वडिलांच्या निर्णयाने शॉक झाली होती. तिला राकेशचा फोन सुद्धा आला की असे काय झाले आहे की अचानक लग्न मोडले? तिने तिला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. तिच्या मनात आलेला आवंढा राकेशला जाणवला होता. पण कोणाचाच इलाज चालेना. रिनाचे वडील कोणाचेच ऐकत नव्हते. 

इकडे राकेशची आई या सर्व प्रकाराने अस्वस्थ झाली होती. तिने कोणालाही न विचारता राकेशसाठी दुसरी  मुलगी बघून लग्न ठरवून आली होती. तिला ठरलेल्या तारखेला राकेशचे  लग्न करायचं होतं. राकेशच दुसरीकडे लग्न ठरलं हे ऐकून रीनाचं मानसिक संतुलन ढासळलं. ती वेड्यासारखी वागू लागली, बडबडू लागली. वारंवार कपाट उघडून शालू व साड्या बघू लागली. शालू नेसून नटून शेजारच्या बायकांना हाका मारू लागली. या माझ्या साड्या बघा. माझ्या लग्नाला या. असं बरळू लागली. रीनाच्या आईची अवस्था केविलवाणी झाली होती. तिचं घरात काहीच चालत नव्हतं. ती रिनाला धीर देऊ लागली. 

दवाखाना, औषधपाणी सगळं झालं पण रिनाला काहीच फरक पडत नव्हता.  रिनाची तब्बेत खूपच बिघडली. तिचं बडबडणं अहोरात्र चालू असायचं. शेवटी डॉक्टरांनी झोपेच्या गोळया सुरु केल्या. तर झोपेतही रीना लग्न आहे चला चला असं म्हणू लागली. तिने खाणे पिणे बंद केले. सलाईन चालू होते. ती अशक्त अगदी सापळा झाली होती. तिला चालायला, बोलायला  सुद्धा येईना. नुसती दवाखान्यात अंथरुणात  जणू शेवटच्या घटका मोजत होती. डॉक्टरांनी आईला सांगितले की तिला शॉकमधून बाहेर काढायला हवे. नाहीतर ती जगणार नाही. एवढं ऐकल्यावर रिनाच्या आईनं एक धाडसी निर्णय घेतला. तिने राकेशला दवाखान्यात बोलावून घेतलं व रिनाची अवस्था दाखवली. त्याला लग्नाबाबतचा निर्णय विचारला. त्याचा रिनाशी लग्न करण्याच्या निर्णय ठाम होता पण त्याला कोणीच साथ देत नव्हतं.       

तो हलकेच रिनाच्या बेड जवळ गेला. त्याने हलकेच रीनाचा हात हातात घेतला व म्हणाला, "रीना ऊठ ग आपलं लग्न आहे. तू लवकर बरी हो. "आणि काय आश्चर्य रिनाने डोळे उघडले. ती मनापासून हसली. फक्त डोळ्यातून अश्रूरूपाने हो बोलली. त्या दिवसापासून तिच्या तब्बेतीत सुधारणा झाली. पंधरा दिवसातच ती अगदी ठणठणीत पूर्वीसारखी झाली. प्रेमात ताकत असते म्हणतात ते खोट नाही. अगदी नवरीसारखीच दिसू लागली.  राकेशने सुद्धा स्वतःच्या आईला समजावून सांगून दुसरीकडे ठरलेले लग्न मोडून रिनाशी लग्न केले. आयुष्यभराची अखंड साथ देण्यासाठी. 

आज त्यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा करताना रिनाला या साऱ्या गोष्टी आठवत होत्या.पत्रिका पाहण्यावर विश्वास ठेवणं चुकीचं असतं हे तिला पटलं होतं. 

Jayshree Avinash Jagtap
सौ जयश्री अविनाश जगताप. 
सातारा