आताशा मानवाच्या बुद्धीवर टक्केवारीचे घोडे स्वार झाले आहेत, आपल्या पाल्यास ९९% गुण असावे असे प्रत्येक पालकास वाटते. त्यासाठी ते कोणत्याही अग्नी दिव्यातून जाण्यास तयार असतात. परीक्षा शैक्षणिक नसून प्रतिष्ठेचीच आहे, अशी त्यांची मानसिकता झालेली दिसून येते. सर्व सुख सुविधा देऊन वाटेल ती मुलाची इच्छा पूर्ण करून स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात घडवून टक्केवारी किंवा बौद्धिक क्षमता वाढवता येत नाही. हा विचार त्यांच्या बालिश बुद्धीला स्पर्शला नाही, याचे मनोमन वाईट वाटते. आपल्या आडमाप अपेक्षांच्या ओझाखाली ही खुलणारी कमळे निर्दयीपणे तुडवली जात आहेत याचं मात्र तीळ मात्र हे भान त्यांना नाही ही बाब चिंतेची आहे. जिकडे तिकडे प्रतिष्ठेचा बँड बाजा वाजत आहे.
टक्केवारी कमी असलेल्या मुलांचे मानसिक खच्चीकरण होऊन न देता हार पचवण्याची शक्ती, क्षमता, ताकद सकारात्मकता ही संस्कारबीज त्यांच्यात जर बालवयापासूनच रुजवली गेली तर हीच मुले जीवनाचा हिरवागार मळा माळ रानातही फुलवतील यात दुमत नाही. अपेक्षांच्या ओझ्याखाली वाढणारी मुले भावनाशून्य समाज घातक बनतात. मायेचा ओलावा हळवा स्पर्श प्रेमाची हिरवळ या मुलांना माहीत नसते. रेसमधील घोड्याप्रमाणे फक्त धावत राहणे अपेक्षांचा चाबूक त्यांच्या अंतर्मनावर क्षणक्षण फटका रे मारून घायाळ करत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल जाहीर झाला मुले आपल्या परिश्रमाप्रमाणे उत्तीर्ण झाली तेव्हा डोळ्यात पाणी आणणारी एक घटना दृष्टीस पडली. जाहीर झालेल्या निकालावर चर्चा करण्यास मंडळी पारावर जमली. त्यात सरपंचाचा मुलाचाही समावेश होता.
आपल्या मुलाला आपल्या मनाप्रमाणे टक्केवारी आली नाही म्हणून सरपंच नाराज होऊन बसलेले होते. बोलण्याचं सोंग करत होते. पण मनातून काही बोलण्यास त्यांना सुचत नव्हते. आपल्या मुलानं आपली मान खाली घातली असं त्यांना त्यांचं मन सांगत होतं. त्यांचं अंतकरण त्यांना नकळत जाळत होतं. त्यांच्या मुलालाही त्यांच्याशी नजर मिळवण्याची देखील भीती वाटत होती. बाप व मुलगा दोघेही एकमेकांवर नाराज होते, दूर होते. सरपंचांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करणारे रामभाऊ त्यांचा मुलगा बंडू तेवढ्यात म्हणाला बाबा मला तुम्ही शेतात काम करून शिकवले पण मला देखील काही जास्त टक्के घेता आले नाही मला माफ करा मी काही आता पुढे शिक्षण घेणार नाही. तुम्हालाच शेतात मदत करेल, त्याचं हे बोलणं ऐकून बंड्याच्या बापाने त्याला हृदयाला कवटाळून मिठी मारली आणि अश्रूंच्या अभिषेकात बंड्या न्हाऊन निघाला हे अश्रूंचे मेघ ओसरल्यानंतर बंड्याचे बाबा त्याला म्हणाले "हे बघ पोरा मला काय लिव्हता वाचविता येत नायं बघ. म्या काय साळंत गेलो नायं. आडवी रेग पणं कवा मारली नायं. जन्मल्यापासून या काळ्या मातीतच साळा शिकलो. या मातीतून मोती पिकवून माणसं जगवली अन् माणसाला माणसं जोडून ठेवली झाड जसं परोपकारानं सजलेलं असतं, नम्रतेनं झुकलेलं असतं तसा झुकून राहिलो अन् सुखात आनंदात तुला साळला धाडलं पोरा मला काय या टक्केवारीचं सुदीक समजत नाही. पण बघ एकच सांगतो तुला जमल ते चांगलंच कर तुला डॉक्टर, इंजिनिअर होता नाय आलं तरी बी चाललं पण माणूस होता आलं पाहिजे, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे महात्मा फुलेंसारखं, राजा शिवाजीसारखं, दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पेरायला शिक पोरा जीवनाची कोणतीच परीक्षा नापास होणार नायसं बघ...
बंड्याच्या बापाचे हे शब्द ऐकून सरपंचालाबी आपल्या चुकीच्या वागण्याची जाणीव झाली त्यांनीही त्यांच्या मुलाला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि खऱ्या शिक्षणाची सुरुवात झाली. मानवाचे जीवन प्रतिष्ठा फक्त टक्केवारीवर कागदपत्रांवर अवलंबून नसून ती त्यांच्या जगण्यातल्या वागणुकीतल्या प्रेम, माया, आपुलकी, नम्रता, सहनशीलता, अशा अनेक चमचमत्या सदगुणांवर अवलंबून असते हेच त्रिवार सत्य...
ढीगभर कागदपत्रांपेक्षा
एकच सद्गुण बरा...
माणूस होऊन जगण्याचा
हाच नवा मार्ग खरा...
सौ. दुर्गा देशमाने-राऊत,
माजलगाव, जि. बीड